आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषणाच्या विळख्यात घुसमटलेले भारतीय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक आरोग्य संघटनेने जगातल्या सर्व शहरांतल्या वातावरणाचा अभ्यास करून एक अहवाल गेल्या आठवड्यात जाहीर केला. या अहवालानुसार भारत हा जगातील सर्वात प्रदूषित देश असून भारताची राजधानी नवी दिल्लीने प्रदूषित हवेबाबत जगात पहिला क्रमांक मिळवलेला आहे! एवढेच नव्हे, तर जगातील सर्वात प्रदूषित ठिकाणे म्हणून जी वीस शहरे निवडली गेली, त्यातील 13 शहरे भारतीय आहेत!! खरोखरीच सव्वा अब्ज भारतीयांना शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे.

खरे तर ही आश्चर्य वाटण्याची गोष्ट नाही. मागच्याच वर्षी भारतीय विज्ञान आणि पर्यावरण केंद्र (सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हॉयर्नमेंट), या भारत सरकारच्या पर्यावरणविषयक कार्य करणार्‍या संस्थेने, भारतातील 180 शहरांमधील प्रदूषणाचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला होता. त्यामध्येसुद्धा अशाच काही गंभीर गोष्टींचा उल्लेख केलेला होता. या दोन्ही अहवालांमधून भारतात प्रदूषणामुळे होणार्‍या आरोग्यविषयक हानीबद्दल अतिशय घातक बाबी निदर्शनास येतात.

अकाली मृत्यू - मागील वर्षी भारतात 6,20,000 अपमृत्यू केवळ वातावरणातील प्रदूषणामुळे झाले. 2000 मध्ये हा आकडा 1,00,000 एवढा होता. म्हणजे प्रदूषणामुळे अकाली दगावणार्‍या लोकांची संख्या, गेल्या दहा वर्षांत सहा पटीने वाढली आहे. वातावरणातील प्रदूषण हे भारतात होणार्‍या मृत्यूंच्या कारणांमध्ये पाचव्या क्रमांकाचे कारण बनले आहे. घरातील अंतर्गत प्रदूषण, उच्च रक्तदाब, कुपोषण, धूम्रपान ही त्यातील पहिली चार कारणे आहेत.

विविध आजार - प्रदूषणामुळे जे मृत्यू घडत आहेत, त्याची कारणे पाहू गेले असता, हृदयविकाराचा झटका (48.6%), मेंदूतील रक्तस्राव (25.8 %), श्वासनलिकेच्या अवरोधामुळे (17.32%), फुफ्फुसांची सूज आणि जंतूसंसर्ग (6.4%) आणि श्वासनलिका, फुप्फुसे यांचे कर्करोग (2.02%) अशी दिसतात. थोडक्यात या प्रदूषणामुळे हृदय, फुप्फुसे, मेंदू आणि रक्तवाहिन्या या सार्‍यांवर लक्षणीय परिणाम होत आहेत. यामध्ये कर्करोगाचे प्रमाण आज कमी दिसते आहे, पण वातावरण असेच प्रदूषित राहिले, तर येत्या काही वर्षांत कर्करोगामध्येही संख्यात्मक वाढ झपाट्याने होऊ शकते.

वाया जाणारी उत्पादकता -प्रदूषणामुळे आजारी पडणार्‍या लोकांचे, आजारामध्ये व्यर्थ गेलेले कामाचे दिवस एकेक करून मोजले, तर सर्व मिळून दरवर्षी 180 लक्ष वर्षे वाया जात आहेत.
धूम्रकणांचा आकार - प्रदूषणातील हवेमध्ये 10 मायक्रॉन आणि 2.5 मायक्रॉन आकाराचे धूम्रकण असतात. हे धूम्रकण हवेत किती प्रमाणात असावे, याबाबत पर्यावरणाविषयक जागतिक संघटनांनी काही मर्यादा ठरवून दिल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतातल्या सर्व शहरांमधले नागरिक जी हवा आपल्या श्वासावाटे आत घेतात, त्यामधील 10 व 2.5 मायक्रॉन आकाराच्या कणांची संख्या भीतिदायक स्वरूपात वाढलेली आहे. भारतातील शहरवासीयांपैकी एकतृतीयांश नागरिक त्यांच्या दैनंदिन आयुष्यात, कमालीच्या धोकादायक अशा प्रदूषणाशी सामना करत आहेत. ग्वाल्हेर, सिंघभूम, गाझियाबाद, रायपूर व दिल्ली ही भारतातील सर्वात प्रदूषित शहरे आहेत.
प्रदूषित वायू - सल्फर डाय-ऑक्साइड आणि नायट्रोजन डाय-ऑक्साइड या धोकादायक वायूंची पाहणी केली असता केरळमधील माल्लपूरम आणि पथानंथिटा या दोन शहरांत फक्त त्यांचे प्रमाण समाधानकारक होते. बाकी सार्‍या 178 शहरांत या वायूंच्या प्रमाणाने धोक्याची पातळी केव्हाच पार पाडली होती. हावडा, बराकपूर, बदलापूर, उल्हासनगर आणि असनसोल या पाच शहरांतील नायट्रोजन डाय-ऑक्साइड प्रमाण जीवघेणे ठरेल, एवढे जास्त आहे. सल्फर डायऑक्साइडमध्ये महाराष्ट्रातल्या लोटे या ठिकाणाचे प्रमाण सर्वात जास्त आहे आणि त्या खालोखाल जमशेदपूर, महाराष्ट्रातल्या चंद्रपूर, बदलापूर, उल्हासनगर आणि पुण्याचा क्रमांक आहे. पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या गोव्यात मार्मागोवा आणि चार्चोरीम हीदेखील या वायूने कमालीची प्रदूषित आहेत. बदलापूर, उल्हासनगर आणि जळगाव या आपल्या महाराष्ट्रातल्या शहरात प्रदूषित वायू आणि धूम्रकण यांचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढलेले आढळले.

प्रदूषणाची कारणे
वाहनसंख्या - वाढत्या वायू प्रदूषणाचे सर्वात प्रमुख कारण, हे भरमसाठ प्रमाणात वाढत चाललेली वाहनांची संख्या हेच आहे. वाहनांच्या इंजिनांची नीट देखभाल न केल्यामुळे, खूप जुनी कालबाह्य आणि टाकाऊ वाहने विशेषत: मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीकरिता वापरली जातात. त्यातून उत्सर्जित होणारा महाभयानक धूर या प्रदूषणात सतत भर टाकत आहे.
बेसुमार वापर - गरज नसताना शारीरिक श्रम टाळून वाहनांचा अतिरिक्त वापर होतो आहे. यामुळे
हे प्रदूषण वाढत चाललेले आहे.
इंधनातील भेसळ - वाहनांसाठी वापरल्या जाणार्‍या इंधनाची शुद्धता आणि दर्जा कमी असल्याने प्रदूषण वाढत आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलमधील भेसळदेखील यात भर टाकत आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, प्रदूषण रोखण्यासाठीचे काही उपाय

(avinash.bhondwe@gmail.com)