आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बा गणेशा, तुझ्या उत्साही भक्तांना भरपूर सुबुद्धी दे!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय समाज हा मुळातच उत्सवप्रिय आहे. कोणत्याही उत्सवात एकत्रित येणे व जल्लोष करणे हा त्याचा स्वभाव आहे. खरे म्हणजे भारतात प्रत्येक उत्सव व सण साजरा करण्याची वेळ व प्रयोजन हे एका निश्चित उद्देशाने केले जाते. त्याची पद्धती आणि फलनिष्पत्ती याची जाणीवही लोकांना असते. त्यात सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक कारणमीमांसाही आहे. अनेक सण, उत्सवांना वैज्ञानिक अधिष्ठानही आहे.

महाराष्ट्रात तर सण आणि उत्सवांची अगदी रेलचेल असते. त्यातही श्रावण महिन्यात तर अशा सण, उत्सवांची भाऊगर्दीच झालेली असते. त्यातलाच एक महत्त्वाचा आणि लक्षणीय उत्सव म्हणजे गणेशोत्सव! गणेश चतुर्थीपासून तर अनंत चतुर्दशीपर्यंत उत्साहाला उधाण आलेले असते. गणेशोत्सवाचे पूर्वीपासूनचे स्वरूप घरगुती आणि कुटुंबापुरते मर्यादित असेच होते. गणेशाेत्सवातील प्रबोधन व मनोरंजन, यातील प्रबोधन तर केव्हाच संपले. मनोरंजनाचे म्हणाल तर त्याचा दर्जा अतिशय निम्नस्तराचा झाला. गणपती पूजेतील वैज्ञानिकता संपली. गणपतीला दूर्वा का वाहतात? पूजेतील पत्रींचे महत्त्व काय? याचा विचारच नाही. केवळ भव्यदिव्यता, रोषणाई, देखावा, बडेजाव यावरच भर दिला जाऊ लागला. त्यामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. नाही म्हणायला पर्यावरणवादी, पुरोगामी मंडळी गणेशोत्सव आला की प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बसवू नका, निर्माल्याचे कंपोस्ट खत करा, डी.जे. वगैरे लावू नका ,मंडप सजावटीत प्लास्टिक, थर्माकोल इत्यादींचा वापर करू नका, मोठी मूर्ती बसवू नका, मूर्तीचे विसर्जन नदी, तलावात करू नका इत्यादी गोष्टी प्रकर्षाने मांडत असतात. टी.व्ही. चॅनल्सवरसुद्धा या काळात पर्यावरणपूरक गणपती उत्सव यावर चर्चा घडत असतात; परंतु हे फक्त गणेशोत्सवाचा डमरू वाजल्यावरच. एरव्ही वर्षभर या गंभीर विषयावर चर्चा नाही की प्रबोधन नाही. याचाही विचार सर्वांनी करायला हवा. हे असे तात्पुरते प्रबोधन किती दिवस करत राहणार? काही कायमस्वरूपी तोडगा काढणार की नाही?

आजच्या आधुनिक काळात बदललेली जीवनशैली आणि सार्वजनिक प्रतिष्ठेच्या खोट्या संकल्पनांमुळे गणेशोत्सवातील वातावरण दूषित झाले. शिवाय पर्यावरणाला धोकाही निर्माण झाला. पारंपरिक मातीच्या मूर्तीची जागा आकर्षक प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीने घेतली. मूर्तीला लावलेले रंगही विषारी असतात. हे विषारी रंग मूर्ती आकर्षक व गुळगुळीत दिसावी म्हणून वापरले जातात. मूर्ती जेव्हा पाण्यात विसर्जित होते तेव्हा हे रंग पाण्यात मिसळतात. या विविध रंगांमध्ये कॉपर सल्फेट, निकेल, फॉस्फरस, कोबाल्ट, पारा, झिंक ऑक्साइड, क्रोमियम आणि शिसे यांसारखे विषारी द्रव्ये असतात. कॅन्सर व अन्य रोगांना निमंत्रण देतात. पाण्यातील परिसंस्थेतील सजीव धोक्यात येतात. पाण्यात विसर्जित केलेली प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाही. त्यामध्ये असलेले जिप्सम, सल्फर व मँगनीज इत्यादी घटकद्रव्ये तलावाच्या तळाशी साचतात. त्यामुळे तलावातील पाणी जमिनीत मुरत नाही. हे वास्तव गणेशभक्त विचारात केव्हा घेणार?

