आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल : व्हिडिओद्वारे सलमान खान यांची यूट्यूबची अभिनव शाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी नागरिक असलेल्या सलमान खान यांनी यूट्यूबवर गणित, विज्ञान, अर्थशास्त्रासह अनेक विषयांवर शेकडो लेक्चर्स तयार केली आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षकांमार्फत वर्गात शिकवण्याच्या पारंपरिक पद्धतीत त्यांना बदल घडवायचा आहे. जगभरातील लाखो विद्यार्थी त्यांचे व्हिडिओ पाहून अभ्यास करत आहेत. तथापि त्यांच्या या कल्पनेवर शिक्षणतज्ज्ञांचा एक वर्ग नाखुश आहे.
अमेरिकेतील एका शाळेत पाचवीची मुले आपल्या डेस्कवर ‘नेट बुक’ घेऊन बसली आहेत. शाळेचे नाव आहे ईस्ट पालो आल्टो, कॅलिफोर्निया. शिक्षक त्यांना गणिताचे बारकावे शिकवत आहेत. तेथून सात हजार मैल अंतरावर आफ्रिकेतील घाना देशात अंकरा येथे स्कूल आॅफ एक्सलन्सचे विद्यार्थीही गणित शिकत आहेत. कॅलिफोर्नियातील विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षकच त्यांनाही शिकवत आहेत. विद्यार्थ्यांचे हे दोन्ही गट आॅनलाइन व्हिडिओ पाहूनच शिकतात. पडद्यावर गुणाकार, भागाकार आणि आकृत्या दिसतात; पण शिक्षकाचा चेहरा दिसत नाही. फक्त एक धीरगंभीर आवाज ऐकू येतो.
हा आवाज आहे 35 वर्षीय सलमान खान यांचा. ते पूर्वी हेज फंड मॅनेजर होते. आता ते जगभरातील लाखो लोकांना यूट्यूबवर शिकवतात. खान अकादमीच्या आॅनलाइन संग्रहात 3250 डिजिटल व्हिडिओ आहेत. तंत्रज्ञानातील महारथी, शिक्षणतज्ज्ञ आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना तर ते कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी वाटत नाहीत. क्रेब्ज सायकल (सायट्रिक अ‍ॅसिड सायकल) आणि सेल मेटॅबॉलिझमवरील (उतींचा चयापचय) त्यांचे 18 मिनिटांचे लेक्चर 6 लाख 75 हजार वेळा पाहिले गेले आहे. वेबवरील आतापर्यंतचे ते सर्वात प्रसिद्ध शिक्षक असले तरी खान समाधानी नाहीत. त्यांना वर्गातील शिक्षकाच्या भूमिकेत मूलभूत परिवर्तन घडवायचे आहे. गृहपाठाच्या तत्त्वाची नवी व्याख्या करण्याचीही त्यांची इच्छा आहे. त्यांनी बिल गेट्स, गुगलचे एरिक स्मिड आणि इतर काही अब्जाधीशांना आपल्या बाजूने वळवले आहे.
तसे पाहिले तर शिक्षण क्षेत्रात सुधारणा करणे महाकठीण कर्म. तंत्रज्ञानाधारित शिक्षणावर सगळीकडेच शंकाकुशंका व्यक्त केल्या जातात. संशोधन संस्था गार्टनरकडील माहितीनुसार अमेरिकेत मागील वर्षी शिक्षणासाठी तंत्रज्ञानावर 3.61 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले असूनही अनेक विद्वानांचे म्हणणे आहे की, त्याचा काही फायदा झाल्याचे सबळ पुरावे नाहीत.
या नव्या पाठशाळेत आपले काय होईल, असे वाटणाºया जुन्या, अनुभवी शिक्षकांच्या विरोधाला खान यांना तोंड द्यावे लागत आहे. सर्वात मोठा आक्षेप खुद्द खान यांच्यावरच आहे. कारण त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे; पण ते स्वत: शिक्षक नाहीत. त्यांना मुलांबरोबर काम करण्याचा अनुभव नाही. प्रश्न असा आहे की, ज्या माणसाने पैशाच्या हिशेबात जास्त काळ घालवला आहे, अशा माणसाच्या सांगण्यावरून विद्यार्थी आणि शिक्षक शेकडो वर्षे जुनी शिक्षण पद्धती बदलतील का?
