आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणीबाणीतही ‘तरुण भारत’ बंद पडू दिला नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अग्रलेखाची जागा सोडली कोरी
नागपुरात संघ परिवाराची तरुण भारत आणि युगधर्म ही दोन वर्तमानपत्रे होती. २६ जूनला सकाळी ८ वाजता इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. त्याच दिवशी तभाचे संपादक मा. गो. वैद्य यांनी ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असा अग्रलेख लिहिला. हा अग्रलेख डाक आवृत्तीत गेला. मात्र शहर आवृत्तीत सेन्साॅरने (पोलिस अधिकारी) तो काढायला लावला. त्या काळी कंपोझिंग असल्याने अग्रलेख काढून फेकावा लागल्याने शहर आवृत्तीत अग्रलेखाची जागा कोरी सोडून पेपर गेला, अशी आठवण तरुण भारतचे माजी मुख्य संपादक व तत्कालीन वार्ताहर ल. त्र्यं. जोशी यांनी सांगितली. संपूर्ण वर्तमानपत्र सेन्साॅरच्या नजरेखालून जात होते. शिवाय तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक अनंत भिडे यांच्यासह राजाभाऊ इंदूरकर, तभा प्रकाशित करणार्‍या नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब टालाटुले आदी सर्व प्रमुख लोकांना मिसाखाली अटक करण्यात आली होती. तभा कसेही करून बंद पडले पाहिजे, या इराद्यानेच प्रशासन वागत होते. मात्र सर्व कर्मचार्‍यांनी कोणत्याही परिस्थितीत तभा बंद पडू द्यायचा नाही असा निर्धार करून काम केले, असे जोशी म्हणाले.

माकप नेते ए. बी. बर्धन यांच्या नेतृत्वात त्या वेळी फॅसिझमविरोधी संघर्ष समिती स्थापन झाली होती. या समितीचे मेळावे तसेच कार्यक्रमात तरुण भारतचे नाव घेऊन ते बंद करण्याची मागणी उघडपणे बोलली जात होती. इकडे सेन्साॅरच्या नजरेखालून प्रत्येक गोष्ट जात होती. त्यातही युक्ती-प्रयुक्ती करून सेन्साॅरच्या कचाट्यातून वाचवून बातम्या व लेख देण्यात येत होते. एकदा मा. गो. वैद्य यांनी ‘चांगले राज्य आणि चांगल्यांचे राज्य’ हा अग्रलेख संपूर्ण महाभारताचे संदर्भ देऊन लिहिला. त्यात वावगे काहीच न वाटल्याने सेन्साॅरने तो पास केला. हा अग्रलेख आणीबाणीवर टीका करणारा असल्याने दुसर्‍या दिवशी संबंधित पोलिस अधिकार्‍याला वरिष्ठांची चांगलीच बोलणी खावी लागली.

जयप्रकाश नारायण नागपुरात येणार होते. ही बातमी सेन्साॅरने सिंगल काॅलम देण्यास सांगितली. त्या वेळी त्या पानाचे संपादक असलेल्या प्रभाकर पुराणिक यांनी मथळा सिंगल काॅलम दिला. मात्र फाेटोची जागा कोरी सोडून त्याखाली बातमी दिली. त्यामुळे बातमी सिंगल काॅलम असूनही चार काॅलम दिसत होती. अशा प्रकारे आणीबाणीच्या विरोधात लढा सुरूच होता, असे जोशी म्हणाले. आरपीआयचे नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी पत्रपरिषद घेऊन आणीबाणी हटवण्याची मागणी केली. ही बातमी तसेच आचार्य िवनोबा भावेंनी आचार्य संमेलनात आणीबाणी शिथिल करण्याची केलेली बातमी तभाने मोठ्या खुबीने सेन्साॅरच्या कचाट्यातून वाचवून छापली. संघ परिवारातील सर्व प्रकाशनांचे अधिकारी त्या वेळी मिसाखाली अटकेत होते. त्यामुळे दुसर्‍या फळीतील अधिकारी व कर्मचार्‍यांनी निष्ठेने व निर्धाराने काम करून प्रकाशने बंद पडू दिली नाहीत.
बातम्या आणखी आहेत...