आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांतिगिरींवरील ‘प्रकाश’ झोताने काँग्रेसमध्ये संघर्षाचे वारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस हा धर्मनिरपेक्षतेची माळ जपणारा आणि हिंदुत्ववादाच्या विरोधात सूर लावणा-यांचा पक्ष असल्याचे चित्र दिसत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. त्याची अनेक उदाहरणे इतिहासात पाहण्यास मिळतात. वर्तमानात अनुभवता येतात. शाहबानो प्रकरणात मुस्लिमांच्या मतांसाठी लोटांगण घालणा-या काँग्रेसने आयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे उघडण्याची चालही खेळली. बाबरी मशिदीच्या पतनातही काँग्रेसचे बडे नेते अप्रत्यक्षरीत्या सहभागी होते. अनेकांचा अडवाणींच्या रथयात्रेला छुपा पाठिंबाही होता. मशिदीचे पतन होत असताना तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव मूकसाक्षीदार म्हणून सारे काही न्याहाळत होते, असे लिबरहान आयोगासमोरील साक्षींमध्ये नोंदवण्यात आले आहे. कोणताही मुस्लिम, दलित, ख्रिश्चन नेता कधीच लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊ शकणार नाही, याची काळजीही काँग्रेसकडून घेतली जाते. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले हे त्याचे महाराष्ट्रातील सर्वोत्तम उदाहरण आहे. अंतुलेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार करण्यासाठी काँग्रेसच्या दिग्गजांनीच शक्ती पणाला लावली होती. गेल्या काँग्रेस राजवटीत त्यांना अल्पसंख्याकमंत्री केल्यावर त्यांना कारभार करता येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली.


हे सारे आठवून सांगण्याचे कारण म्हणजे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून सुरू असलेल्या हालचाली. गेल्या वेळी अपक्ष म्हणून लढलेल्या शांतिगिरी महाराजांना यंदा शिवसेनेचे बलाढ्य समजले जाणारे उमेदवार, विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी रविवारी (21 जुलै) वेरूळ येथे महाराजांची भेट घेऊन महाराजांना प्रकाशझोतात आणले आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. हिंदुत्ववादाकडे झुकलेल्या महाराजांना कशासाठी राजकारणात आणले जात आहे. त्यांचे महत्त्व का वाढवले जात आहे. एकीकडे धर्मनिरपेक्षता, हिंदुत्वविरोधात सूर लावायचा दुसरीकडे प्रचंड संख्येने हिंदू अनुयायी असलेल्या महाराजांना उमेदवारी का द्यायची, असा सवाल खासगीमध्ये दबक्या आवाजात नेतेमंडळी विचारत आहेत. औरंगाबादेत मुस्लिमांची एकगठ्ठा मते काँग्रेसच्या पदरात काहीही न करता पडत असताना त्यांना दुखावत महाराजांना रिंगणात का आणले जात आहे, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यातून पुढील संघर्षाची बीजे रोवली जात आहेत.


