साठोत्तरी काळातले महत्त्वाचे कादंबरीकार, कवी आणि समीक्षक असणार्या भालचंद्र नेमाडे यांना साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान जाहीर होणे, ही मराठी मनाला आत्यंतिक आनंद देणारी व अभिमानाची घटना आहे. नेमाडे यांची सर्वाधिक गाजलेली आणि ‘आज’ही अन्वर्थक वाटणारी कादंबरी म्हणजे ‘कोसला’. १९६३ मध्ये ‘कोसला’ वाचकांच्या भेटीस आली आणि आज अर्धशतकाहून अधिक काळ उलटूनही ही कादंबरी तेवढीच ताजी, लोकप्रिय आणि अन्वर्थक आहे, ही एकच गोष्ट नेमाडे यांचे साहित्यातले विलक्षण योगदान अधोरेखित करणारी आहे.
गेली पाच दशके ‘कोसला’ आणि नेमाडे यांचे गारूड कायम आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाशी या साहित्यकृतीचे नाते आहे. मग तो विद्यार्थी असो, प्राध्यापक, नोकरदार असो वा बेकार असो, ‘कोसला’चा प्रभाव प्रत्येकावर आहे. अगदी आजच्या साहित्य अकादमी मिळवणार्या अवधूत डोंगरेपर्यंत तसेच ‘बाकी शून्य’ लिहिणार्या कमलेश वालावलकरपर्यंत नेमाडेंच्या कोसलाचा ठसा स्पष्ट दिसतो आणि या महान साहित्यकृतीची जादू पुन्हा पुन्हा जाणवत राहते. मानवी आयुष्यातील अनिश्चितता, असंगतता, स्वप्नभंग यांचा शोध घेऊ पाहणारे नेमाडे त्यांच्या इतरही लेखनातून भेटतात.
योगदान :
आपल्या ठाम सामाजिक व्यवस्था आणि त्यांची कार्य यांचे ‘डिमिस्टिफिकेशन’ करण्याचे योगदान नेमाडे यांच्याकडे जाते. कुटुंबव्यवस्था, विवाहसंस्था, शिक्षण, उपजीविका यांच्या पारंपरिक समजुती आणि अर्थ नेमाडे यांनी पार खिळखिळ्या केल्या. हे धाडस सोपे नव्हते. ते नेमाडेंनी दाखवले. आपल्या गृहीतकांना त्यांनी दिलेला हा धक्का कलात्मकदृष्ट्याही त्यांच्या लेखनाला उंचीवर नेणारा ठरला. मात्र केवळ धक्का देण्यावर न थांबता नेमाडे त्यापुढे गेले. त्यांनी समाज आणि व्यक्ती, कुटुंब, विवाह, नाती...या सार्यांकडे नवीन नजरेने पाहिले. नेमाडे हे करू शकले कारण आपल्या सर्व परंपरांचे त्यांना उत्तम भान आणि जाण आहे. ‘कोसला’ची सुरुवात हे याचे उत्तम उदाहरण आहे. माणसांचा लिप्ताळा मान्य करून व्यावहारिक पातळीवर ते आधिभौतिक प्रश्नांना भिडले. त्यासाठी कादंबरीच्या नायकाची ‘तथाकथित पारंपरिक सर्वगुणसंपन्न’ प्रतिमा त्यांनी मोडीत काढली. त्यांच्या कादंबरीत नायिका तर नाहीच. उलट ‘न-नायकाची’ नवी संकल्पनाच नेमाडेंनी निर्माण केली आणि रुजवली.
‘प्रवासा’चा आदिबंध : नेमाडे यांनी आपल्या लेखनातून विविध कारणांनी सतत फिरणारी, भटकणारी माणसे चित्रित केली. त्या निमित्ताने ‘प्रवास’ हा आदिबंध त्यांनी अतिशय समर्थपणे वापरला. गावागावांतून, खेड्यापाड्यांतून स्वत:ला शोधणारे मन आणि वेगळ्या व्यक्तिरेखा त्यांनी मांडल्या. तथाकथित कार्यकारणभावाला त्यांनी बगल दिली. कालानुक्रमाला छेद दिला. फक्त आत्मप्रामाण्य मानले आणि बदल घडवून आणला. त्यासाठी कादंबरी या साहित्यप्रकाराचा पैस (अवकाश) त्यांनी उत्तम रीतीने वापरला.
