आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Second Death Anniversary News In Marathi

डॉक्टरांना आपलेसे करण्याचे कसब असणारे बाळासाहेब ठाकरे..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विनोद, उपहास आणि वक्रोक्तीची मुक्त उधळण ही खास ठाकरी संवादशैलीची वैशिष्ट्ये ! शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणारे डॉक्टरही बाळासाहेबांच्या या शैलीवर फिदा होते. एरवी रुग्णालयाच्या गंभीर वातावरणात वावरणा-या डॉक्टरांच्या चेह-यावरील तणाव आणि बाळासाहेबांबद्दल त्यांना वाटणारा धाक बाळासाहेबांचे विनोद ऐकल्यानंतर आपसूक गळून पडत असे. उपचार घेता-घेता असंख्य नर्मविनोदी किस्से ऐकवून डॉक्टरांना आपलेसे करण्याचे कसब एरवी, करारी स्वभावाचे भासणा-या बाळासाहेबांनी छानपैकी साधले होते.

छातीविकार तज्ज्ञ डॉ. जलील परकार, डॉ. समद अन्सारी, डॉ. अजित मेनन, प्रकाश जिंदानी, सॅम्युअल मॅथ्यू आदी डॉक्टर ब-याच वर्षांपासून बाळासाहेबांच्या प्रकृतीची काळजी वाहत आले होते. पोटविकार तज्ज्ञ डॉ. अमित मायदेव त्यांच्यापैकीच एक. बाळासाहेब आणि आपल्यामध्ये केवळ डॉक्टर-पेशंट असे औपचारिक राहिलेले नव्हते, असे ते म्हणतात. बाळासाहेबांसोबतच्या ऋणानुबंधांविषयी ‘दिव्य मराठी’शी बोलताना ते म्हणाले की, पोटविकारावरील उपचाराच्या निमित्ताने 10 वर्षांपूर्वी माझा बाळासाहेबांशी संबंध आला. त्यांच्या नावाभोवतीचे वलयच एवढे मोठे होते की, सुरुवातीला त्यांच्या व्यक्तिमत्त्वासमोर मी दबून गेलो. पण, काळ पुढे जात राहिला, तसतसे त्यांचे आणि माझे संबंध जास्तच जिव्हाळ्याचे आणि गहिरे होत गेले. त्यांच्याच कुटुंबातील एक सदस्य असल्याचे त्यांच्याकडून मिळणा-या वागणुकीतून मला जाणवायचे. बाळासाहेबांच्या प्रत्येक वाक्याला विनोदाची झालर असायची. त्यांच्या विनोदांनीच माझ्या मनातील दडपण दूर केले. तल्लख स्मरणशक्ती, सकारात्मक विचारसरणी आणि कमालीचा स्पष्टवक्तेपणा ही त्यांच्या व्यक्तित्वाची वैशिष्ट्ये होती.

कुंकू लावून जा....
स्त्रियांविषयी बाळासाहेबांना कमालीचा आदर होता. काही महिन्यांपूर्वी पत्नीसमवेत त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांचा निरोप घेऊन जायला निघालो, तेव्हा त्यांनी माझ्या पत्नीला थांबवले. जवळच ठेवलेल्या करंड्यातील कुंकू कपाळावर लावून घेऊन मगच जायला सांगितले, अशी आठवण डॉ. मायदेव यांनी सांगितली.

