आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजन्म : 6 एप्रिल 1953, ओडिशातील दामोदरपूरमध्ये
माता-पिता : सरला, मदनमोहन पांडा, दोघेही जमीनदार आहेत.
शिक्षण : हायस्कूल दामोदरपूर, कॉलेज भुवनेश्वर, एमबीबीएस कटकहून.
कुटुंब : पत्नी डॉ. संघमित्रा पांडा, दोन मुले.
चर्चेचे कारण : त्यांनी 12 बायपास ग्रॅफ्ट्स करून हृदयाभोवतालचा रक्तप्रवाह सुरळीत केला. ही जगातील अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया असून यात रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झालेले अडथळे दूर केले जातात.
डॉ. रमाकांत यांची शाळा घरापासून सात किमी दूर होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील संघर्षाची सुरुवात शालेय जीवनापासूनच झाली. त्यांना दररोज 14 किमी चालत जावे लागत होते. डॉ. रमाकांत सांगतात, सतीशचंद्रा दास हे त्यांचे मुख्याध्यापक होते. बोर्डाच्या परीक्षा आल्या तेव्हा त्यांनी मुलांना एका होस्टेलमध्ये ठेवले आणि त्यांची देखभाल करू लागले. एक दिवस मुख्याध्यापक बाहेर गेले तेव्हा सगळ्या मुलांनी बाहेर पिक्चर पाहायला जाण्याची योजना आखली. मुख्याध्यापकांना ही बातमी कळल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांचे सर्व सामान रस्त्यावर फेकून दिले. त्या दिवशी सगळे मित्र रस्त्यावर झोपले. तेव्हापासून त्यांना शिस्तीचे महत्त्व पटले.
डॉ. रमाकांत यांचे आई-वडील डॉक्टर नाहीत. या क्षेत्रात येण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या मामांकडून मिळाली. ते सांगतात, ‘1969 मध्ये चौदाव्या वर्षी मी एका लाइफ मॅगझिनमध्ये अमेरिकेत झालेल्या पहिल्या हृदय प्रत्यारोपणावरील लेख वाचला. त्या लेखाने मी एवढा प्रभावित झालो की त्याच वेळी कार्डिअॅक सर्जन बनण्याचे ठरवले.’ पालकांनी त्यांना करिअर निवडीचा पूर्ण अधिकार दिला होता. डॉ. रमाकांत यांनी आपल्या मुलांनाही हीच वागणूक दिली. त्यांना फोटोग्राफीचा छंद असून कामाचा ताण घालवण्यासाठी ते फोटोग्राफी करतात. पहिल्या सर्जरीच्या यशाबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘1984 मध्ये मी प्रशिक्षण घेताना, एक रुग्ण महिनाभरापासून अतिदक्षता विभागात होता. त्याच्या हृदयाच्या दोन्ही झडपा निकामी झाल्या होत्या. शरीर सुजले होते. त्या वेळी शस्त्रक्रिया करणे कठीण होते, पण मी ही जोखीम पत्करली. पहिल्या दिवशी त्याच्या शरीरातून 25 लिटर पाणी काढले. त्यामुळे त्याचे वजन निम्मेच झाले. तेव्हापासून मला असा धडा मिळाला की उपचार न करण्यात 100 टक्के जोखीम असते, पण उपचार केल्यास 10-20 टक्केच जोखीम उरते. प्रशिक्षण घेतले होते, त्यामुळे हात थरथरणे किंवा घाबरण्यासारखे प्रकार झाले नाहीत. ’
2009 मध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर शस्त्रक्रिया करणार्या सहा डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. रमाकांत यांचा समावेश होता. सकारात्मक विचारसरणीचे असल्यामुळेच ते दररोज 16 तासांहून अधिक काम करतात. त्यांनी आजवर 18,500 हून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यापैकी हजाराहून अधिक शस्त्रक्रिया दुसर्या बायपासच्या होत्या. त्यांनी 3 हजार गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. 12 बायपास ग्रॅफ्ट्स सर्जरी करून त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडीत काढला आहे.
(डॉ. रमाकांत पांडा यांनी ‘दिव्य मराठी’शी केलेल्या चर्चेवरून..)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.