आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पौरुषत्व संकटात : प्लास्टिकमुळे होतो प्रजननावर परिणाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 30 वर्षांत जगातल्या पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या (स्पर्म काउंट) 30-40 टक्क्यांनी घटली आहे. पूर्वी सर्वसामान्यपणे असलेली 100 दशलक्ष प्रति मि.लि. शुक्राणू संख्या आता 60-70 दशलक्षांपर्यंत घसरली आहे. 2050 पर्यंत सुमारे 70 टक्के पुरुषांमध्ये शुक्राणूदोष निर्माण झालेले असतील. तमाम पुरुष जातीने धसका घ्यावा अशी भीती बंगळुरू येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. कामिनी राव यांनी औरंगाबादेत व्यक्त केली. याचा मागोव घेत ‘दिव्य मराठी’ने देश-विदेशातील डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्यामागची जी कारणे पुढे आली ती बहुसंख्य पर्यावरणाशी संबंधित आहेत. प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, विद्युतचुंबकीय लहरी या बाबी शुक्राणू नाशासाठी कारणीभूत ठरल्याची मते वैद्यक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहेत. या गंभीर विषयासंदर्भात वेगवेगळ्या अंगांनी घेतलेला हा परामर्श...

प्लास्टिकमुळे होतो प्रजननावर परिणाम
डॉ. अशोक अग्रवाल
सेंटर फॉर रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन, क्लिव्हलँड क्लिनिक, अमेरिका
विकसित तसेच विकसनशील देशांमध्ये झपाट्याने वाढणा-या रासायनिक कारखान्यांतील घातक रसायने, खते-कीटकनाशके, औषधी कारखान्यातील बाहेर पडणारी द्रव्ये, ही कशी आपल्या जीवनाचा भाग बनली आहेत, याकडे मूळचे भारतीय व अमेरिकास्थित आंतरराष्ट्रीय वंध्यत्व अभ्यासक डॉ. अशोक अग्रवाल यांनी ‘बायनिअल रिव्ह्यूऑफ इन्फर्टिलिटी (व्हॉल्यूम-टू)’ या गतवर्षी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात लक्ष वेधले आहे. त्या त्या घटकाचा डॉ. अग्रवाल यांनी स्वतंत्रपणे केलेला विचार व त्याच्या परिणामांची कारणमीमांसा अशी...
वातावरणातील रसायने, घातक द्रव्ये
वातावरणातील घातक रसायनांमध्ये प्रजोत्पादनाची प्रक्रिया खंडित करण्याची क्षमता आहे. यातील काही घटकांमुळे आंतरस्रावी ग्रंथींचे व्यवस्थापन कोसळते आणि पुरुषाच्या टेस्टोस्टेरोन या संप्रेरकावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे ‘स्पर्म्याटोजेनेसिस’ ही शुक्राणूंची निर्मिती प्रक्रिया विस्कळीत होते. तसेच पेशींच्या प्रतिकारक्षमतेवरही वाईट परिणाम होतो. ही परिस्थिती नको असलेल्या ‘फ्री रॅडिकल्स’च्या निर्मितीला पोषक ठरते आणि शुक्राणूंवरील हल्ल्यास कारणीभूत ठरते. पर्यायाने शुक्राणूंची संख्या घटते.
भयानक प्लास्टिसायझर्स
प्लास्टिकमध्ये लवचीकता व मजबुती येण्यासाठी ‘प्लास्टिसायझर्स’ या ‘अ‍ॅडिटिव्हज’चा वापर केला जातो. पारदर्शी, उष्णतारोधक व अन्ब्रेकेबल प्लास्टिकमध्ये याचा वापर केला जातो. यातील काही घटक ‘स्पर्म्याटोजेनेसिस’च्या प्रक्रियेला बाधा पोहोचवतात. डिस्पोझेबल प्लास्टिक वेअरमध्ये वापरण्यात येणारे बिस्फेनॉल ए हे रसायन थेट रक्ताभिसरणात पोहोचते. हे बीपीए शुक्राणूंची संख्या घटण्यात, हालचाल मंदावण्यास कारणीभूत ठरते. याच रसायनामुळे ‘हायड्रोजन परॉक्साइड’ व ‘थायोबारबिट्युरिक अ‍ॅसिड रिअ‍ॅक्टिव्ह सबस्टन्स’ची (टीबीएआरएस) पातळी वाढून शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते. पेंटस, डिटर्जंट्स, फूड प्रोसेसिंग, पॅकेज इंडस्ट्रीजमध्ये वापरण्यात येणारे ‘नॉनिलफेनॉल’ हे रसायनही स्पर्म काउंट कमी करू शकते, हे स्पष्ट झाले आहे.
धातूंमधील विषारी घटक
लेड, कॅडमियम, मर्क्युरी, अ‍ॅल्युमिनियम, वानाडियम या धातूंमधील विषारी घटकांमुळे शुक्राणूंची संख्या घटते. त्यामुळेच बंदीपूर्वी लेड हे पेंटस्, पेट्रोलियम पदार्थांमध्ये वापरले जात होते. कॅडमियमचे घातक परिणाम आता जगाला ज्ञात झालेले आहेत. यातील विषारी घटकांमुळे पुरुषाच्या टेस्टॉस्टेरोन या संप्रेरकाच्या पातळीवर अत्यंत विपरीत परिणाम होतो. तसेच जनुकांच्या ‘एक्स्प्रेशन्स’मध्येही बदल होतो. पेंट व बॅटरीच्या कारखान्यांमधील घातक वायूंमुळे तेथे काम करणा-या कामगारांमध्ये वंध्यत्व किंवा त्यांच्या पत्नींमध्ये गर्भपातासारखे प्रकार दिसून येतात.
खते, कीटकनाशकांमुळे स्पर्म्याटोजेनेसिसवर परिणाम
रासायनिक खतांच्या भरमसाट वापरामुळे मातीमध्ये नायट्रोजन व अमोनिया साचून राहतो व ‘स्पर्म्याटोजेनेसिस’च्या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे शुक्राणूंची हालचाल कमी होतेच; शिवाय स्त्रीबीजाला भेदण्याची क्षमताही कमी होते.
डीडीटी, इथिलिन डायब्रोमाइड,ऑरगॅनो फॉस्फेट या कीटकनाशकांचा जबर फटका शुक्राणूंच्या संख्येवर बसतो, हे पुरते सिद्ध झाले आहे. कीटकनाशके हाताळणा-या शेतक-यांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाणही सिद्ध झाले आहे. हेच परिणाम लिंडेन, मिथॉक्झिक्लोर,
डायआॅक्झिन या कीटकनाशकांमध्ये दिसून आले आहे. ‘कार्बेंडेझिम’ या
बुरशीनाशकामुळे अंडाशयाचे (टेस्टिस) वजन कमी होणे, शुक्राणूंची संख्या घटणे,
हालचाल कमी होणे, अनैसर्गिक आकार होणे, असे भिन्न घातक परिणाम झाल्याचे स्पष्ट
झाले आहेत.

शुक्राणूंची स्थिती : पूर्वीची आणि आताची
100
तीस वर्षांपूर्वी (दशलक्ष प्रति एमएल)
60-70
आजची संख्या (दशलक्ष प्रति एमएल)
20 दशलक्ष
प्रजोत्पादनासाठी आवश्यक
39%
शुक्राणूंची हालचाल अपेक्षित
4.5-5 मि.मी.
शुक्राणूंच्या डोक्याची लांबी आवश्यक
3-3.5 मि.मी.
शुक्राणूंच्या डोक्याची रुंदी आवश्यक
असे करा उपाय...
सलग बैठक मारण्यापेक्षा अधूनमधून हालचाल करावी, रिलॅक्स व्हावे
दररोज किमान 12 सूर्यनमस्कार घालावे, ज्यामुळे रक्ताभिसरण संपूर्ण शरीरात वाढेल
विरुद्ध आहार टाळावा. ग्रेव्हीयुक्त भाजी टाळावी, वेळप्रसंगी साधी भाजी घ्यावी
त्या त्या मोसमातील फळे स्वच्छ धुऊन, 15-20 मिनिटे पाण्यात बुडवून खावीत, गावरान आंबा आंबट असला तरी खावा
पॉलिश न केलेले धान्य वापरावे, सत्त्वयुक्त आहार घ्यावा
बदाम, काजू, अक्रोडसारख्या, सुक्या मेव्याने काउंटर करावे