‘देशीवादा’चा वाण : नेमाडेंचा ‘देशीवाद’ साहित्यवर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय राहिला. त्यावर वादविवाद जरूर असतील, पण तो अस्सल या मातीतला होता. सार्त्र इत्यादी विदेशी मान्यवरांचे ते अंधानुकरण नव्हते. तर ते सारे ‘पचवून’ या मातीत रुजलेला देशी वाणाचा नायक त्यांनी उभा केला. नेमाडे यांच्या या बहुचर्चित देशीवादावर अनेक वाद झडले.
प्रभावी शैली : कुठलीही आलंकारिकता, कृत्रिमता नसलेली नवी शैली नेमाडेंनी घडवली. कथनाची नवी पद्धत निर्माण केली. कुठलीही रूढ सांकेतिकता त्यांनी नाकारली. अत्यंत स्वाभाविक, बोलीभाषा त्यांनी आपल्याशा केल्या. आजही त्यांची ही भाषा वापरली जाते, यातच त्याचे यश आहे. नेमाडे पूर्वकाळात चमकदार, पल्लेदार लिहून ‘छाप’ पाडण्याची एक पद्धत रूढ झाली होती. अशी ‘चमकोगिरी’ करणे नेमाडे यांनी टाळलेले दिसते. मुख्य म्हणजे काहीही नाकारताना, ते का नाकारत आहोत, याची कारणे त्यांच्यापाशी आहेत, होती. कारण जे नाकारायचे, त्याचाही प्रचंड व्यासंग नेमाडे यांच्याकडे आहे. सर्जनशीलता आणि तर्कसंगत, बुद्धिनिष्ठ चिकित्सक क्षमता, हे दोन्हीही नेमाडेंमध्ये उपस्थित आहेत.
वृत्तिगांभीर्याने लेखन : नेमाडे यांनी नेहमीच लेखन ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट मानली. त्यामुळे संख्येने त्यांचे लेखन कदाचित कमी असेल, पण दर्जामध्ये त्यांनी तडजोड केली नाही. तरीही लेखनाच्या गुणवत्तेमुळे त्यांची पुस्तके आजही सर्वाधिक खपाच्या यादीत सापडतात. ‘कोसला’ची चोविसावी आवृत्ती सध्या बाजारात आहे. चिंतनाशिवाय त्यांनी काही लिहिले नाही. केवळ अंत:स्फूर्तीच्या बळावर अशा ताकदीचे लेखन शक्य नसते, त्यासाठी वर्तमानाचे सजग भान लागते आणि प्रचंड व्यासंग लागतो. हे दोन्ही नेमाडेंपाशी आहे, याचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून येतो. नेमाडे यांचे वैशिष्ट्य म्हणजे मोजक्या पण नेमक्या लेखनासाठी त्यांनी एक ‘दूरस्थपणा’ जाणीवपूर्वक जपला. व्रतस्थपणे ते अनेक गोष्टींपासून लांब राहिले. कशाहीसाठी सहजासहजी उपलब्ध असण्याचे स्तोम त्यांनी कधी माजवले नाही. उलट लेखक हा चांगल्या अर्थाने ‘सेलिब्रिटी’ होऊ शकतो, हे त्यांनी आपल्या पुस्तकांच्या उत्तम खपातून सिद्ध करून दाखवले.
प्रवाहापेक्षा वेगळे, तरीही लक्षणीय आणि जगण्याशी थेट भिडणारे; प्रत्येक घटना, व्यक्ती, वातावरणातले अतिसूक्ष्म बारकावेही टिपणारे आणि त्यापलीकडे वाचकाला समृद्ध अनुभवाकडे नेणारे नेमाडे म्हणूनच ‘सर्वांहुनि निराळे’ ठरतात. आज जी युवा पिढी ‘प्रयोग’ करते, ‘नवे’ करू पाहते, ते करण्याचे बळ नेमाडेंच्या लेखनाने पुरवले आहे.
डॉ. रेखा इनामदार-साने
एसएनडीटी कॉलेज - मराठी विभागप्रमुख, ज्येष्ठ समीक्षक
पुढे वाचा, मान्यवरांच्या प्रतिक्रिया...
ज्ञानपीठ मिळाला तरी मतभेद कायम - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी संमेलनाध्यक्ष
नेमाडेंना घुमानचे आमंत्रण पाठवणार - डॉ. माधवी वैद्य, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा
ऐन पंचविशीत ‘कोसला’ लिहिली - रा. ग. जाधव, ज्येष्ठ समीक्षक, माजी संमेलनाध्यक्ष