Home »Divya Marathi Special» Electricity Means Nation Service

वीजबचत म्हणजे राष्‍ट्रकार्य!

विद्याधर सु. लोणीकर | Feb 23, 2013, 02:01 AM IST

  • वीजबचत म्हणजे राष्‍ट्रकार्य!

कोणत्याही राष्‍ट्राची प्रगती त्या राष्‍ट्राकडून वापरल्या जाणा-या ऊर्जेशी निगडित असते. आपला देश विकसनशील आहे. आपली प्रगतीही आपण वापरत असलेल्या ऊर्जेशी निगडित आहे. सध्या आपण विजेच्या भयंकर संकटाला सामोरे जात आहोत. यावर मात करण्यासाठी आपल्यासमोर तीन पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे विजेचे उत्पादन वाढवणे, दुसरा विजेचा पर्यायी स्रोत शोधणे आणि तिसरा म्हणजे आहे ती वीज काटकसरीने वापरणे.

आपल्या देशातील विजेचे 70 टक्के उत्पादन कोळशावर अवलंबून आहे. विजेचे उत्पादन वाढवण्यासाठी, प्रत्येक मेगावॅट वीजनिर्मितीसाठी सुमारे 5 कोटी रुपये आरंभिक खर्च येतो. वीजनिर्मिती संच उभारणीसाठी किमान 3 वर्षांचा कालावधी लागतो. म्हणजे 250 मेगावॅट क्षमतेचा संच उभारण्यासाठी 750 कोटी रुपये खर्च येतो. ही वीज वाहून नेण्यासाठी लागणा-या ट्रान्समिशन लाइनसाठी येणारा खर्च वेगळा आहे. वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणा-या कोळशापासून वातावरणात प्रदूषणाची भर पडते. वातावरणात कार्बन डाय ऑक्साइड, कार्बन मोनो ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड इत्यादी घातक वायू सोडले जातात. याचे परिणाम आपण सध्या ग्लोबल वॉर्मिंगच्या रूपाने अनुभवत आहोत. वीजनिर्मितीसाठी कोळशाऐवजी दुसरा चांगला पर्याय शोधण्याची आज निकड आहे. पुढील 200 वर्षे पुरतील एवढेच कोळशाचे साठे जगात शिल्लक आहेत. त्यासाठी सोलार (सौरऊर्जा), विंडपॉवर (पवनऊर्जा), अणुऊर्जा (न्युक्लिअर), हायड्रो पॉवर (जलविद्युत) या पर्यायातूनच निवड करावी लागणार आहे, पण त्याला सध्या काही मर्यादा आहेत. त्यापासून निर्माण होणारी वीज आपली वाढती गरज भागवू शकत नाही.

त्यामुळे सध्या तरी आपल्यापुढे एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे वीज बचतीचा. आपण एक युनिट वीज खर्च करतो, ती निर्माण करण्यासाठी वीज केंद्रांना दोन युनिट विजेचे उत्पादन करावे लागते, कारण उपकरणांची क्षमता, वीज गळती यामुळे तयार होणा-या विजेपैकी फक्त 50 टक्के आपल्या घरापर्यंत पोहोचते. घरात विनाकारण चालणारे पंखे, दिवे, मोबाइल चार्जर हे वेळोवेळी बंद करावयास हवेत. घरातील विद्युत उपकरणे बी.ई.ई. स्टँडर्डप्रमाणे स्टार रेटिंगची असावयास हवीत. फॅनच्या साध्या रेग्युलेटरऐवजी इलेक्ट्रॉनिस रेग्युलेटर वापरावयास हवे. याने विजेची बचत होते. गळती होणारे नळ दुरुस्त करून पाण्याची गळती थांबवावयास हवी.

कारण पाणी साठवण्यासाठी आपण किंवा महानगरपालिकेने वीज वापरलेली असते. आपल्या घरापुरता विचार केला तरी महिन्याकाठी आपल्या घराचे वीजबिल 20 ते 30 टक्के कमी होऊ शकते आणि तेदेखील केवळ आपल्या सवयींमध्ये बदल करून. आपण आपल्या घरातील वीज वाचवून स्वत:ची बचत तर करतोच, पण त्याबरोबर राष्‍ट्राच्या प्रगतीलाही हातभार लावतो. पर्यायाने जगाचे प्रदूषण कमी करण्यात योगदान देतो. तेव्हा ‘वीज वाचवा, राष्‍ट्र वाचवा, पर्यायाने जग वाचवा!’

(लेखक एनर्जी ऑडिटर आहेत)
vslonikar@rediffmail.com

Next Article

Recommended