आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्रेकाचा उत्तराखंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेथीस समुद्र 5.4 कोटी वर्षांच्या आसपास पूर्णपणे गाळाने भरून गेला. भूहालचालींच्या रेट्यामुळे भारतीय भूतुकडा, जो दक्षिण गोलार्धात होता, तो टेथीस समुद्राच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचला. पण टेथीसच्या दुस-या सीमेच्या पल्याड युरेशियन (आशिया + युरोप) भूतुकडा मात्र एकाच जागी स्थिर होता. हा भूतुकडा अगदीच अचल होता व अजूनही आहे. मात्र भारतीय भूतुकडा आपल्या चालीने चालतच राहिला. भारतीय भूतुकड्याच्या उत्तरोत्तर रेट्यामुळे व युरेशियाच्या एकाच जागी स्थिर राहण्याच्या अट्टहासामुळे टेथीस समुद्राच्या खडकांना तडे पडू लागले, त्यांच्यात विभंग घडून येत आकुंचन पावण्याच्या क्रियेमध्ये त्यांना फक्त आकाशाकडे वाढण्यासाठी जागा शिल्लक राहिली.


या गुंतागुंतीच्या प्रतिक्रिया हालचालींच्या माध्यमातून हिमालयाची विशाल पर्वतरांग तयार झालेली आहे, नव्हे ती तयार होते आहे. हिमालयाच्या उत्पत्तीबरोबरच मान्सूनचीही निर्मिती सुरू झालेली आहे. पण हिमालय पर्वतांच्या प्रदेशात मान्सून सरसकट एकसारखा नाही. तो पर्वतांच्या उंचीबरोबर बदलत राहतो. 3000 मीटर व त्यापेक्षा अधिक उंचीवर मान्सून पाण्याच्या नाही, तर बर्फाच्या स्वरूपात खाली कोसळतो. यातूनच हिमालयातील ग्लेशियर्सना (हिमनद्या) आपले खाद्यान्न मिळत राहते. गंगा, ब्रह्मपुत्रा व सिंधू नद्यांच्या खो-यात सुमारे 16,117 हिमनद्या आहेत, ज्या 32,182 चौरस किलोमीटर प्रदेश व्यापतात व ज्यांच्यात 3,421 घन किलोमीटर इतका बर्फ साठलेला आहे.


हिमालयाचे भूरूप अतिशय गुंतागुंतीचे आहे. तिथे अग्निजन्य व रूपांतरित खडकांबरोबरच जलजन्य खडकांचे अस्तित्व फार मोठ्या प्रमाणावर आहे. सामान्यत: जलजन्य खडक एकावर एक आडवे थर साचून तयार होतात. त्यांना पुरेसा अवधी मिळाला, तर ते एकसंघ बनतात. कडाप्पा व विंध्य समूहाचे खडक हे जलजन्य प्रकारातील होते. पण पुरेसा अवधी व ऊर्जा मिळाल्याने ते कठीण व कडक बनलेले आहेत. पण हिमालयातील (खरे तर टेथीस समुद्रातील) गाळाला हे विषयसुख लाभलेले नाही. सततच्या भूहालचालींमुळे आडवे जमा झालेले गाळाचे थर अगदी वाकडेतिकडे झालेले आहेत. जे थर खाली होते ते वर आलेले आहेत, एक खडकप्रकार दुस-याच कुठल्या तरी खडकाच्या माथ्यावर जाऊन बसलेला आहे, एक खडक दुस-या खडकाच्या शरीरात घुसला आहे. अशी विचित्र परिस्थिती हिमालयात अनुभवण्यास मिळते. पट्टीचे संशोधकसुद्धा या गोंधळवून टाकणा-या भूरूपांचा अन्वयार्थ लावताना हैराण होऊन जातात.


हिमालयातील इतर ठिकाणांसारखीच परिस्थिती उत्तराखंडमध्येसुद्धा पाहायला मिळते. इथेही हीच गुंतागुंत अस्तित्वात आहे. भुसभुशीत जमीन, बारमाही वाहत्या नद्या, सतत प्रवाह बदलणारे पाणी, उंचीवरून धो-धो कोसळणारे पाणी, निक्षेपित होणारी खनिजसंपत्ती व सुरू असलेल्या भूहालचाली यांचा एकत्रित परिणाम हिमालय पर्वतरांगांना अस्थिर करण्याला कारणीभूत ठरतो. हिमालय दरवर्षी 2 ते 5 सेंमी.ने वाढतो आहे. हा ‘वेग’ आपल्यासाठी फारच नगण्य आहे. पण हिमालयाला हलवण्यासाठी पुरेसा आहे. या राज्याचे भूरूप हिमनद्या, तलाव, जंगल व नद्यांनी कोरलेल्या द-यांनी भारून टाकलेले आहे. हे सारे घटक अतिसंवेदनशील आहेत. जे छोट्यातल्या छोट्या बदलाने प्रभावित होतात. या सा-या बदलांची नोंद इथल्या गाळात (जलजन्य खडकात) कोरली गेलेली आहे. काही वर्षांपूर्वी आम्ही बूर्फू व पिपलकोटी येथून वीस हजार वर्षांपूर्वी तयार झालेल्या तलावातील गाळाचे नमुने हवामान बदल अभ्यासासाठी आणले होते. त्या नमुन्यात भूकंप व तत्सम भूशास्त्रीय उलथापालथीचे छाप उमटलेले आढळतात. त्या काळातसुद्धा हवामान बदल घडत होते, आजही घडत आहेत. त्यात मानवाचा हस्तक्षेप असो वा नसो. या क्षेत्रात पावसाची तीव्रता हजारो वर्षांपासून कमी-जास्त होते आहे, वनस्पतीचे स्वरूप बदलते आहे, गाळाचे निक्षेपण कमी-जास्त होते आहे, इथले भूरूप बदलते आहे, नद्यांचे प्रवाह बदललेले आहेत, अनेक नद्या एका जागी लुप्त होऊन दुस-या जागी प्रकट झालेल्या आहेत. या सा-या प्रक्रिया नैसर्गिकरीत्या घडून आलेल्या आहेत.


