आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमुचा तो जीव पांडुरंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तुकाेबारायांच्या घरात विठ्ठलभक्तीची पूर्वपरंपरा होती. या पूर्वसंस्कारांमुळे कौटुुंबि आघात आणि दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींना झेलण्याचे आत्मिक बळ त्यांना प्राप्त झाले होते. आधिभौतिक आणि आध्यात्मिक आपत्तींमुळे चार-पाच वर्षांच्या काळात तुकोबारायांचे सांसारिक जीवन अस्ताव्यस्त झाले. पूर्वपरंपरागत भागवतधर्मप्रधान संस्कारामुळे मनावर बसलेला भागवतपुराणातील वैराग्यप्रधान भक्तीचा पगडा अधिक दृढ झाला.संसाराकडे आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलली. सर्व जीवांना येणाऱ्या संसाराच्या दु:खरूपतेचा अनुभव त्यांनाही आला. द्रव्यहानी, दुष्काळ, प्रियजनांचा वियोग याबरोबरच प्रतिष्ठा आणि सन्मानही जाताना अनुभवला.
‘जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे’ हे वास्तव, तर संसार दु:खमूळ हे सत्य अनुभवाला आले. वृत्ती उदास झाली. ही मृत्युलोकाची रहाटी असून अनित्य व दु:खरूप जगात सुख कसे मिळणार? भवसागरातून एका पांडुरंगाशिवाय कोणीही तारणारा नाही, असा वैराग्यपूर्ण निर्धार त्यांचा झाला. त्यांचे दिवाळे निघाले. दुष्काळाची पीडा झाली. बाईल कर्कशा निघाली. लोकांमध्ये दुर्दशा झाली. जगात अपमान झाला. धन, गुरेढोरे सर्व गेले. हे बरेच झाले. कारण यामुळे संसार वमनासारखा झाला आणि मी देवाच्या शरणागतीत सर्व भय, चिंता, आस व लोकलाज सोडून येऊ शकलो, असे तुकाेबारायांना वाटू लागले.
संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची
म्हणऊनी तुझे आठविताे पाय, येई वो माझे माय पांडुरंगे
अशी आर्तता त्यांच्या मनात निर्माण झाली.
वैराग्य हा परमार्थाचा पाया असतो. त्यांचे अंत:करण हे वैराग्याने आणि अनुतापाने भरून गेले. देह, घर इत्यादींसह सर्व दृश्य सृष्टीच्या नश्वरत्वाचा पूर्ण ठसा त्यांच्या चित्तावर उमटला. ‘विरक्तीवाचोनि काही, ज्ञानापरी जग तेचि नाही,’ या ज्ञानेश्वरांच्या सिद्धांताप्रमाणे भगवतप्रसादाने प्राप्त होणारे दृढतर वैराग्य शुद्ध स्वरूपाने त्यांना प्राप्त झाले आणि तुकोबारायांच्या परमार्थाचा खऱ्या अर्थाने आरंभ झाला. पांडुरंग जीवीचा जीवलग झाला. नित्यानित्य वस्तू विवेक प्रापंचिक आपत्तीमुळे जागृत झाला. अनित्याचा वीट आला व एक नित्य परमात्मा आवडू लागला.
सर्वसंगी वीट आला, तू एकला आवडसी याचा त्यांना स्पष्टपणे अनुभव येऊ लागला. आपत्तीकाळात संसाराला सावरण्याचा तुकोबारायांनी खूप प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरला. तुकोबारायांना भाेगत्यागस्वरूप वैराग्य प्राप्त झाले. शुद्ध वैराग्य ईश्वरकृपेनेच प्राप्त होते. संसाराच्या तापाने तुकाेबा विरागी बनले.संसाराच्या असारतेची,फापटपसाऱ्याची त्यांना खरी जाणीव झाली. संकटांना गांगरून ते हतबल झाले नाहीत. म्हणूनच पुढे दुष्काळ संपला, परागंदा झालेली माणसे परत घरी आली, जनजीवनाला स्थिरता आली तरी तुकोबारायांचे वैराग्य अढळ राहिले. याच दृढ वैराग्याच्या भूमिकेवरून तुकोबाराय म्हणतात,
आता काही सोस न करी आणिक, धरीन ते एक हेचि दृढ
जोडीन ते आता देवाचे चरण, अविनाश धन परमार्थ
या दृढनिश्चयाने प्रपंचाकडे पाठ फिरवून संसार न सोडता, संसाराचा संग सोडून त्यांनी अध्यात्माचा फड जिंकला. ते खरे शूर ठरले. जीवनातील सर्वोच्च सुखाचा क्षण प्राप्त व्हावा यासाठी परमार्थ शोधण्याचा आणि अनुभवण्याचा दृढ निश्चय करून पारमार्थिक जीवनसाधनेसाठी त्यांनी एकांताचा आश्रय करून विजनवास स्वीकारला. गावाजवळच्या डोंगरावर जाऊन ते राहिले. तेथील एकांत त्यांच्या आत्मचिंतनाला साथ देऊ लागला. जीवनातील क्षणभंगुरता त्यांनी शरीर संपत्ती आणि प्रपंच या सर्व बाबतीत अनुभवली हाेती आणि म्हणून आता एकांतवासात त्यांना जीविताच्या वास्तविक अर्थाचा आणि शाश्वत आनंदाचा शोध घ्यायचा होता. तुकोबांचे जीवनावर प्रेम होते. त्या जीवनाला सुंदर स्वरूप देण्यासाठी ते आत्मबळाची साधना करू लागले. हे आत्मबळ लोकांतात प्राप्त होत नसते. त्याच्या उपासनेला एकांतच हवा असतो.