साहेब गच्चीवर चरतायत....
पोटाच्या विकारावर उतारा म्हणून बाळासाहेबांना वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड खायला सांगण्यात आले होते. त्यासाठी ‘मातोश्री’च्या गच्चीवर व्हीट ग्रास लावण्यात आले होते. ते रोज खाण्याचा सल्ला बाळासाहेबांना देण्यात आला होता. त्यावेळी गमतीने माझ्याशी बोलताना बाळासाहेब म्हणाले की, आता माझे कार्यकर्ते मला भेटायला आले आणि त्यांनी इथे कोणाला विचारले की, साहेब कुठे आहेत? तर ते लगेच सांगतील, ते काय! गच्चीवर चरतायत, असा एक किस्साही मायदेव यांनी सांगितला.
स्पष्ट सल्ला देणारे डॉक्टर आवडायचे
काय पथ्य सांभाळावे, याविषयी व्यवस्थितपणे समजावून सांगितल्यानंतर ते शांतपणे ऐकून घ्यायचे व त्याप्रमाणे नित्यक्रम आखायचे, पण नुसतेच गुळमुळीत सांगितले, तर ते ऐकायचे नाहीत. शाब्दिक खेळ करत नुसतीच गोल-गोल फिरत बसणारी डॉक्टरमंडळी त्यांना नापसंत होती. स्पष्ट सल्ला देणारे लोक त्यांना आवडायचे. ब-याच वर्षांपूर्वी मी त्यांना एक औषध दिले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना तपासायला गेलो होतो, तेव्हा त्यांनी एवढ्या वर्षांपूर्वीच्या औषधाचाही तपशील अचूक सांगितला होता. लीलावतीमधील उपचारासंदर्भात डॉक्टरांनी माझी प्रयोगशाळा करून ठेवल्याची तक्रार त्यांनी एकदा केली होती.’’ डॉ. अमित मायदेव, पोटविकार तज्ज्ञ
जनमानसाची नाडी जाणणा-या बाळासाहेबांचे नाडीपरीक्षक
कट्टर हिंदुत्ववादी विचारांची कड घेणारे राजकारणी म्हणून बाळासाहेबांची ओळख होती. तरीही राजकारणापलीकडील आयुष्यात मुस्लिम समाजातील विविध क्षेत्रांतील गुणवंतांशी जिव्हाळ्याचे, मैत्रीचे संबंध जपण्यावर त्यांचा नेहमीच भर होता. अखेरच्या काळात त्यांच्यावर उपचार करणा-या चमूमधील डॉ. जलील परकार आणि डॉ. अब्दुल समद अन्सारी यांच्यावर तर त्यांनी गाढा विश्वास दाखवला. दुस-या-तिस-या कुणी नव्हे, तर डॉ. परकार यांनी बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त अधिकृतपणे देणे ही घटनादेखील त्या संबंधांची साक्ष देणारी होती...

डॉ. जलील परकार (फिजिशियन) : ते 2009 पासून ठाकरे यांच्यावर उपचार करत होते. निष्णात छातीरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा. श्वसनविकार असलेल्या बाळासाहेबांची फुफ्फुसे कार्यक्षम राहतील, यासाठी त्यांचा प्रयत्न होता. 2000 पासून लीलावती रुग्णालयात प्रॅक्टीस करणा-या परकार यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. अमेरिकेची फेलोशिप मिळवून वैद्यकीय क्षेत्रात संशोधन केले.

डॉ. अब्दुल समद अन्सारी (इन्टेसिव्हिस्ट-अति दक्षता तज्ज्ञ) : इन्टेसिव्हिस्ट म्हणून जबाबदारी. ‘क्रिटीकल केअर’ क्षेत्राचा गाढा अनुभव. अ‍ॅनास्थेशिया व क्रिटीकल केअर या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी. डॉ. अन्सारीदेखील लीलावतीमध्येच काम करत असून, 2009 पासून ठाकरे कुटुंबियांशी घनिष्ठ संबंध आहेत.

डॉ. प्रकाश जिंदानी (क्रिटीकल केअर स्पेशालिस्ट) : 2009 पासून सेवेत. बाळासाहेबांचे महत्त्वाचे अवयव औषधोपचारांना कसा प्रतिसाद देतील, हे पाहण्याची व त्याप्रमाणे उपचारांची रुपरेषा ठरवण्याची जबाबदारी. 1990मध्ये एमडी झाल्यानंतर लेक्चरर म्हणून काम. लोकमान्य टिळक रुग्णालयातून पदव्युत्तर पदविका घेतली आहे. त्यानंतर लीलावती रुग्णालयासाठी क्रिटीकल केअर स्पेशालिस्ट म्हणून काम सुरू केले. याशिवाय कार्डिओलॉजिस्ट अजित मेनन व अ‍ॅनास्थेशियासिस्ट डॉ. सतीश कुलकर्णी यांचाही पथकात समावेश.