अलकनंदा तसेच अन्य घाटीत डोंगरमाथ्यांवर नद्यांनी कोरून ठेवलेले चबुतरे अजूनही पाहायला मिळतात. आधीच्या काळी आलेल्या महापुराचे संकेत आजही जागोजागी आढळतात. अनेक हिमनद्या वाढलेल्या आहेत, तसेच आकुंचनसुद्धा पावलेल्या आहेत. हिमालयातील पर्वत-द-यांचा उभार खडा आहे. त्यामुळे वाहत्या पाण्याचा व भूहालचालींचा प्रभाव एकत्रितपणे झाल्यास भूस्खलनाचा फार मोठा धोका इथे सदैव असतो. भुसभुशीत गाळातील छिद्रात जेव्हा पाणी लपून राहते, तेव्हा रात्रीच्या थंडीत त्या पाण्याचे घनफळ वाढते. तापमानाच्या सापेक्ष पाण्याचे विस्तारणे व आकुंचन पावणे इथल्या खडकांना तसेच गाळाला आणखीनच अस्थिर बनवते. त्यामुळे भूस्खलनाच्या घटना जरी पावसाळ्यात वाढत असल्या, तरी त्यांचा धोका इतर ऋतुमानात तितकाच असतो. उत्तरकाशीचे भूस्खलन मान्सून झाल्यानंतर 23 सप्टेंबर 2003 तर 30 मार्च 2005ला मान्सूनच्या आगमनापूर्वी शमोलसरी इथे भूस्खलन होऊन गेले. भूस्खलनाच्या अगणित घटना या पर्वतरांगांमध्ये घडलेल्या आहेत. भूहालचाली, भूकंप व पाऊस जोपर्यंत कार्यरत आहेत, तोपर्यंत या घटना घडतच राहणार आहेत. मग याला काही तोडगा?


नैसर्गिक आपत्ती ही एक समस्या आहे, ज्याची सोडवणूक कोणत्याही परिस्थितीत केली पाहिजे. ही सर्वांची सर्वसाधारण धारणा असते. पण निसर्गाचा तो एक स्थायीभाव आहे, हे आपण सर्व जण विसरतो व त्यात बदल करण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा अपयशी ठरतो. डेनिस मिलेटी ‘डिझास्टर्स बाय डिझायन’चे लेखक म्हणतात की, नैसर्गिक आपत्ती हा दैवी प्रकोप नाही किंवा साधी तांत्रिक समस्या नाही. ती समस्या आपल्या राहणीमानाशी, आपण कुठे आपले वास्तव्य करू इच्छितो व कोणत्या प्रकारच्या निवासस्थानात राहू इच्छितो, याच्याशी निगडित आहे. डोंगर, कडेकपारीतून, भूकंप, ज्वालामुखी, भूस्खलन, विभंग-प्रवण क्षेत्रात डेरा जमवल्यानंतर धोक्यांच्या मालिकेला सामोरे जाण्यावाचून दुसरा कोणताच पर्याय उरत नाही. जो पर्याय उरतो, त्याला अमलात आणण्याचे कष्ट मात्र आपण घेत नाही. विज्ञान व तंत्रज्ञानाचे फायदे घेण्याचे बहुतेक लोक टाळत असतात. त्या पाठीमागे कोणती मानसिकता कार्यरत आहे, त्याचा खरोखरीच शोध घ्यायला हवा. आपल्या अवतीभोवतीच्या परिक्षेत्राची जडणघडण कोणत्या प्रकारची आहे, याची जाणीव हिमालयातील व तेथे जाऊ इच्छिणा-या प्रत्येकाला करून देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळणा-या नैसर्गिक आपत्तींची आगाऊ सूचना किती उपकारक ठरते, याची संवेदनशीलता लोकांच्या अंगी भिनली जाईल. टेहरी हे हिमालयातील मोठे धरण बांधून झाल्यानंतर इथे अजून तरी कोणत्याही प्रकारची भूशास्त्रीय समस्या निर्माण झालेली नाही.


उत्तराखंड समस्येला प्रतिक्रिया म्हणून अनेक उपाय योजले जातील, जे तात्पुरत्या स्वरूपाचे असतील. अशा वेळी शाश्वत व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान राबवणा-या किंवा नवनवीन शोध लावणा-या वैज्ञानिकांची मदत घेणे अतिशय आवश्यक ठरते. हिमालयाचा भूशास्त्रीय अभ्यास करणारे अनेक वैज्ञानिक आपल्या देशात कार्यरत आहेत. त्यांनी वेळप्रसंगी जिवावर बेतणा-या संकटांचा सामना करून या क्षेत्रातील सततच्या बदलणा-या भूरूपांची उकल करण्याचा ध्यास घेतलेला आहे. ते निश्चितपणे हिमालयातील चंचल व संवेदनशील क्षेत्राच्या बदलत्या स्वरूपाशी जुळवून घेत कसे गुण्यागोविंदाने राहता येईल, याचा योग्य मार्ग दाखवतील.