क्लिक करा, वाचा आणि शिका- इकडे माउंटन व्ह्यू केलिफमध्ये चहाच्या दुकानावरील कार्यालयात सलमान खान आपल्या आॅनलाइन श्रोत्यांसाठी नवा धडा तयार करीत आहेत. त्यांचे कार्यालयच एक वर्ग आहे. त्यात पाठ्यपुस्तके आणि कादंबºयांचे ढीग आहेत. त्यांचा फळा म्हणजे काळ्या रंगाचा वायकॉम कॉम्प्युटर टॅब्लेट आहे. टेलिफोनच्या जुन्या खांबाच्या डेस्कवर हा कॉम्प्युटर ठेवला आहे. खान अकादमीच्या व्हिडिओंची ओळख ठरलेल्या रंगीत आकृत्या आणि समीकरणे ते संगणकावर काढतात. आजचा पहिला धडा मायक्रोइकॉनॉमिक्सच्या मालिकेतील पहिला भाग आहे. यात बाजारातील चढ-उतारादरम्यान माणसाच्या आशा, निराशा, भीती या भावना आणि शेवटी दिलासा मिळण्याबाबत चर्चेचा समावेश आहे. ते गुगलवर काही आलेख शोधतात. अर्थशास्त्राच्या पुस्तकाची काही पाने चाळतात. नंतर बटन दाबून रेकॉर्डिंग सुरू करतात. ते पडद्यावर बिझनेस चक्राचे स्केच काढतात. सोबत माइकवर लेक्चर सुरू असते. दोन मिनिटे थांबून ते चुका तपासतात. ते आधीपासूनच लिहून काही बोलत नाहीत. ते म्हणतात की, ‘मी काय बोलणार ते सुरुवातीला मलाच माहीत नसते.’ त्यांचे व्हिडिओ प्रभावी होण्याचे हे एक कारण आहे. विद्यार्थ्यांना वाटते की, जणू त्यांच्यासमोर बसून एखादा शिक्षक त्यांना शिकवत आहे. 11 मिनिटांचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर खान आपले ई-मेल चेक करतात.
सर्व काही मोफत- सलमान खान यांचा मायक्रो इकॉनॉमिक्सचा व्हिडिओ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांच्या शाळेत अंतराळ विज्ञान, रसायनशास्त्र, संगणकशास्त्रापासून सर्व काही आहे. खान यांची आॅनलाइन लेक्चर्स सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहेत. सध्या मात्र ते त्याही पुढे जाऊन विचार करीत आहेत. विद्यार्थ्यांना वयानुसार ग्रेड, क्लासमध्ये टाकण्याची गरज नाही. त्यांना त्यांच्या मर्जीने शिकू द्यावे, असे त्यांना वाटते. मागचा धडा पूर्ण समजल्यानंतरच दुसरा धडा हाती घ्यावा. व्हिडिओवर होमवर्क करावा आणि नंतर आपण जे शिकलो त्याचा वर्गात जाऊन सर्वांसमोर तपशील द्यावा. यात शिक्षकाला वर्गात जाऊन लेक्चर देण्याची गरज पडणार नाही. त्याची भूमिका मार्गदर्शकाची असेल. लेक्चरऐवजी ते विद्यार्थ्यांकडे व्यक्तिश: लक्ष देऊ शकतील.
शाळेत पुस्तके- विसाव्या शतकाच्या आरंभी ‘लवकरच शाळांमधून पुस्तके हद्दपार होतील. विद्यार्थ्यांना दृश्य प्रतिमांद्वारे शिकवले जाईल.’ अशी भविष्यवाणी थॉमस एडिसनने केली होती. 1920 मध्ये रेडिओद्वारे शिक्षण सुरू झाले होते. 90 च्या दशकात संगणकांचे आगमन झाले. 1984 मध्ये अमेरिकेतील सरकारी शाळांमध्ये 92 विद्यार्थ्यांत 1 संगणक होता. 2008 मध्ये हे प्रमाण 3.1 विद्यार्थ्यांत एक संगणक असे होते.
