आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बशर : डॉक्टर ते हुकूमशहा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा ज्या व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी काँग्रेसची संमती मागत आहेत, त्याला समजण्यासाठी आपल्याला 26 जून 1980 च्या घटनांवर एक नजर टाकावी लागेल. त्या वेळी असद यांचे वय होते 14 वर्षे. मुस्लिम ब्रदरहूडच्या सिरियन शाखेने बशरचे वडील आणि तत्कालीन अध्यक्ष हाफीझ अब्बास यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता. हाफीझ दमिश्कच्या सरकारी महालात एका परदेशी शिष्टमंडळाची वाट पाहत होते. हल्लेखोरांनी अध्यक्षांवर गावठी बाँब फेकले आणि मशीनगनने अंधाधुंद गोळीबार केला होता. त्यातून हाफीझ सहीसलामत सुटले.

त्या दिवशी आणि पुढील दोन वर्षांपर्यंत घडलेल्या घटनांमुळे बाल बशरवर खोलवर परिणाम झाला. सरकारने ब्रदरहूडचे कठोरपणे दमन केले. 1982 मध्ये अल्पसंख्याक अलाविते समुदायाच्या हाफीझ यांनी बहुसंख्य सुन्नी सदस्यांच्या ब्रदरहूडला सिरियामधून हद्दपार करण्यासाठी निर्णायक कारवाई केली. दमिश्कपासून 153 किलोमीटर लांब ब्रदरहूडचा बालेकिल्ला आणि प्राचीन शहर हमावर लष्कराने भीषण हल्ला केला. इस्लाम धर्माच्या उदयकाळात उभारलेल्या मशिदी, धार्मिक वास्तू जमीनदोस्त करण्यात आल्या. हल्ल्यात सुमारे 10000 ते 30000 जण मारले गेले. ब्रदरहूडच्या नेत्यांचा कुटुंबासह नाश करण्यात आला. अँम्नेस्टी इंटरनॅशनलने सांगितले की, लष्करी जवानांनी संशयित बंडखोरांच्या घरांमध्ये जीवघेणा विषारी सायनाइड वायू सोडून त्यांचा जीव घेतला.

बशर यांनी वडिलांकडून धडा घेतला की, बंडखोरीच्या कोणत्याही ठिणगीला प्रचंड ताकदीनिशी नष्ट केले पाहिजे. 11 सप्टेंबरला 48 व्या वर्षात पदार्पण करणारे बशर तीस वर्षांनंतर हाफीझ यांच्या कार्यप्रणालीप्रमाणेच गृहकलहाला तोंड देत आहेत. त्यांची सेना सरकारविरोधी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या शहरांना नेस्तनाबूत करीत सुटली आहे. बशर यांच्या या मोहिमेत अडीच वर्षांच्या काळात एक लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश बंडखोर सुन्नी आहेत. संहारक शस्त्रांच्या वापराच्या बाबतीत बशर यांनी हाफीझ यांनाही मागे टाकले आहे. 21 ऑगस्टला दमिश्कमध्ये बंडखोरांच्या भागात रासायनिक शस्त्रांच्या हल्ल्यात 350 ते 1400 जणांना जीव गमवावा लागला.

बशर असद यांना नशिबाने अध्यक्षपदी बसवले आहे. हाफीझ यांना त्यांचा मोठा मुलगा आकर्षक अँथलिट बसेल यांच्याकडे सत्ता सोपवायची होती. त्यांनी बसेल यांना अल्पवयातच राजनीती आणि युद्धनीतीचे धडे दिले. हाफीझ यांच्या चारपैकी दुसर्‍या क्रमांकाचा मुलगा बशर याला राजनीती आणि लष्करी शिक्षणापासून अलिप्त ठेवण्यात आले. लहानपणी मित्रांच्या सांगण्यानुसार बशर मितभाषी, जिद्दी, लहरी, मात्र प्रामाणिक आणि विनम्र होता. मित्र आणि सहकारी सांगतात, बशरला एखादा निर्णय घेताना अडचण येते. एका माजी अधिकार्‍याने सांगितले की, त्यांच्या स्वभावाचे मुख्य कारण निर्णय न घेता येणे आणि आडमुठेपणा आहे. हाफीझ यांनी बशरला डॉक्टर बनण्यासाठी प्रोत्साहन दिले. शिक्षणासाठी त्यांना लंडनच्या वेस्टर्न आय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. बशरच्या एका शाळकरी सवंगड्याने सांगितले की, त्याला नेत्रतज्ज्ञ होणे आवडले; कारण तो रक्त पाहू शकत नव्हता.

उत्तराधिकारी नेमण्याची हाफीझ यांची रणनीती फसली. 21 जानेवारी 1994 ला एका कार अपघातात बसेलचा मृत्यू झाला. ब्रिटनमध्ये अठरा महिने अभ्यास केल्यानंतर बशरला दमिश्कला परत बोलावण्यात आले. हाफीझ आता आपला दुसरा मुलगा 28 वर्षीय बशरला सिरियाच्या राजगादीसाठी तयार करीत होते. हाफीझ यांचे कौटुंबिक मित्र आणि त्यांचे आत्मचरित्र लिहिणारे ब्रिटिश लेखक पेट्रिक सील सांगतात, लोकांचे मन जिंकण्यासाठी आवश्यक असलेले गुण बशरमध्ये मुळीच नव्हते. तो अतिशय कमजोर वक्ता होता.

हाफीझ यांनी त्या वेळी सिरियामधील अमेरिकेचे दूत रायन क्रोकर यांना बशरला आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि कूटनीतीचे धडे देण्यास सांगितले. क्रोकर आठवण सांगतात, तो आपल्या वडिलांसोबत बैठकींना येत नसे. त्या काळी त्याचे इंग्रजीदेखील कच्चे-पक्के होते. आम्ही अरबी भाषेत बोलायचो. 2000 मध्ये हाफीझ यांच्या जागी अध्यक्ष झालेल्या बशर पाश्चात्त्य देशांशी अधिक जवळीक करतील, अशी अपेक्षा होती. कारण त्यांचे शिक्षण ब्रिटनमध्ये झाले होते. त्यांनी सिरियामध्ये सेल फोन आणि इंटरनेट आणले. दुकान, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांवरून वडील आणि नातेवाइकांचे फोटो बशरने हटवले.

वडिलांसारखेच बशरदेखील व्यक्तिपूजेच्या प्रभावाखाली आले. 2004 ते 2009 दरम्यान असद यांना नियमितपणे भेटणार्‍या टेक्सासच्या ट्रिनिटी विद्यापीठाचे इतिहासाचे प्राध्यापक डेव्हिड लेश सांगतात, असद अरब-इस्रायल युद्ध आणि शीतयुद्धाचे अपत्य होते. लेश यांना वाटते की, सिरियामध्ये निवडणुका झाल्यास बशर जिंकणार, कारण त्यांना पर्यायच नाही. कित्येक जातीय आणि अल्पसंख्याक गटांना इस्लामी बंडखोरांच्या भीतीमुळे हुकूमशहाच्या पाठीशी उभे राहावे लागते.