आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय आखाडा : युवराजही उतरले कुंभपर्वाच्या आखाड्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंभमेळ्यासंदर्भात वेगवेगळ्या कथा इतिहासात सांगितल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे देव आणि दानवांमध्ये झालेला संघर्ष थांबविण्यासाठी समुद्रमंथनाचे आयोजन करून त्यातून निघालेल्या अमृतकलशासंबंधी आहे. मंथन सुरू असताना त्यातून निघालेला अमृताचा कलश देवदेवतांनी पळविल्याने आसुर त्यांच्या मागे लागले आणि या पळवापळवीमध्ये अमृताचे काही थेंब वरील चारही ठिकाणी पडले. त्याचे प्रतीक म्हणून हजारो वर्षांपासून कुंभपर्वाचे आयोजन केले जाते, अशी श्रद्धा आणि भावनेशी संबंधित परंपरा या उत्सवाला आहे. इतकी जुनी प्राचीन परंपरा असलेल्या या प्रत्येक पर्वाला कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने संघर्ष निर्माण झाला आहे. या पर्वाशी संलग्न असलेल्या आखाडा या शब्दाचा रूढ या अंगाने अर्थ पाहिला तर मल्लयुद्धाचे स्थळ किंवा रणक्षेत्र असे संबोधले जाते. मात्र कुंभपर्वाच्या अनुषंगाने याच शब्दाचा अर्थ संघटन या अर्थाने घेतला जातो. अखंड या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन आखाडा या दृष्टीनेदेखील त्याकडे पाहिले जाते. अशा हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या कुंभपर्वाचा काळ आता अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपला आहे. प्रशासनाकडून कुंभमेळा तयारीबाबत प्रशासकीय पातळीवर अजूनही पाहिजे तसा जोर चढलेला दिसत नसला तरी राजकीय वातावरणाने मात्र कुंभमेळ्याला आतापासूनच आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
शिखर समितीत समावेश न केल्याने नाराज साधू-महंतांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तक्रार करत जिल्हा प्रशासनाविरोधात शंख फुंकला. यावरही समाधान न मानता महंतांनी जिल्हाधिका-यांना टीकेचे लक्ष करत साधुग्रामसाठी जागा न मिळाल्यास आमच्याशिवाय प्रशासनाने कुंभमेळा साजरा करावा, असा इशारा देऊन प्रशासनाला यापूर्वीच धक्के दिले आहेत. शासनाने तेवीसशे कोटींचा आराखडा मंजूर केलेला असला तरी अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अद्याप एकाही विकास कामाचा नारळ वाढू शकलेला नाही. अद्याप प्रशासनाच्या हाती दमडीही पडलेली नसताना अशातच छत्रपती शिवरायांचे वंशज असलेले युवराज संभाजीराजे यांनी नाशिक दौ-यावर असताना कुंभमेळ्याच्या आयोजनावर टीकेची तोफ डागत थेट साधू-महंतांनाच आपले लक्ष्य केले. कुंभमेळ्यावर कोट्यवधींचा खर्च करण्याऐवजी समाजातील गोरगरीब जनता आणि शेतक-यांच्या विकासासाठी तसेच राज्यातील गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी खर्च करण्याची सूचना करत त्यांनी जनतेचे कैवारी होऊ पाहण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. भावनेच्या अनुषंगाने विचार केल्यास प्रसारमाध्यमांतून जाहीरपणे प्रसिद्ध होऊ शकणार नाही, असेही काही वक्तव्य त्यांनी करत नवाच वाद ओढवून घेतला. मराठा आरक्षणासाठी शिव-शाहू यात्रेत त्यांनी केलेल्या या विधानांमुळे साधू-महंतांमधून तीव्र नाराजी व्यक्त होणे स्वाभाविकच आहे. अर्थात, या सर्व प्रकारातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने होणा-या मंथनातून काही सार निघतेय का हे पाहण्याचा एक प्रयत्न यातून असू शकतो. मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलेले असल्याने गेल्या सहा-सात वर्षांपासून यासंदर्भात अनेक घडामोडी घडत आहेत.
मराठा समाजाला एकवटून संघर्ष उभारण्याचा आटापिटा होत असताना त्यातही फूट पडून नवनवीन वाटा त्यास फुटल्या आहेत. या गटातटाच्या राजकारणातही ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजात नाराजी पसरू नये, यासाठी कदाचित शासनाने समाजातील मतमतांतरे जाणून घेण्यासाठी समित्या स्थापन करून सूचना मागविल्या असाव्यात आणि सध्या तशी चर्चादेखील सुरू झाली आहे. समाजाचा राग काही अंशी मावळून निवडणुका निर्विघ्न पार पडाव्यात, हा त्यामागील उद्देश असावा. याच भूमिकेच्या अनुषंगाने विचार केला तर संभाजीराजे यांनी कुंभमेळ्याविषयी केलेले वक्तव्यदेखील समाजाची दिशा भरकटवणारेच वाटत आहे. मूळ मुद्दा बाजूला सारून समाजमनाच्या भावनांशी संबंधित विषयावर बोलताना खरे तर युवराजांसारख्यांनी किमान विचार करणे अपेक्षित आहे.