आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारांनीच केले गाल लाल !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1९७5 मध्ये इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली. विरोधी विचारांचे नेते, कार्यकर्ते यांना विनाचौकशी तुरुंगात डांबण्यात आले. वर्तमानपत्रांवर सेन्सॉरशिप लादली. वृत्तपत्रे छापण्याआधी सरकारी अधिकारी ती तपासत, त्यातील सरकारविरोधी मजकूर वगळत असत. बर्‍याच वेळा कोरी जागाही सोडण्याची वेळ येत असे. 1९७७ मध्ये गुप्तचर खात्याने इंदिरा गांधींना देशात अनुकूल वातावरण असल्याचा अहवाल दिला, त्यामुळे लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. विरोधी पक्ष, माध्यमे आणीबाणीतील विनाचौकशी तुरुंगवासाबद्दल टीका करू लागले. त्यावेळी औरंगाबादचे काँग्रेसचे तत्कालीन नेते व मंत्री रफिक झकेरिया यांनी, ‘तुरुंगात टाकले म्हणून कोठे बिघडले ? मृणाल गोरे यांचे बघा तुरुंगात राहून गाल लाल झाले आहेत,’ असे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानाबद्दल सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. लोकशाहीत विरोधकांना विनाकारण तुरुंगात डांबणे हेच मुळी आक्षेपार्ह आणि त्यात झकेरिया यांचे हे विधान निवडणुकीतील प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला. औरंगाबाद मतदारसंघात जनता पक्षाचे बापूसाहेब काळदाते विरुद्ध काँग्रेसचे चंद्रशेखर राजूरकर अशी लढत होती. झकेरिया यांनी काँग्रेसचा जोरदार प्रचार केला होता, मात्र त्यांचे वादग्रस्त विधान प्रचंड टीकेचा विषय बनले. परिणामी राजूरकरांचा 55 हजार मतांनी पराभव झाला व बापूसाहेब विजयी झाले. मराठवाड्यातील आठपैकी सात तर महाराष्ट्रातील 4८ पैकी 2८ जागा काँग्रेसला गमवाव्या लागल्या. झकेरियांसह काँगे्रसच्या मंडळींना मतदानातून चपराक बसली, त्यांचे गाल ‘लाल’ झाले. कॉँग्रेसच्या पराभवाच्या अनेक कारणांपैकी एक कारण झकेरिया यांचे ते विधान हे सुद्धा होते ! तेव्हा नेते हो, निवडणूक प्रचारात बोलताना जरा जपून !