आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधिवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संधिवात किंवा आमवाताला वैद्यकीय परिभाषेत आर्थरायटिस म्हटले जाते. याचा अनेक सांध्यांवर परिणाम होतो. यामुळे एक किंवा अधिक सांध्यांवर दुखणे सुरू होते. दुखणे, सूज, सांधे आखडणे ही रोगाची सुरुवातीची लक्षणे आहेत. ही लक्षणे गुडघ्यातील सांध्यात आढळून येतात. आपल्या देशात हा रोग बदलत्या जीवनशैलीमुळे होतो. अशा प्रकारच्या आमवातामुळे पायी चालणे, पायर्‍या चढणे इत्यादी हालचालींवर परिणाम होतो. तसे तर संधिवात १०० प्रकारचे असतात, परंतु ओस्टिओआर्थरायटिस किंवा रुमेटाइड आर्थरायटिसमुळे लोक अधिक त्रस्त असतात. संधिवात हा ज्येष्ठांना होणारा आजार आहे, हे खरे! परंतु काही प्रकार लहान मुलांमध्येही आढळतात. लोकांच्या हालचाली पूर्ववत व्हाव्यात म्हणून बचाव करण्याचे काही उपाय आहेत. गुडघ्यातील संधिवात कसा होतो, यासाठी याची संचरना जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

गुडघा शरीरातील सर्वात मोठा आणि मजबूत सांधा असतो. हा जांघेतील हाडाच्या खालचा भाग आणि पिंढरीच्या हाडाचा वरचा हिस्सा आणि गुडघ्याची वाटी मिळून बनलेला आहे. ही तिन्ही हाडे ज्या ठिकाणी मिळतात, तो भाग एका चिकट पदार्थाने आच्छादलेला असतो. त्यास आर्टिक्युलर कार्टिलेज म्हणतात. हा हाडास केवळ वाचवतोच असे नाही, तर तुम्ही गुडघा दुमडून बसता तेव्हा तेथे एक कुशनिंगही देतो. या कार्टिलेज कुशनच्या दोन भागांस मेनिस्कस असे म्हणतात. ते जांघेतील हाड आणि पिंढरीच्या हाडात शॉक अॅब्झॉर्व्हरचे काम करतात. याच्या कठीण आणि लवचिकपणामुळे हा जोड स्थिर असतो. गुडघा आतून एका आवरणाने झाकलेला असतो. याला सायनोव्हिल मेम्बेरेन असे म्हणतात. हे आवरण सायनोव्हियल फ्लुइड सोडते. यापासून कार्टिलेजला तेलकट पदार्थ मिळतो आणि तो घासला जात नाही.

आर्थरायटिसचे प्रकार
ऑस्टियोआर्थरायटिस - सर्वसाधारणपणे होणारा हा गुडघ्याचा आर्थरायटिस आहे. ५० वर्षे वयातील किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये हा रोग दिसून येतो. ऑस्टियोआर्थरायटिसमध्ये आर्टिकुलस कार्टिलेज हळूहळू घासले जातात. यामुळे तो कोरडा होतो आणि हाडाच्या मधले अंतर कमी होते. या कारणामुळे हाडे घासली जातात. त्यामुळे सांधे दुखू लागतात. ऑस्टिओआर्थरायटिस जडतो आणि दुखणे वाढते.

रुमेटाइड आर्थरायटिस : हा गंभीर आजार आहे. हा अनेक सांध्यांवर हल्ला करतो. यात गुडघ्याचा सांधाही येतो. यात गुडघ्याच्या आतील पातळ आवरणावर (सायनोव्हियल मेम्बरेन) सूज येऊ लागते. यामुळे गुडघ्याचे दुखणे आणि कडकपणा येतो. हा आजार शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर, शरीराच्या टिश्यूजवर हल्ला करते. कार्टिलेज, लिगामेंट्ससारखे सामान्य टिश्यूज नष्ट होतात.

पोस्ट ट्राउमेटिक आर्थरायटिस - हा गुडघ्यावर मार लागल्याने होतो. समजा, एखाद्याचे हाड तुटले आणि त्यामुळे सांध्यावर त्याचा परिणाम होत असेल, तर मार लागून काही कालावधीनंतर आर्थरायटिस होऊ शकतो. मेनिस्कल फाटल्याने अथवा लिगामेंट्समध्ये मार लागल्याने गुडघ्याच्या सांध्यावर परिणाम होऊन आर्थरायटिस होतो.

तपासणीदरम्यान
डॉक्टरांच्या तपासणीदरम्यान सांध्यामध्ये सूज, लालसरपणा, सांध्याची हालचाल, चालण्यात बदल, गुडघ्यावर वजन ठेवल्यास दुखणे आणि इतर लक्षणे दिसून येतात.