* खैरेंच्या पथ्यावर :
मोहन प्रकाश काँग्रेसमधील चाणाक्ष आणि मुरब्बी नेते मानले जातात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांचा अभ्यास सुरू केला आहे. वर्षानुवर्षे शिवसेना-भाजपच्या ताब्यातील मतदारसंघ काँग्रेसकडे कसे येऊ शकतात, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. राजकारणात सारे काही माफ असते आणि जागा जिंकायची असेल तर वेळप्रसंगी हिंदुत्ववादाचा पुकारा करावा लागला तरी चालेल, असे काँग्रेसचेच सूत्र असल्याने त्यादृष्टीने त्यांची औरंगाबादेत पावले पडत असल्याचे दिसते. त्यामुळेच त्यांनी शांतिगिरी महाराजांचा पर्याय चाचपडून पाहणे सुरू केल्याचे सांगण्यात येते. या मतदारसंघात दलित-मुस्लिमांची एकगठ्ठा मते काँग्रेसच्या झोळीत पडतात. त्यात दोन-अडीच लाख हिंदूंची मते पडली तर विजय प्राप्त होऊ शकतो, असे गणित त्यांनी मांडले आहे. दुर्दैव म्हणजे हिंदूंची एवढ्या मोठ्या संख्येने मते घेऊ शकेल असा एकही नेता त्यांना काँग्रेसमध्ये दिसत नाही, कारण पक्ष बलाढ्य आणि नेते गडगंज असले तरी त्यांच्यातील वैयक्तिक हेव्यादाव्यांनी परमोच्च बिंदू प्राप्त केला आहे.
नाना मते निर्माण जाहली, नाना पाषांडे वाढली
नाना प्रकारीची उठिली नाना बंडे,
जैसा प्रवाहो पडलि
तैसाच लोक चालिला, कोण वारील कोणाला, येक नाही
पृथ्वीचा जाला गळांटा, येकाहून येक मोठा
कोण खरा, कोण खोटा, कोण जाणे (दासबोध)
अशी काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था आहे आणि ती गेल्या तीन निवडणुकांपासून खैरेंच्या पथ्यावर पडत आहे. आता मोहन प्रकाशांनी शांतिगिरी महाराजांना उमेदवारी मिळवून दिली तरी त्याचा खैरेंनाच फायदा होण्याची शक्यता अधिक आहे.


* बाबा शक्तिमान पण...
साधू, महंत, महाराजांनी समाजाला दिशा द्यावी, मार्गदर्शन करावे असे अपेक्षित असते. कारण राजकारणातील चिखल त्यांच्या अंगाला लागू नये, असे भक्तगणांना वाटते. मात्र, भाजपने बाबरी मशीद प्रकरणानंतर अनेक संत, महंतांना निवडणुकीत उतरवले व विजयी केले. काँग्रेसनेही त्याचे अनुकरण करण्याचे ठरवले असावे. मोहन प्रकाश यांच्या सूत्रामागे शांतिगिरी महाराजांची शक्ती आहे. गेल्यावेळी महाराजांनी त्यांचे एकेकाळचे भक्त असलेल्या खैरेंना जेरीस आणले होते. निवडणूक प्रचाराच्या काळातच नव्हे, तर मतदानाच्या अखेरपर्यंत बाबांमुळे खैरे पडणार, असे वाटत होते. प्रत्यक्षात खैरेंना त्याचा फायदाच झाला, असे निकालावरून लक्षात येते. एकप्रकारे गुरूने शिष्याला मदतच केली. यासोबत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनीही मित्र कर्तव्य पार पाडले होते. आता बाबा काँग्रेसकडून लढले तर बाबांचे अनुयायी, काँग्रेसचे पारंपरिक मतदार असा लोण्याचा गोळा अलगद मतपेटीत पडेल, असे वरवर सोपे वाटणारे समीकरण आहे. मात्र, त्यात गेल्या पाच वर्षांपासून पक्षाच्या वाढीसाठी तळमळीने प्रयत्न करणा-या नेत्यांचा विचार झालेला नाही. 2010 मध्ये थोडक्यात पराभव स्वीकारावा लागणारे उत्तमसिंह पवार, प्रभावी नेतृत्व म्हणून अलीकडे उदयास आलेले डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील, त्यांचे सुपुत्र नितीन पाटील यांना बाजूला ठेऊन शांतिगिरी महाराजांना पुढे करण्यात आले तर त्याने विजयातील अडचणी कमी होण्याऐवजी वाढणार आहेत, हे नक्की. खरे तर शिवसेना, भाजप आणि मतदारांमध्ये खैरेंविषयी फारसे अनुकूल मत नाही. मात्र, त्याचा फायदा घेण्यासाठी मोहन प्रकाशांना शांतिगिरी महाराजांवरील प्रकाशझोताची तीव्रता नेमकी किती ठेवायची याचा अभ्यास करावा लागणार आहे.