आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Jayant Narlikar And Madhavrao Chitale Interview In Marathi

योग्य वेळी सुज्ञपणे निर्णय घेतल्यास ऐतिहासिक भरारी शक्य!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर कुठल्याही क्षेत्रात ऐतिहासिक यश मिळू शकते, अशी भूमिका भारतातील दोन तज्ज्ञांनी मांडली. गुरुत्वाकर्षण लहरींच्या शोध प्रकल्पात सहभागाच्या प्रस्तावावर भारताने योग्य वेळी विचार केला असता तर मूळ शोधाचे श्रेयही मिळाले असते, असे मत प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. दुसरीकडे, कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया यांनी पाण्यावर अवलंबून असलेली आणि नसलेली अर्थव्यवस्था यांची सांगड घातली. आपणही तशी घातली तर दुष्काळावर मात शक्य आहे, असे मत जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी व्यक्त केले.

...तर त्या शोधाचे श्रेय भारताला मिळाले असते
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी शंभर वर्षांपूर्वी गुरुत्वाकर्षण लहरींचे भाकीत केले होते. मात्र, गुरुत्वीय लहरींची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पुरेसे विकसित तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. जोसेफ वेबर या वैज्ञानिकाने त्यासाठी बराच आटापिटा केला. मात्र, त्याला साथ देणारे कुणीही नव्हते. त्यासाठी पुरेशी यंत्रणा उभारणेही त्याला शक्य नव्हते. मागील २० वर्षांत त्यासाठी आधुनिक अशा लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व्हेेटरी (लायगो) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सातत्याने प्रयोग सुरू असल्याने हे यश मिळाले. खरे सांगायचे तर फुटबॉलच्या मैदानावर एखादी टाचणी शोधण्यापेक्षाही कठीण असे हे संशोधन होते. कृष्णविवर म्हणजेच दोन ब्लॅकहोलमध्ये धडक घडवून गुरुत्वाकर्षण लहरी तयार होतात. तथापि, संशोधन सुरू असतानाच अमेरिकेपासून सर्वात दूरच्या एक-दोन देशांतही लहरींचे निरीक्षण करण्याची वेधशाळा असावी अशी भूमिका मांडण्यात आली होती.

भारताचे भौगोलिक स्थान लक्षात घेता अमेरिकेने भारत तसेच ऑस्ट्रेलियालाही प्रस्ताव दिला होता. ऑस्ट्रेलियाने त्यास असमर्थता दर्शवली, तर भारताकडून त्यावर वेळेवर विचार होऊ शकला नाही. अन्यथा या मूळ संशोधनाचे श्रेयदेखील भारताला मिळाले असते. कुठल्याही प्रस्तावावर विचार करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. वेगवेगळे प्रस्ताव तुमच्या पुढ्यात असतात. त्यांचा सर्वंकष पद्धतीने विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. अगदी अमेरिकेच्या नासा संस्थेतही याच पद्धतीने काम चालत असते. सध्या या संशोधनात भारताला जे काही श्रेय दिले जात आहे, ते माहितीच्या पृथक्करणाचे आहे. मात्र, आता केंद्र सरकारने लायगो इंडिया प्रकल्पासाठी पुढाकार घेतला असून भविष्यात त्याचा फायदा होईल. गुरुत्वीय लहरींच्या शोधामुळे विश्वाच्या उत्पत्तीसह अनेक रहस्यांचा उलगडा भविष्यात होऊ शकेल.

फुकटचे दावे नकोच : डॉ. नारळीकर म्हणाले की, भारतासारख्या प्राचीन देशाने भूतकाळात कितपत वैज्ञानिक प्रगती साधली होती, याचा आढावा घेणे निश्चितच चांगले आहे. मात्र, आमच्याकडे गोष्टी उपलब्ध होत्या, असे दावे कुठल्याही पुराव्यांशिवाय करणे अत्यंत अयोग्य आहे. असे असेल तर भविष्यातील शोधांबाबत आताच सांगून टाकलेले बरे. या वर्षी डिसेंबर महिन्यात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथे देशाच्या खगोलविज्ञानाच्या इतिहासावर परिषद होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पुढे वाचा, डॉ. माधवराव चितळे यांची खास मुलाखत...