तुकारामांचा एकांतवास त्यांच्या अंत:करणवृत्तीत पालट घडवून अाणणारा ठरला. त्यांचं मन विशाल होऊ लागलं. साऱ्या विश्वात परमेश्वराचा साक्षात्कार होऊ लागला. पांडुरंगच जीवस्वरूप वाटू लागला. ती आर्तता अभंगात उमटू लागली.
वृक्षवल्ली अाम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती
येणे सुखे रुचे एकांतवास, नाही गुण दाेष अंगा येत
आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी
तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाचि वाद आपणासी
रात्रंदिवस डोळे मिटून तुकोबा ध्यान करू लागले. खाण्यापिण्याची भ्रांत उरली नाही. आत्मबळ एकवटून पांडुरंगाचा धावा केला आणि आश्चर्य घडलं. पंधराव्या दिवशी तुकोबारायांनी डोळे उघडले. त्यांना सर्वत्र प्रकाश दिसला. गाभारा उजळून निघाला अाणि आत-बाहेर प्रकाशाचे साम्राज्य दिसू लागले. पांडुरंगाची तपश्चर्या फळाला अाली. ध्यानात साठवलेली पांडुरंगाची मूर्ती त्यांना प्रत्यक्षात भेटली होती. त्यांना आता कळून आलं की, ज्याच्यासाठी आपण रानोमाळ भटकलो, तीथर्यात्रा करत हिंडलो, देवालये धुंडाळली, तो हरी आपल्या हृदयात आहे. तो आत आहे, बाहेर आहे, सर्वत्र आहे. आत्मदृष्टीला जाग आल्याने म्हणजे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र त्याचेच रूप दिसू लागले. इतकी वर्षे तुकोबा जनात असूनही एकटेच राहिले होते. आता विजनात असूनही त्यांचा एकटेपणा नाहीसा झाला होता.
जेथे जातो तेथे तू माझा संागाती, चालविसी हाती धरोनिया
चालो आता आम्हा तुझाचि आधार, चालविसी भार सर्व माझा

तुकोबांनी आता सर्व भार पांडुरंगावर टाकला होता. पांडुरंगाची भक्ती आता आर्त अभंगातून स्रवू लागली. सर्व तीर्थाचे माहेर असलेली पंढरी त्यांना खुणावू लागली. आषाढी-कातिर्कीचा सोहळा पाहण्यासाठी त्यांचे मन आतुर झाले.
आले वैकुंठ जवळा, सान्निध्य पंढरीचे
पीक पिकले धुमरी, प्रेम न समाये अंबरी
वाळवंटात हरिनामाचा गजर करणारे वैष्णव त्यांना साद घालू लागले. दीनांचा सोयरा पांडुरंग प्रेमाचा संवाद करू लागला. जीविचे गूज उमलू लागले. तुकारामांच्या सर्वच अभंगातून पांडुरंगाच्या सगुण -निगुर्ण रूपाचे वर्णन येते, ते अंतरीचा जिव्हाळा घेऊनच. ‘काय उणे आम्हा विठोबाचे पायी,’अशी त्यांच्या मनाची अवस्था झाली. जीवाचा जीवलग पांडुरंग माझा सोयरा आहे, त्याच्या गावाला भेटायला जाईन, असे ते म्हणतात. कारण ते माझे माहेर आहे.
ध्यावून रूप तुझे गाऊन तुझे नाम
आता न करे काम जिव्हामुखे
तुका म्हणे जीव ठेवीन मी पायी
आणिक ते काही देऊ कवणा
तुकोबांचा हा जीवनप्रवास त्यांच्या आत्मसाक्षात्कारापर्यंत जाऊन पोहोचतो. त्यांचा साक्षात्कार, त्यांचा विजनवास आणि पांडुरंगाशी त्यांची झालेली भेट हे तुकोबांच्या जीवनातील वास्तव आहे. त्यातच आमुचा जीव तो पांडुरंग या अभंगाचे रहस्य दडलेले आहे.
बातम्या आणखी आहेत...