आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial Article About Kujbuj, Politics Issue In Maharashtra

कुजबुज: ‘बार’ कोणाचा उडाला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फटाक्यांचा आवाज कानी पडल्यानंतर ‘बार’कोणाचा वाजला, महायुतीची उमेदवारी जाहीर झाली का? अशी कुजबुज मागील आठवडाभरापासून उस्मानाबादकरांमध्ये सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे अर्धा डझन शिवसेना नेते मातोश्रीवर उमेदवारी मिळावी यासाठी तळ ठोकून बसले आहेत. प्रारंभी शिवसेनेच्या उमेदवारांत एकमत न झाल्याने उस्मानाबादची जागा भाजपला सुटल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू होती. आता सेना नेत्यांमध्ये एकमत झाले असून पक्षश्रेष्ठी जो उमेदवार ठरवतील तो मान्य असेल, असे उमेदवारीच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांनी शपथपूर्वक सांगितले आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यात सध्यातरी काही अडचण नाही! त्यामुळे कोणत्याही फटाक्यांचा आवाज ऐकू आल्यानंतर उमेदवारी जाहीर झाली का, याची राजकीय वर्तुळातून खातरजमा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे खातरजमा करणार्‍यांमध्ये महायुतीपेक्षा विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे.

जेव्हा राज ठाकरे भडकतात...
लोकसभा लढवावी किंवा नाही या विवंचनेत असलेल्या राज ठाकरेंना सध्या विविध क्षेत्रातले लोक भेटायला येताहेत. राजकीय नेत्यांचा ओघ ताकदवान राजकीय नेत्याकडे लागलेलाच असतो. तसाच तो सध्या राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी लागला आहे. गुरुवारीसुद्धा राज ठाकरे असेच एका भेटायला आलेल्या दैनिकाच्या संपादकांना सोडायला निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर आले तर समोर इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचे दोन तीन कॅमेरे ट्रायपॉडवर सज्ज होते. त्यांना पाहताच राज ठाकरेंनी बहुदा ‘आज मी बोलणार नाही आपण निघा ’, अशा आशयाची खूण केली आणि ते वर निघून गेले, पण माध्यमांचे प्रतिनिधी काही तसूभरही हलले नाहीत. थोड्यावेळाने कृष्णा खोरे महामंडळाचा एक बडा ‘अविनाशी’ कंत्राटदार त्यांना भेटायला आला. तेही या कॅमेराने टिपले. आता मात्र राज यांचा पारा चढला. कदाचित आणखीही काही लोक त्यांना भेटायला येणार असावेत म्हणून ते रागावले असावेत. ‘दिवस रात्र इथे उभे असता, माझी जासूसी करता काय’, असे म्हणत राज यांनी पत्रकारांना चांगलेच खडसावले, पण तरीही जागचे हलतील तर ते पत्रकार कसले. थोड्यावेळाने विनय कोरे, जयंत पाटील आणि अपूर्व हिरे हे त्रिकूट राजना भेटायला आले. तेव्हा कुठे राज का रागावले याचे कोडे पत्रकारांना उलगडले.

कडक स्वभावाचे अधिकारी आलेत
उस्मानाबादच्या राजकारण्यांना प्रशासकीय कारभारात हस्तक्षेप करता यावा, अशी स्थिती गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत तयार झाली होती. जिल्हाधिकार्‍यांचा प्रशासकीय वचक पुरता संपला होता. यंत्रणेला जाग आणण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेत होते. त्यामुळे कधी लोकप्रतिनिधीच प्रशासकीय कारभार चालवितात की काय, अशी स्थिती होती. मात्र, रुजू झालेले जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नव्या दमाने कारभाराला सुरुवात केली. अत्यंत कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी पदभार घेताच दोन दिवसांतच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. त्याचा परिणाम झाला. एक स्वयंघोषित संघटनेचा नेता जिल्हाधिकार्‍यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेला. मात्र, आतून निरोप आलाच नाही. त्यामुळे काही वेळ दारातच बसून राहिलेला हा नेता वैतागला आणि थेट शिपायाला दम भरू लागला. हा आवाज ऐकून जिल्हाधिकार्‍यांचे स्वीय सहायक आले, त्यांनी ‘हळू आवाजात बोला, कडक स्वभावाचे साहेब आलेत’, असे सांगितले. त्यानंतर मात्र नेत्याचा आवाज पडला आणि नंतर येतो, असे म्हणून त्याने निरोप घेतला.

साहेबांचा डाव यशस्वी?
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याची; पण राजू शेट्टींच्या विरोधात लढायचे, म्हणजे आत्महत्याच करण्याचा प्रकार. ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीतील काही ‘हितचिंतकां’नी हातकणंगलेतून जयंत पाटील यांना उमेदवारी द्यावी, म्हणून पवार यांना सुचवले, पण गांधीजींचे ग्रामविकासाचे स्वप्न साकार करण्याचा विडा उचललेल्या जयंत पाटलांनी राज्यातील गावन् गाव स्वयंपूर्ण झाल्याशिवाय देशाच्या राजकारणात जायचे नाही, असा पणच केला. लोकसभेची आफत टाळण्यासाठी साहेबांनी शक्कल लढवून संपूर्ण मतदारसंघात काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे हेच या जागेसाठी कसे योग्य आहेत, हे सांगण्यासाठी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा केला. आता साहेबांचा हा डाव कितपत यशस्वी होतो, हे दोनच दिवसांत स्पष्ट होईल.

काकांचे इलेक्टिव्ह मेरिट
सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपने गेल्यावेळी उमेदवारीच मागे घेतली होती तर या वेळी दुसर्‍या पक्षातून उमेदवार आणून निवडणूक लढवली जात आहे. वास्तविक या वेळी मोदी लाटेत भाजपने एखाद्या निष्ठावान, स्वच्छ प्रतिमेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती तरी तगडा मुकाबला झाला असता; पण भाजपच्या नेत्यांना ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असलेला उमेदवार हवा होता. मग त्यांना संजयकाकाइतका जबरदस्त ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असलेला अन्य कोणीही उमेदवार दिसला नाही. अगदी संघाच्या तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्यांनाही ‘काका’च कसे योग्य आहेत, हे पटवून देण्यात भाजपचे नेते यशस्वी ठरले. कदाचित त्यांनाही काकांच्या इलेक्टिव्ह ‘गुणां’चा हेवाच वाटला असेल.
(राम खटके, विनोद तळेकर , चंद्रसेन देशमुख , समाधान पोरे)