2050 पर्यंत 70 % पुरुषांत शुक्राणूदोष
डॉ. कामिनी राव
संचालिका, बंगलोर असिस्टेड कन्सेप्शन सेंटर, बंगळुरू.
अनेक प्रकारच्या कारणांमुळेच जनुकीय बदल (जेनेटिक म्युटेशन) होऊन डीएनएची शृंखला तुटते व शुक्राणूंचा नाश होतो. ही शृंखला मोडीत निघाल्यामुळेच कधी शुक्राणूंची हालचाल (मोटिलिटी) अपेक्षेप्रमाणे न राहता मंदावते, तर कधी शुक्राणूंमध्ये अनैसर्गिकता (अ‍ॅबनॉर्म्यालिटिस) निर्माण होऊन त्याचा आकार बदलतो. याच कारणांमुळे शुक्राणूंची संख्या घटण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असून 2050 पर्यंत 70 टक्के पुरुषांमध्ये शुक्राणूदोष असतील, अशी भीती आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वंध्यत्वतज्ज्ञ व बंगळुरूस्थित डॉ. कामिनी राव यांनी व्यक्त केली आहे. अनेक घटकांमुळे तसेच परिस्थितीत ‘डीएनए फ्रॅग्मेंटेशन’ अर्थात डीएनएची मोडतोड होणे, हे शुक्राणू नाशाचे महत्त्वाचे कारण ठरते. प्रत्यक्षात डीएनए ब्रेक झाल्यानंतर शुक्राणूचा नाश होतो किंवा शुक्राणूच्या डोक्याला तडे जातात, भेगा पडतात व अशा प्रकारचा शुक्राणू कुठल्याही कामाचा राहत नाही. शुक्राणूच्या डोक्याप्रमाणेच शेपटीलाही (टेल) अनन्यसाधारण महत्त्व आहे. जलद हालचालीसाठी (मोटिलिटी) ही शेपटी कारणीभूत ठरते. ही हालचाल थोडी जरी मंदावली तरी शुक्राणू आपले अंतिम ध्येय गाठू शकत नाही.
प्रवास अनुत्पादकतेकडे
डॉ. सतीश पत्की
संचालक, पत्की आयव्हीएफ सेंटर, कोल्हापूर
स्पर्म अर्थात शुक्राणू ही एक प्रकारची पेशीच असते. या पेशीवर मधुमेह व इतर आजारांचा जसा प्रतिकूल परिणाम होतो, तसाच तो प्रदूषण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज, ग्लोबल वॉर्मिंगचाही परिणाम होतो. या वेगवेगळ्या कारणांमुळे शुक्राणू नष्ट होतात किंवा शुक्राणूंमध्ये अनैसर्गिकता निर्माण होते आणि अनैसर्गिक शुक्राणू पुनरुत्पादनाच्या दृष्टीने चांगले फलदायी ठरत नाहीत, असे मत कोल्हापूर येथील प्रसिद्ध वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांनी व्यक्त केले.
आजारांचा विचार केला तर मधुमेहासारख्या आजारामुळे शुक्राणूंच्या वाढीवर परिणाम झालेला दिसून येतो. अशा केसेसमध्ये शुक्राणूंची वाढ खुंटते व संख्या घटत जाते. सुदृढ पेशी कमकुवत होतात व नैसर्गिक कार्यामध्ये बाधा निर्माण होते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजमुळे जेनेटिक म्युटेशन अर्थात जनुकीय बदल घडतात. यामुळेच डीएनए ब्रेक होतो व शुक्राणू मरतो किंवा काही वेळेला शुक्राणूमध्ये अनैसर्गिकता येते. अनैसर्गिक शुक्राणू वंध्यत्वासाठी कारणीभूत ठरतात किंवा याद्वारे मूल जन्मले तरी त्यात अनैसर्गिकता (अ‍ॅबनॉर्म्यालिटिस) असू शकतात. अशा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणजेच विद्युतचुंबकीय लहरी या मोबाइल हँडसेट, मोबाइल टॉवर्स, लॅपटॉप अशा उपकरणांमुळे असतात. वेगवेगळ्या प्रकारची औषधी, कीटकनाशके, घातक रसायनांंमुळेही जनुकीय बदल होऊ शकतात. विशिष्ट औषधी दीर्घ कालावधीसाठी घेणा-यांमध्येही त्यातील रसायनांचा परिणाम दिसून येतो. रसायनांच्या सतत संपर्कात येणारेही (प्रोफेशनल हेझार्ड्स) रिस्क फॅक्टर्समध्ये मोडतात. प्रदूषणाचाही गंभीर फटका शुक्राणूंच्या घटत्या संख्येवर होताना दिसतो. कार्बन मोनोक्साइडसारख्या घातक वायूंमुळे रक्तातीलऑक्सिजनचे प्रमाण घटते व रक्ताभिसरणावर गंभीर परिणाम होतो. रक्ताभिसरणाचे कार्य बिघडते आणि ‘स्पर्म्याटोजेनेसिस’ ही शुक्राणूंची निर्मिती प्रक्रिया बाधित होते व निर्मिती मंदावते किंवा थांबते. त्यामुळेच जिवंत शुक्राणू मृत झाल्यानंतर अपेक्षित नवनिर्मिती नसल्याने, शेवटी त्याचा परिणाम शुक्राणूंची संख्या घटण्यात होतो, असेही डॉ. पत्की यांनी सांगितले.

