आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसर्‍या स्वातंत्र्ययुद्धातील \"साधना\'चा लढा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२५ जून १९७५ रोजी भारतात आणीबाणी लागू झाली. वृतपत्रांवर प्रसिद्धीपूर्व तपासणी सक्तीची केली गेली. "साधना'कडे अर्थातच पोलिसांचा फेरा आला. "तुमचे काय ठरले?' असे त्यांनी विचारले. "साधनाचे विश्वस्त निर्णय घेतील तेव्हा काय ते ठरेल,' यदुनाथजी म्हणाले. पोलिस परत गेले! त्यानंतर त्यांचा पुन्हा फेरा आला. "चोवीस तासांत तुमचा मजकूर तपासून मिळेल. मजकूर पोलिस कमिशनरांच्या कार्यालयात पाठवून द्या.' "तपासून घ्यायचे ठरले म्हणजे पाठवू', असे सांगून त्यांना वाटेला लावले. साधना विश्वस्तांची सभा झाली. एस.एम. जोशी पाटण्याहून निघून आणि दोन ठिकाणी मुक्काम करून पुण्याला येऊन पोचले होते. त्यामुळे परिस्थितीची स्पष्ट कल्पना आली. जयप्रकाश दोन वर्षांपासून जो इशारा देत होते तो खरा ठरला होता. हुकूमशाही चोरपावलांनी लोकशाहीचे बेमालूम सोंग वठवीत देशात शिरू पाहत होती. माजी राष्ट्रपती गिरी यांचे पूर्वप्रसिद्ध पत्र छापायला सेन्सॉरने बंदी घातली होती.

मराठी पत्रकारांना टिळक-आगरकरांच्या निर्भय पत्रकारितेचा केवढा जाज्वल्य अभिमान! खरे म्हणजे केसरीनेच पत्रस्वातंत्र्याच्या लढ्याचे नेतृत्व करायचे, पण तसे झाले नाही. इतर पत्रांचेही तेच झाले होते.
तेव्हा साने गुरुजींनी जो अखेरचा संदेश दिला तो ध्यानी ठेवून "साधना'ने नेटाने आपली भूमिका अदा करावी.
साने गुरुजींनी लिहिले होते. "लोकशाही समाजवाद हे ध्येय धरा. ते तारील. भारतात रक्तपात न होता समाजवाद येवो. व्यक्तिस्वातंत्र्यासह समाजवाद फुलो.' इथे तर शासनाची सर्व पावले याच्या विपरीत पडत होती. त्यावर टीका करणे क्रमप्राप्तच होते!
या धोरणाने "साधना'ची आहुती पडण्याची शक्यता दर क्षणी होती; पण ध्येयवादासाठी मालमत्तेची राखरांगोळी झाली, तर त्यात वावगे काहीच नव्हते!

त्याच वेळी बेचाळीसच्या क्रांतीतील एक अग्रणी अच्युतराव पटवर्धन पुण्यात होते. त्यांना सर्व भेटायला गेले. विचारविनिमय केला. त्यांनी सांगितले, "जे घडले आहे त्याचा प्रतिकार केला पाहिजे, पण सौम्यतम पातळीवर सुरू करा. नंतर सौम्यतर करा. मग सौम्य करा आणि मग प्रखर करा. पण आपली निषेध आपण नोंदवलाच पाहिजे.'
"साधना'चा मार्ग स्पष्ट झाला. सेन्सॉरला न जुमानता साधना प्रकाशित करायची हे ठरले. पण भडकपणा न करता हे करायचे होते.

पहिला अंक चार पानांचा काढायचा असे ठरले. पहिल्या पानावर निषेधदर्शक काळा ब्लॉक, आतल्या बाजूला ठसठसशीत साने गुरुजींचा अखेरचा संदेश आणि त्यांचे रेखाचित्र. शेवटच्या पानावर इतर मजकूर असलेला अंक प्रकाशित झाला! सर्वत्र रवाना झाला. इतका सौम्यतम निषेधदेखील फारशा वृत्तपत्रांनी केलेला नव्हता.

