आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Famous Father Daugther : Without Medical Education 2000 Crores Rised Hospital Group

प्रसिध्‍द बाप-लेक : डॉक्टरकीचे शिक्षण न घेताही उभारला 2000 कोटींचा रुग्णालय समूह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
० डॉ. प्रीती सी. रेड्डी : अपोलो हॉस्पिटल्सच्या एमडी
* वय- 52 वर्षे
* वडील- डॉ. प्रताप सी. रेड्डी, आई- सुचित्रा, बहिणी- शोभना, संगीता,सुनीता
* कुटुंब - विजय रेड्डी (पती) उद्योगपती, दोन मुले
* शिक्षण- मद्रास विद्यापीठाची बी.एस्सी.(रसायन), अण्णामलाई विद्यापीठातून पब्लिक अ‍ॅडमिनिस्‍ट्रेशनमध्ये पदव्युत्तर, डॉ. एमजीआर विद्यापीठाची मानद डॉक्टरेट
आपल्या चार मुलीच आपली सर्वात मोठी संपत्ती ठरतील असा विचारही स्टेनले वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टरकीचे शिक्षण घेतलेल्या डॉ. प्रताप रेड्डी यांनी कधी केलाही नसेल. ब्रिटन आणि अमेरिकेतून कