Home »Divya Marathi Special» Eye Donation Program

एक पाऊल तेजाच्या दिशेने : नेत्रदान महाअभियान आजपासून सुरुवात

रमेशचंद्र अग्रवाल | Feb 10, 2013, 04:22 AM IST

  • एक पाऊल तेजाच्या दिशेने : नेत्रदान महाअभियान आजपासून सुरुवात

लक्षात घ्या, जगात सर्वाधिक म्हणजे दीड कोटीहून अधिक दृष्टिहीन भारतात आहेत. यात 26 टक्के मुले आहेत. वेळेवर डोळे उपलब्ध झाले तर यातील 75 टक्के लोकांचे आयुष्य अंधकाराच्या अभिशापातून मुक्त होऊ शकते. दान होणा-या नेत्रांच्या अभावामुळे त्यांच्या नशिबी अंधारयात्राच आली आहे. तज्ज्ञांच्या मते देशात दरवर्षी अडीच लाख नेत्रदान होण्याची गरज आहे.

एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे दुस-या एखाद्या अंध व्यक्तीच्या अंधारलेल्या आयुष्यात प्रकाशकिरणांची पखरण करू शकतात. विज्ञानाने हा चमत्कार घडवला आहे. हे जर शक्य झाले आहे, तर या पुण्यप्रद कार्यात आम्हीदेखील सहभागी झाले पाहिजे.

दैनिक भास्कर समूह आपल्या कोट्यवधी वाचकांच्या सोबतीने आजपासून ‘नेत्रदान-एक वरदान’ अभियान सुरू करत आहे. दैनिक भास्कर समूहाच्या वेगवेगळ्या राज्यांत 28 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राबवले जाणार आहे.

नेत्रदानाच्या संकल्पाचा फॉर्म दै. ‘दिव्य मराठी’च्या पुढील अंकात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्या माध्यमातून आपण आपला संकल्प नोंदवू शकता. www.bhaskar.com वरही हा संकल्प फॉर्म ऑनलाइन भरता येऊ शकेल. SMS च्या माध्यमातूनही या अभियानात सामील होता येईल. मरणोपरांत आपले डोळे दुस-या कोणाच्या तरी जीवनात प्रकाश पसरवतील, असे आपण या संकल्प फॉर्ममधून जाहीर कराल.

आय बँक असोसिएशन ऑफ इंडियादेखील भास्करच्या या अभियानात सहभागी आहे. आपण भरलेले संकल्प फॉर्म आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया आणि त्यांच्या अखत्यारीतील अधिकृत नेत्रपेढ्यांकडे पाठवून दिले जातील. एक डाटा म्हणून हे फॉर्म तेथे ठेवले जातील. त्यातून तुम्ही नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली असल्याचे स्पष्ट होईल.

मृत्यूनंतर 6 तासांच्या आत दान केले गेले, तरच मृत व्यक्तीचे डोळे उपयोगात आणले जाऊ शकतात. मृतांचे नातलग/मित्रांमार्फत स्थानिक नेत्रपेढीला सूचना मिळाली की या नेत्रपेढीचे पथक तत्काळ दाखल होते.

आणि हो, यदाकदाचित एखाद्याने आपल्या हयातीत नेत्रदानाचा संकल्प केलेला नसेल तरीदेखील त्याच्या कुटुंबीयांच्या संमतीने नेत्रदानाचे पुण्यकार्य केले जाऊ शकते. तर मग चला, प्रकाश वाटण्याच्या मोहिमेत आपण सारे सहभागी होऊया आणि नेत्रदान करून एखाद्याचे अंधारलेले जीवन उजळून टाकूया.

रमेशचंद्र अग्रवाल
चेअरमन, दैनिक भास्कर समूह

Next Article

Recommended