त्यानंतर अंकाची रचना अशीच. पण अंकाची पाने आठ केली. दुसर्‍या पानावर विनोबांचे एक अवतरण दले. १९६३ च्या जुलै महिन्यात बंगालमध्ये विनोबांनी केलेल्या या प्रवचनात विनोबांनी म्हटले होते, "शिस्तीचे लगाम लावून तोंडे बंद करण्यात लोकशाही नसून प्रत्येकाने आपल्या मनातली बात मोकळेपणाने बोलण्यात लोकशाही आहे. शिस्तीच्या नावाखाली मुस्कटदाबी होऊ लागली तर पाहता पाहता लोकशाहीचे रूपांतर एकतंत्री राज्यात होईल. त्यातून पुढे लष्करशाहीचाही अवतार होईल. लोकमताची अशी पायमल्ली होत राहिली की हाती राहते फक्त सैन्य...एका बाजूला तोंडाळ विरोधी पक्ष आणि दुसर्‍या बाजूला शिस्तीच्या नावाखाली तोंड शिवलेला सत्ताधारी पक्ष. ' अशी स्थिती झाली तर लोकांचा कोणावरच विश्वास राहणार नाही.

विनोबांचे "साधना'च्या जुन्हा अंकातील वचन उद््धृत करण्यात फार मोठे रहस्य होते. पहिली गोष्ट म्हणजे "अनुशासन पर्व' अशी आणीबाणीची भलावण करणार्‍या विनोबांना त्यातून एक संकेत मिळत होता आिण आत्मसमर्थनार्थ विनोबांच्या वचनांचा उदोउदो करणार्‍या काँग्रेसजनांनाही त्यात एक इशारा होता. याच अंकात अच्युतराव पटवर्धनांशी झालेली बातचीतही दिली होती.

"साधना'चा प्रत्येक अंक शेवटचाच ठरण्याचा संभव आहे, हे ओळखून तो अत्यंत कसोशीने काढण्याची धडपड हाती आणि पहिले गांगरलेपण जाऊन सरकारच्या यंत्रणेवर मात करील आणि वार्ता मिळवील अशी यंत्रणा हळूहळू तयार होत आली. सरकारी गोटातल्या हालचालींचा देखील पत्ता लागू लागला. "साधना'तले बातचीत हे सदर म्हणजे माहिती व विचार यांचा कोशच बनला. एकाचढ एक मुलाखती त्यात येऊ लागल्या. लोकसभेतील वृत्तांताच्या प्रकाशनावर चीफ सेन्सॉरने बंदी घातली, इतका उन्मत्तपणा त्यांचा वाढला होता. पण खासदार लोकसभेत काय बोलले ते मोठ्या खुबीने बातचीत म्हणून यदुनाथजी त्यांच्याकडून वदवून घेत होते. आिण "साधना'त देत होते. खासदार पुरुषोत्तम मावळंकर, कविवर्य उमाशंकर जोशी, खासदार कृष्णकांत, छगला, इरा चेळीयन अशा एकाहून एक वरचढ मुलाखती बातचीत म्हणून "साधना'त येऊ लागल्या आिण इंदिराबाईंनी उभा केलेला संसदेभोवतीचा पडदाही साधनाने चिंध्या करून टाकला.

एव्हाना तुरुंगातील मंडळींशीही समयोग स्थापित झाला आणि गजांपलीकडूनची माहिती "साधना'त येऊ लागली. मधू लिमये, मधू दंडवते, हरिभाऊ कामत आणि इतरही कित्येकांची माहिती हाती येऊ लागली. इतरांची पत्रेही हाती येऊ लागली. "गजांपलीकडून' सदरातून येणारी माहिती फार हृदयस्पर्शी असे.

"साधना'बाबत सरकारने हाच खाक्या अवलंबला. साधनाचे अकरा अंक एकामागोमाग एक आक्षेपार्ह ठरले तरी "साधना'ने आपला बाणा सोडला नाही. तेव्हा न्यायालयात न जाता सजा करण्यासाठी सरकारने पंधरा दिवसांच्या आत हजार रुपयांचा जामीन भरण्याचा हुकूम काढला. एका मित्राने सुचविलेे, एक एक रुपयांप्रमाणे आपल्या चाहत्यांनाच जामिनासाठी पैसे मागावे. सरकार "साधना'ला शासन करायला निघाले हेाते. पण "साधना'च्या मागे अशा दडपशाहीच्या वातावरणातही हजार लोक आहेत, हे दाखवण्याची ही संधी नामी होती. सरकारने जामिनाची बातमीही वृत्तपत्रांत येऊ दिली नव्हती. "साधना'त ती छापली आिण लोकांची विनवणी केली. आश्चर्य म्हणजे प्रचंड भीतीने लोक ग्रासले आहेत, असे वातावरण असताना लोकांच्या मनात धगधगता स्वातंत्र्यस्फुल्लिंग अद्याप आहे याचा पुरावाच मिळाला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतून तीस पैसे पोस्टेज खर्च करून लोकांनी शंभर शंभर पैशांच्या मनिऑर्डरी केल्या. दिसायला लहान पण ही फार मोठी घटना होती. असे चार हजार रुपये लोकांनी पाठविले. भीतीचा पडदा टराटरा फाटल्यासारखा झाला. आश्चर्य म्हणजे सेन्सॉर ऑफिसात काम करणार्‍या दहा लोकांनीही आपला एक एक रुपया जामिनासाठी पाठवला.

"साधना'चे अंक धडाकेबाजपणे सुरू होते. आता पहिल्या पानावर कविता येऊ लागल्या. वसंत बापटांच्या या कविता मर्मावर प्रहार करणार्‍या होत्या. अखेर दिवाळी आली. "साधना'चे दिवाळी अंक नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण असतात. या अंकात "फॅसिझम' वर एक विभाग होता. फॅसिस्टच फॅसिझमविरोधी परिषदा येऊ लागले होते. त्यांचा पडदा टरकावणे भाग होते. प्रा. नरहर कुरुंदकरांनी अितशय मार्मिक लेख लिहिला. इतरही चांगले लेख जमले. अंकाची छपाई सुरू असतानाच मंुबईहून सांकेतिक संदेश येऊ लागले की, सरकार "साधना'वर घाला घालणार. त्यात अनपेक्षित काहीच नव्हते. पण एवढ्या मेहनतीने तयार केलेला दिवाळी अंक तरी लोकांना पोचायलाच हवा होता. तेव्हा शक्य तेवढी चपळाई करून दिवाळी अंक पोस्टात टाकला गेला आणि "साधना'ला आठवडाभराची सुट्टी देऊन टाकली गेली.

"साधना'ने रुपरुपयाची कुपने छापली. साधनात एकएक रुपयाची कुपने घेण्यासाठी "साधना'च्या प्रजासत्ताकदिन अंकात आजारी जयप्रकाशांच्या रंगीत चित्रासह एसेमच्या सहीचे एक पत्रक छापले. "जयप्रकाशांची रुपयाप्रमाणे एक लाख' या सूचनेचा जादूसारखा प्रभाव पडला.

जयप्रकाशांनी "साधना'ची पाठ
थोपटणारे स्वत:च्या हस्ताक्षरातले पत्र पाठवले होते. पण त्यांचा ब्लॉक तयार करून घेण्यालाही सायास पडले. अंक पूर्ण तयार करून पोस्टात गेला. इतरत्रही प्रसृत झाला. "लोकशाही : अन्वय आणि अर्थ' ही पुस्तिकाही तयार होऊन रवाना झाली. मधल्या काळात अख्खा अंक आक्षेपार्ह ठरवणे. हजार रुपयांचा जामीन मागून जप्त करणे, याबद्दलची केस सुनावणीला निघाली. २५ हजारांचा जामीन, साधना बंद करण्याचा हुकूम, साधना व जनवाणी प्रेसकडून जामीन या केसेस दाखल केलेल्या होत्या.
(निवडक साधना ग्रंथसंच खंड ५ मधील लेखाचा सारांश)
बातम्या आणखी आहेत...