चाचण्या कोणत्या असतील
एक्सरे - यात आर्थरायटिस सापडतो. यात तो कुठपर्यंत वाढला आहे, हेही कळते. जर गुडघ्यात संधिवात असेल तर एक्सरेमुळे सांध्यात किती अंतर पडले हे समजू शकते.

अन्य चाचण्या - कधी कधी एमआरआय स्कॅन करण्याची गरज भासते किंवा सीटी स्कॅन केेले जाऊ शकते. यामुळे हाडाची स्थिती आणि गुडघ्याच्या टिश्यूसंदर्भात माहिती मिळते. रक्ताच्या तपासणीद्वारे संधिवाताचा प्रकार समजतो.

उपचार कोणते?
यासाठी अनेक प्रकारचे उपचार आहेत. मात्र, तो वात कोणत्या प्रकारचा आहे यावर बरेच काही अवलंबून असते.

शस्त्रक्रियेविना उपचार
सुरुवातीला ऑपरेशनविना उपचार करता येतात. डॉक्टर जीवनशैलीत बदल करण्यास सांगतात. यात पायर्‍या चढू नका, असा सल्ला देतात. जॉगिंग वगैरे सोडून सायकलिंग किंवा स्विमिंग करण्यास सांगतात. त्याचबरोबर वजन घटवण्यास सांगितले जाते.

फिजिओथेरपी
यात अनेक प्रकारच्या हीट ट्रीटमेंट आहेत. उदा. शार्टवेव्ह डायथर्मी, अल्ट्रासाउंड इत्यादी यामुळे दुखणे आणि सूज कमी होते. त्याचबरोबर पायाच्या मांसपेशी मजबूत करण्यासाठी काही विशिष्ट व्यायाम सांगितले जातात. याशिवाय गुडघ्यावर वजन पडू नये म्हणून काही लोक काठी घेऊन चालतात. अन्य उपचारांत गरम पाणी किंवा बर्फाने शेकले जाते. त्याशिवाय इलास्टिक बँडेज किंवा बाम लावला जातो. प्रत्येक व्यक्तीवर वेगळे औषध लागू पडते. ग्लोकोसेमाइन आणि काँड्राइन सल्फेट घ्याव्या लागतात. त्या नैसर्गिकरीत्या जॉइंट कॉर्टिलेजमध्ये आढळून येतात.

गुडघ्यात इंजेक्शन
कार्टिकोस्टेराॅइड्स किंवा कार्टिसोनचे इंजेक्शन सांध्यात दिले जाते. यामुळे दुखण्यापासून सुटका होते. तथापि, याचा परिणाम दीर्घ काळ राहीलच असे नाही. तुमचे डॉक्टर इंजेक्शन किती द्यायचे ते ठरवतात. कारण साइड इफेक्टची शक्यता असते. याबरोबरच विस्कोप्लिमेंटेशनमध्ये हायलुरॉनिक अॅसिड इंजेक्ट केले जाते. अशा प्रकारचे अॅसिड नैसर्गिकरीत्या सांध्यात असते. यामुळे लुब्रिकेशन वाढते आणि दुखणे कमी होते. या इंजेक्शनचा परिणाम तात्पुरता असतो.

सर्जिकल उपचार
यानंतरही आराम पडला नाही, तर ऑपरेशन केले जाते.
ऑर्थोस्कोपी - गुडघ्यात संधिवात होण्याची सुरुवातीच्या स्टेजलाच सर्जरी केली जाते. यात हलका छेद घेऊन याची लागण झालेल्या भागाचे मूळ सोडवले जाते. रुग्णाला लगेच सुटी दिली जाते.

ऑस्टेओटॉमी- अशा प्रकारचे ऑपरेशन ओस्टिओआर्थरायटिसच्या सुरुवातीच्या स्टेजलाच केले जाते. जर एक गुडघा खराब झाला असेल, तर याचा वापर केला जातो.

गुडघा बदलणे
ही प्रक्रिया ज्यांच्यात संधिवात खूप वाढला आहे, त्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. यात खराब कार्टिलेज आणि हाडाचा पृष्ठभाग बदलून धातूचा लावला जातो. यात प्लास्टिक लायनर असते. हा यशस्वी उपचार मानला जातो. यानंतर रुग्ण पायर्‍या चढू शकतो. खालीही बसू शकतो.

डॉ. सुजित कोरडे
एमएस (ऑर्थो), एमसीएच ऑर्थो (लिव्हरपूल), एफआरसीएस (एडिन), कन्सल्टंट ऑर्थापेडिक सर्जन, बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई.