आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एवढय़ा ओलाव्याची सवय का लावलीस?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोण कसला एक सूर्य म्हणे. त्याची कोणत्या एका ग्रहावर टक्कर झाली म्हणे.. (तेव्हा पण ट्रॅफिक जाम होतं वाटतं.) सूर्यापासून तुकडा तुटला, ब्रह्मांडात फिरत राहिला आणि ही ही ही.. पृथ्वी जन्मली. निसर्गातला हा घोळ आम्ही का सहन करायचा?

हे बघ, मला तो ‘चंद्र’ आहे ‘चंद्र’ तो जरा बरा वाटतो. कारण तो शांत आहे. तो कुणाच्याही भांडणात पडत नाही. पण आता तिथेपण ‘तुझा’ शोध लागलाय. तिथेही काही वर्षात ‘भांडणं’ लागतील. तुला कल्पना नसेल पण तुझ्यासाठी खरंच खूप खूप भांडणं होताहेत रोज..

आधी हवेत फिरायचं, मग ढगाचं सोंग घेऊन आकाशातून जमिनीवरच्या लोकांची चेष्टा-मस्करी करत तरंगायचं. जिथं गरज नाही तिथं भरमसाट बरसायचं. जिथं गरज आहे तिकडं ढुंकूनसुद्धा पाहायचं नाही, ही काय पद्धत झाली? होय रे..

ऋषींना तपश्चर्या करायला लावायची. मग शंकराच्या जटेत उडी मारायची. पृथ्वीवर ‘अवतरण’ करायचं. मग लोक तुझी पूजा करणार, तुला हार-फुलं, नारळ वाहणार. तुला ‘पवित्र’ समजून तुझं तीर्थ म्हणून प्राशन करणार! तू पवित्र म्हणून प्रसिद्ध झालास आणि तिथूनच सगळा घोळ सुरू झाला.

किती किती भाव खाणार आहेस? बर्फ म्हणून तू छान रुबाबदार दिसतोस. पण सूर्याला पाहत पाघळतोस, पळून जातोस. असा कसा रे भित्रा आहेस तू?

एक मात्र सांगतो. तू पर्वतातून वाहात होतास, नदीतून वाहत गेलास, तेही ठीक होतं. नाले, कालवे, ओढे, विहिरी यांच्यात होतास तोपर्यंतसुद्धा चांगलं चाललं होत तुझं. एवढंचं काय? घराच्या ‘आडात’ होतास ना तोपर्यंत तुझी ‘काळजी’ वाटत नव्हती मला. तू हंड्यात, कळशीत, रांजणात होतास तोपर्यंत मी निर्धास्त होतो. तू ज्या दिवशी ‘बाटली’त बंद झालास ना.. त्यादिवशीपासून तू फारच गढूळ झालास.

‘उगम’ होताना स्वच्छ आणि समुद्राला मिळताना एवढा ‘गढूळ’ आणि विद्रूप का होतोस तू ? अरे, तुला तुझी ‘फिगर’ मेंटेन करणं जमत नाही का? आम्ही बघ, फिगर मेंटेन करण्यासाठी किती धडपडतो.

तो ‘सूर्य’सुद्धा तुला ओढून नेण्याची कारस्थानं करतोय. त्यालाही बघून घेऊ एकदा. सूर्याला सांग, स्वत:च्या र्मयादेत राहा म्हणावं. पृथ्वीकडे वाकडी नजर टाकली तर अटक करीन. स्त्रियांना पूर्ण संरक्षण देण्याचा कायदाच आम्ही केलाय, संपूर्ण संरक्षण खातं, पोलिस, सगळे पाठवून ‘अटक’ करून शिक्षा देईन. अरे ‘ग्लोबल व्ॉार्मिंग’ची भीती कुणाला दाखवतोस म्हणावं.

हे बघ, तू संपत चाललाय म्हणून ‘दुष्काळ’ आलाय. त्याला तू ‘आमंत्रण’ देऊन बोलावून आणलंयस लक्षात ठेव. दुष्काळाला तूच जबाबदार आहेस. असो, लोकसंख्या तुझ्यामुळे वाढली, इमारतींच्या बांधकामात तूच धावून आलास. तुझ्याच नदीची वाळू तू आम्हाला दिलीस. आता बांधकाम वाढल्यावर ‘मी येत नाही’, ‘मी संपत आलोय’, असे एसएमएस पाठवतोस. लाज वाटत नाही का तुला?

मी तुझ्याशी एवढं बोलतोय, माझ्या घशाला कोरड पडलीय, आता तरी येणार आहेस की नाही? घसा ओला करायला? एवढय़ा ओलाव्याची सवय का लावलीस. आम्ही कोरडे राहिलो असतो तर फार बरं झालं असतं.

एवढं तुझ्याबद्दल बोलणं मला परवडणारं नाही. पण काय करणार, होळी आली, धुळवड आली, रंगपंचमी आली. आता तुझं महत्त्व अजून वाढणार. धुळवडीला ‘चिखल’ तुझ्यामुळे होतो. मग ‘चिखलफेक’ एक मेकांवर कशी करायची हा खरा प्रश्न आहे. अरे अरे रंग कशात कालवायचा, फवारायचा कसा? तू पाहिजेस ना तिथे.