आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr.Dulari Qureshi Article About Shivaji Maharaj, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाचा, छत्रपती शिवाजी महाराजांची अविस्मरणीय औरंगाबाद भेट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्याला जाण्यापूर्वी औरंगाबादेस मुक्काम केला होता. ही नोंद जयपूर रेकॉर्ड्समध्ये ‘हाऊस ऑफ शिवाजी’, ‘यदुनाथ सरकार’ आणि ‘सय्यद हुसैन बिलग्रामी’ यांच्या नावाने केलेली आढळते.
वसंत ऋतूत शहर हिरवळीच्या चादरीने नटले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे याच मोसमात शहरात आगमन झाले. तो दिवस होता 5 मार्च 1666. ज्येष्ठ सुपुत्र संभाजी राजे त्यांच्यासमवेत होते. बादशहा औरंगजेबाच्या निमंत्रणावरून महाराज आग्याला जाण्यासाठी आपल्या प्रमुख सरदारांना सोबत घेऊन निघाले होते. राजपूत राजे जयसिंग यांच्या आग्रहाखातर महाराजांनी औरंगाबाद शहरात मुक्काम ठेवला. त्यांच्या समवेत हिरोजी फर्जंद, भोसले, तानाजी, येसाजी कंक, बाजीराव सर्जेराव जेधे आणि 400 निवडक सरदार होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाची खबर शहरात वणव्यासारखी पसरली आणि शेकडो लोक त्यांना पाहण्यासाठी रस्त्यावर आले. त्यांची एक झलक मिळावी यासाठी पुढे जाण्याची लोकांमध्ये जणू स्पर्धाच लागली होती. त्यांच्या या आगमनाची इतिहासात अशी नोंद आहे की, ‘शिवरायांच्या ताफ्यात सर्वांत पुढे एक महाकाय हत्ती होता, ज्याच्या माथ्यावर त्यांची सोनेरी किनार असलेली भगवी ध्वजा होती. त्यांच्या सैन्याचे उच्चधिकारी पाठीमागून घोड्यांवरून चालत होते. घोड्यांना सोनेरी आणि चांदीच्या आभूषणांनी सजवण्यात आले होते. या लवाजम्यासमोर दखनी लष्कराची तुकडीही होती. छत्रपती शिवाजी महाराज एका पालखीत विराजमान झालेले होते. ही पालखी चांदीने मढवलेली होती आणि तीवर सोन्याची चित्रे होती. हौद्यांनी सजवलेल्या दोन हत्तिणी या पालखीच्या मागून जात होत्या.’
ऐतिहासिक नोंदीनुसार या प्रांताचे गव्हर्नर सफ शिबन खान यांनी छत्रपतींचे शाही इतमामाने स्वागत केले. या वेळी खानासोबत मुघल लष्कराचे उच्चाधिकारीही उपस्थित होते. दुसया दिवशी महाराज खानाच्या सभागृहात गेले. तेथे त्यांचे प्रेमाने स्वागत करण्यात आले.
मिर्झा राजे जयसिंग यांच्या राजवाड्यात (हवेली) मुक्कामाला असताना महाराजांनी येथील अनेक प्रेक्षणीय वास्तूंना भेटी दिल्या असाव्यात. जयसिंगपुरा आणि पहाडसिंगपुरा परिसरात हा राजवाडा होता आणि त्याच्या सभोवताली सोनेरी महाल होता. या महालाच्या पाठीमागेच सुखनपुरा, हनुमान टेकडी आणि गोगापीर टेकडी होती.
जयसिंग राजांच्या राजवाड्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर शिवाजी महाराजांनी आग््रयाकडे प्रस्थान ठेवले. जाताना ते पुन्हा ‘हर्सुल सराय’ या मुसाफिरखान्यात थांबले. आज याच परिसराचे मध्यवर्ती कारागृहात रूपांतर करण्यात आले आहे. जयसिंगपुरा, टाऊन हॉल, जामा मशीद, किले अर्क, रंगीन दरवाजा, दिल्ली दरवाजा, रोझा बाग या मार्गाने महाराज हर्सुल सरायमध्ये पोहोचले. अर्थात, त्या वेळी बहुसंख्य दरवाजे आणि तटबंदीचे बांधकाम सुरू होते. हे बांधकाम 1682 मध्ये पूर्ण झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांची या शहराच्या वाट्याला आलेली ही एकमेव भेट ठरली आणि हा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. मराठा दस्तऐवजात या भेटीचा उल्लेख नसला, तरी जयपूरच्या पत्रसंग्रहात या भेटीचे दाखले आढळतात, जो आपल्यासाठी एक अनमोल ठेवा आहे.
(लेखिका औरंगाबादच्या इतिहासाच्या अभ्यासक आहेत.)