गणपती उत्सवाच्या मागचे शास्त्र, पूजा पद्धती त्यातील वैज्ञानिकता ही आपण विसरून गेलो. मूर्ती मातीची असावी, असे शास्त्र सांगते. मग चकचकीत आकर्षक दिसणारी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आली कुठून? कलाकारांना ती बनवायला फार वेळ लागत नाही, त्यांचे साचे तयार करता येतात. ही कलाकारांची सोय झाली; परंतु शास्त्राचे काय? सोबत मूर्तीचे विसर्जन वाहत्या नदीत किंवा जिवंत झरा असलेल्या तलावात करावे याला मात्र गणेश भक्त चिकटून बसले. त्यावरचा उपाय आम्ही शोधत नाही. काही जागरूक नागरिकांना ही गोष्ट कळते म्हणून कुणी तरी दरवर्षी कोर्टात जातो. आणि अपील करतो की, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बसवायला बंदी घालावी. कोर्ट त्यावर निर्णयही देतो की, पर्यावरण धोक्यात येत असल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवू नये तसेच ती पाण्यात विसर्जितही करू नये. या निर्णयावर पुन्हा मूर्तिकार कोर्टात जातात, आम्ही आता इतक्या मूर्ती बनवल्या याचे काय? कोर्ट पुन्हा त्यावर तात्पुरती स्थगिती देते. कोर्ट काय किंवा शासन काय, या गंभीर प्रश्नावर तात्पुरती मलमपट्टी करते. कायमस्वरूपी तोडगा निघत नाही. कसाबसा गणेशोत्सव उरकला जातो. पुन्हा या विषयात वर्षभर काहीच नाही.

सिगारेटच्या पाकिटावर वैधानिक इशारा असतो तरी त्याची विक्री आणि उपयोग सुरू असतो, तसेच सरकारचे दारूबंदी खातेही आहे आणि अबकारी खात्यामार्फत दारूच्या दुकानांना परवानगी दिली जाते. तोच प्रकार गणेशोत्सवाबाबत होत आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवू नका, बसवू नका, विसर्जित करु नका, असा आदेश एखादी स्थानिक स्वराज्य संस्था काढते तरी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची निर्मिती होते, लोक खरेदी करतात आणि विसर्जित करतात. असा विचित्र प्रकार सुरू आहे. म्हणजे आम्ही सिगारेट, दारूच्या रांगेत तर गणपतीला नेऊन ठेवले नाही ना?

गणपती उत्सवामधील पर्यावरण धोक्यात येत असल्याची ओरड अनेक पर्यावरणवादी, पुरोगामी विचाराची मंडळी करत असतात. ते खरेही आहे. कारण देशात सार्वजनिकरीत्या साजरे होणारे उत्सव व सण हे सर्वात जास्त हिंदूंचेच असतात. त्यामुळे ओरडही जास्त होते. अन्य धर्मांचा विचार केला तर ख्रिश्चनांचे फार तर वर्षभरात एक-दोन सण असतात तसेच मुस्लिमांचे फार तर तीन-चार सण सार्वजनिकरीत्या साजरे होतात. त्यामुळे ते लक्षातही राहत नसावेत.

गणेश ही विद्येची व बुद्धीची देवता आहे. ती आपल्या भक्तांवर नेहमी कृपा करत असते. अशा वेळी श्रीगणेशाने आपल्या भक्तांना पर्यावरण वाचवण्याची आणि उत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी भरपूर भरपूर सुबुद्धी द्यावी.
डॉ. नितीन खर्चे
पर्यावरण अभ्यासक, यवतमाळ