‘षांढ्यम्’ची कारणे रोजच्या जगण्यात
वैद्य संतोष नेवपूरकर
दीर्घायू स्वास्थ्यालय, औरंगाबाद
वंध्यत्वाला संस्कृतमध्ये ‘षांढ्यम्’ असे म्हटले जाते. आयुर्वेदामध्ये ‘षांढ्यम’ची निश्चित कारणे दिली आहेतच; शिवाय अलीकडच्या बदललेल्या जीवनसंस्कृतीमध्येही ती दडलेली आहेत. त्यामुळेच पुरुष वंध्यत्वाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सद्य:स्थितीत पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या 60 ते 70 दशलक्ष प्रति एमएल इतकीच आढळून येते. केवळ एखाद्या केसमध्ये शुक्राणूंची संख्या 85-90 दशलक्षांच्या आसपास असते. महिन्याला किमान दहा रुग्ण उपचारासाठी येत असतात.
अन्नामध्ये पुनरुत्पादन क्षमतेचा अभाव
अलीकडे मिळणारे धान्य, भाजीपाला, फळे ही अधिकाधिक संकरित प्रकारची असून रोजच्या आहारामध्ये त्याचेच प्राबल्य दिसून येते. मात्र संकरित धान्यामध्ये पुनरुत्पादन क्षमता नाही, ही वस्तुस्थिती आहे. गेल्या दहा वर्षांत या प्रकारचे धान्य, भाजीपाला, फळे मोठ्या प्रमाणावर रोजच्या आहारामध्ये समाविष्ट झाली आहेत.
बैठक वाढून उष्णता वाढली
पूर्वी आठ तास काम करणारे पुरुष आता किमान 10 ते 12 तास काम करतात. त्यातच सर्वंच पुरुषांची अंतर्वस्त्रे घट्ट असतात. तासन्तासची बैठक व घट्ट अंडरगारमेंटस यामुळे अंडाशयातील (टेस्टिस) रक्ताभिसरण वाढते व तापमानही वाढत जाते आणि वाढत्या तापमानामुळे शुक्राणूंचा नाश होतो. त्यामुळेच भट्टीत, पोलाद कारखान्यात किंवा स्वयंपाकी म्हणून काम करणा-यांमध्ये शुक्राणूदोष आढळतात.
विरुद्ध आहारामुळे ‘षांढ्यम्’
अलीकडे विरुद्ध आहार घेण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. दूध, साय, काजू पेस्टपासून तयार करण्यात येणा-या ग्रेव्हीमध्ये भाज्या तयार करण्याचे प्रमाण वाढत असून, हॉटेलांमध्ये या प्रकारच्या भाज्यांचे फार मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. दूध-भाज्या, दूध-फळे, दूध-मासे हा आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार समजला जातो आणि त्याचा पहिला परिणाम ‘षांढ्यम्’ असा ‘अष्टांग हृदय’ या ग्रंथात सांगितला आहे.

सोप्या उपायाने वाढली शुक्राणू संख्या...
हॉटेलमध्ये स्वयंपाकी असलेल्या एका पुरुषाच्या शुक्राणूंची संख्या केवळ तीन दशलक्ष प्रति एमएल इतकीच होती. त्याला पाण्यात बुडवलेला पांढरा स्वच्छ सुती रुमाल अंडाशयाला 15 ते 20 मिनिटे गुंडाळून ठेवण्यास सांगण्यात आले. त्याने हा प्रयोग रोज कामावरून घरी परतल्यावर नियमाने केला. दीड महिन्यानंतर त्याच्या शुक्राणूंची संख्या 21 दशलक्षांवर पोहोचली. यावरून साधा ओला रुमाल अंडाशयातील उष्णता शोषून घेऊ शकतो, हे स्पष्ट होते. तसेच भट्टीत किंवा उष्णतेच्या ठिकाणी काम करणा-यांनी कामावरून परतल्यानंतर थंड पाण्याने स्नान करणे, थंड पाण्यात अर्धा तास पाय बुडवून ठेवणे, नारळ व नारळपाणी घेणे, यासारख्या उपाययोजनाही उपयुक्त ठरतात, असे वैद्य नेवपूरकरांनी सांगितले.

