आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Sunil Kumar Lawate Article About Marathi Bhasha Din, Divya Marathi

साहित्यानुवाद : मराठीचा वैश्विक परिचय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आपली भाषा व साहित्य परंपरा इंग्रजांना पर्यायाने जगाला कळावी म्हणून भाषांतराचे प्रयत्न सुरू झाले. प्राचीन काव्यानुवादाने हे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते. जनार्दन बाळाजी मोडक यांनी 1889 मध्ये प्राचीन काव्यावर आधारित मराठी पोएम्सची रचना केली.

1895मध्ये वामन दाजी ओक यांनी ‘ए कलेक्शन ऑफ मराठी पोएम्स’ची रचना केली. या रचना वाचून तत्कालीन मिशनरी, इंग्रज अधिकारी, भाषांतरकार यांनी प्रेरणा घेऊन मराठी भाषा व साहित्याचा अभ्यास सुरू केला. एकवर्थ यांचे बॅलड्स ऑफ मराठा, ऑर्थर ली नाईट यांचे टोल्ड इन इंडियन ट्विलाइट या पुस्तकांमुळे मराठी लोककथा आणि पोवाड्यांचा परिचय जगाला प्रथमच झाला. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात जस्टिन अ‍ॅबट यांनी मराठी संत काव्याचे भाषांतरकार म्हणून लौकिक मिळवला. त्यांचे पोएट सेंट्स ऑफ महाराष्ट्र ही पुस्तक मालिका प्रसिद्ध आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेत अन्य इंग्रज अधिकार्‍यांनीही मराठी संतांच्या रचना अनुवादित केल्या. स्वातंत्र्योत्तर काळात मराठी आधुनिक कवितेच्या इंग्रजी भाषांतराचे युग सुरू झाले. संत तुकारामांच्या अभंगांचे त्याआधी व नंतरही अनेक अनुवाद झाले. मर्ढेकर, कोल्हटकर अशा मान्यवरांच्या कवितांचे अनुवाद होऊन मराठी कविता जागतिक स्तरावर पोहोचली. कवितेचा मूळ अर्थ अनुवादित करणं हे नेहमीच शक्य नसल्याने आशय पोहोचवण्यासाठी हे अनुवाद उपयोगी येतात.

याशिवाय मल्लिका अमर शेख, प्रभा गणोरकर आदींच्या कविताही अनुवादित झाल्या आहेत. अटलांटिक क्वार्टरली, लिटररी ऑलिंपिक्सश्चसारख्या साहित्यिक नियतकालिकांमधूनही मराठी कवितांची भाषांतरे प्रसिद्ध होत असतात.

मराठी साहित्याचा जगाला परिचय होण्याचा प्रारंभ नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, साहित्य अकादमीसारख्या संस्थांनी आपल्या योजनांतून मराठी साहित्याची भाषांतरे इंग्रजी व सर्व भारतीय भाषांत करून मराठी साहित्यास एकाच वेळी भारतीय व वैश्विक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कादंबरी, नाटकांच्या तुलनेत कथांचे फार अनुवाद मात्र झाले नाहीत. वि. स. खांडेकरांच्या कथा या अनेक भारतीय भाषांत प्रसिद्ध झाल्या आहेत. इंग्रजी भाषिक अनुवादक जेव्हा अनुवाद करतो तेव्हा त्याच्या सांस्कृतिक आकलन व भाषिक आशय शब्दांत पकडायच्या क्षमता मर्यादित असतात. मराठी अनुवादक जेव्हा भाषांतर करतो तेव्हा हा दोष बराच कमी होतो. मराठी साहित्यातील नाटके व आत्मकथा हे असे साहित्य प्रकार होत की, जे अन्य भाषांना प्रयोग, शैली, समस्या, विषय अशा अनेक अंगांनी देणगी, योगदान देताना दिसतात. नाटकांमध्ये विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, गो. पु. देशपांडे यांची नाटके मोठ्या प्रमाणात अनुवादित झाली आहेत.
या अनुवादांमुळे मराठीचा भारतीय व वैश्विक पातळीवर परिचय होत गेला, होतो आहे. पण, केवळ इंग्रजीतच नाही तर अन्य भाषांतही ती अनुवादित होणे गरजेचे आहे.

डॉ. सुनीलकुमार लवाटे, कोल्हापूर शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, लेखक, अनुवादक आणि सामाजिक कार्यकर्ते
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील वि. स. खांडेकर संग्रहालयाचे संचालक, संस्थापक.
‘खाली जमीन वर आकाश’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध.
संपर्क : ९८८१२५००९३