अशी सुचली कल्पना- सलमान खान यांना मित्र आणि चुलत बहिणीकडून शिक्षणाच्या नव्या तंत्रावर प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाली आहे. खान यांनी शाळा सोडून आपला अभ्यासक्रम तयार केला. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. एमबीए केल्यानंतर त्यांना एका छोट्या हेज फंडात अ‍ॅनॅलिस्टची नोकरी मिळाली. दरम्यान, चुलत बहीण नादियाला आपला बीजगणिताचा गृहपाठ करण्यासाठी त्यांची मदत हवी होती. त्या वेळी खान बोस्टनमध्ये होते आणि नादिया न्यू आर्लियन्समध्ये राहत होती. त्यामुळे त्यांनी ऑनलाइन मदत करायचे ठरवले. याहू मेसेंजर चॅट सर्व्हिसवर डूडल नावाच्या टूलने खान धडे तयार करू लागले. दरम्यान, एका मित्राने हे धडे व्हिडिओ रूपात रेकॉर्ड करून यूट्यूबवर अपलोड करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला खान यांनी उत्सुकता दाखवली नाही. मात्र, नंतर ते तयार झाले. या कल्पनेने भरारी घेतली. यूट्यूबवर तीन तासांत जे मिळाले ते तीन वर्षे गणिताच्या वर्गातही शिकायला मिळाले नव्हते, अशा प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवल्या.
दात्यांचा हातभार- 2009 मध्ये खान यांनी नोकरी सोडून आपल्या घरातील एका खोलीत खान अकादमीची सुरुवात केली. 2010 मध्ये सिलिकॉन व्हॅलीचे व्हेंचर कॅपिटलिस्ट जॉन डोएर यांची पत्नी एन डोएर यांनी खान यांच्या कल्पनाशक्तीने प्रभावित होऊन एक लाख डॉलर दान केले. अकादमीची ख्याती पसरायला वेळ लागला नाही. एका कार्यक्रमात बिल गेट्स यांनी सलमान यांच्या कल्पनेची प्रशंसा केली. त्यांना सिअ‍ॅटल येथे बोलावले आणि 8.25 कोटी रुपये दिले. नंतर गेट्स यांनी 22 कोटींपेक्षा जास्त निधी दिला. गुगलने 11 कोटी रुपये, नेट फ्लिक्सचे सीईओ रीड हेस्टिंग्ज यांनी 16.50 कोटी रुपये आणि आयरिश उद्योगपती सीन ओ सलीवन यांनी 27.50 कोटी रुपये दान केले.
खान अकादमीच्या शैक्षणिक उपयुक्ततेबाबत शिक्षणतज्ज्ञांचे एकमत नाही. उदाहरणार्थ दोन विद्यार्थी अगदी वेगवेगळी कौशल्ये शिकून पदवीधर होतील. एक जण कॅल्क्युलसमध्ये मास्टर असेल तर दुस-याला फक्त अल्जेब्राच येईल. हुशार विद्यार्थी पुढे निघून जातील. कमजोर विद्यार्थी मागे पडतील. ज्यांच्याकडे कॉम्प्युटर नाही त्यांचे काय होईल? अनेकांचे म्हणणे आहे की, खान यांच्या कल्पनेचे परीक्षण झालेले नाही. ते संगणकाला शिक्षकाचे स्थान देऊ पाहताहेत. खान म्हणतात की, शिक्षकाला वर्गात लेक्चर देण्याची गरज पडणार नाही. त्यांच्या कल्पनेतील आदर्श वर्गात शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याशी संवाद साधतील.
सलमान खान यांचा परिचय- सलमान खान यांची आई कोलकात्याहून अमेरिकेला गेली होती. त्यांचे डॉक्टर असलेले वडील बांगलादेशी होते. आई-वडील वेगळे झाल्यानंतर ते आईसोबत राहिले. ते 14 वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. हायस्कूलमध्ये खान यांनी गणिताच्या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. त्यांनी 2009 मध्ये खान अकादमीची स्थापना केली. अकादमीत सध्या 32 कर्मचारी आहेत.
खान अकादमीचा चढता आलेख
- 3250 व्हिडिओ संख्या
- 60 कोटी आतापर्यंत झालेला सराव (दररोज 20 लाखांपेक्षा जास्त)
- 15000- वर्गांमध्ये खान अकादमीचा अभ्यासक्रम शिकवला जातो.
- 50 लाख युजर दरमहा
- 16 कोटी व्हिडिओ पाहिले गेले.
- 2006 पासून 234 देशांमध्ये खान अकादमीचा उपयोग