घटती संख्या चिंताजनक
डॉ. साधना देसाई
संचालक, फर्टिलिटी क्लिनिक सेंटर, मुंबई
2050 मध्ये किती टक्के पुरुषांमध्ये शुक्राणूसंबंधी दोष असतील, हे आज सांगता येणे शक्य नसले तरी शुक्राणूंची संख्या झपाट्याने घटत आहे, ही वस्तुस्थिती आहे. अलीकडे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त दोष आढळून येत आहे. स्त्रीबीजाचा गुणात्मक दर्जाही घसरत असल्याचे लक्षात येत आहे.

शुक्र घसरणीचा दर वाढतोय
डॉ. राज बोलधने
वंध्यत्व तज्ज्ञ, एमजीएम टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, औरंगाबाद
2050 मध्ये शुक्राणूंची संख्या किती प्रमाणात घटेल, हे नेमकेपणाने सांगता येत नसले तरी घसरणीचा दर वाढतोय, हे निश्चित. जसे ‘रिस्क फॅक्टर’ वाढत आहेत, तसा ‘रेट ऑफ डिक्लाइन’ही वाढणार, असा एक वैद्यकीय अंदाज आहे.

‘डब्ल्यूएचओ’चे निकष असे...
जागतिक पातळीवर सर्वसाधारणपणे घटलेली शुक्राणूंची संख्या (स्पर्म काउंट), जलद हालचालींची (मोटिलिटी) घटलेली टक्केवारी, याचा सार्वत्रिक विचार करून जागतिक आरोग्य संघटनेने (वर्ल्ड हेल्थऑर्गनायझेशन ) या संदर्भात निश्चित निकष तयार केले आहेत. यानुसार सद्य:स्थितीत दोन कोटी प्रति मिलिलिटर (एमएल) इतकी शुक्राणूंची संख्या सामान्य समजली जाते. तसेच पूर्वी 50-60 टक्के हालचाल सामान्य समजली जात होती. आता हे निकष ‘डब्ल्यूएचओ’ने बदलले असून 39 टक्के हालचाल सामान्य समजली जाते. शुक्राणूच्या आकाराच्या (मॉरफॉलॉजी) बाबतीत जागतिक पातळीवर समान निकष मान्य करण्यात आले आहेत. त्यानुसार शुक्राणूच्या डोक्याची लांबी 4.5 ते 5 एमएम, तर रुंदी 3 ते 3.5 एमएम इतकी अपेक्षित आहे. यापेक्षा कमी आकार अनैसर्गिक (अ‍ॅबनॉर्मल) समजला जातो व प्रजोत्पादनासाठी तो निरर्थक ठरतो.

50 वर्षांत 50% घट
डेन्मार्कचा शास्त्रज्ञ नील्स शेकबेक याने वंध्यत्वासंबंधी मांडलेला अभ्यास महत्त्वपूर्ण मानला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील 61 संशोधनपर निष्कर्षांचा शेकबेकने विस्तृत आढावा घेतला. तसेच 1940 ते 1990 या पन्नास वर्षांतील 14 हजार 947 पुरुषांच्या शुक्राणूंचा अभ्यास केला. यात 1940 मध्ये सर्वसामान्यपणे असलेली 113 दशलक्ष प्रति एमएल इतकी शुक्राणूंची संख्या 1990 मध्ये 66 दशलक्ष प्रति एमएल इतकी झाल्याचे शेकबेकने स्पष्ट केले. म्हणजेच शुक्राणूंच्या संख्येत 50 वर्षांत 50 टक्के घट झाल्याचा निष्कर्ष त्याने काढला व तेव्हापासून या विषयाकडे जगाचे लक्ष प्रकर्षाने वेधले गेले.
वंध्यत्व तज्ज्ञांचे पॅनल
डॉ. अशोक अग्रवाल (क्लिव्हलँड क्लिनिक, अमेरिका)
डॉ. कामिनी राव (असिस्टेट कन्सेप्शन सेंटर, बंगळुरू)
डॉ. सतीश पत्की (पत्की आयव्हीएफ सेंटर, कोल्हापूर)
वैद्य संतोष नेवपूरकर (दीर्घायू स्वास्थ्यालय, औरंगाबाद)
विशेष साहाय्य : डॉ. राज बोलधने, वंध्यत्वतज्ज्ञ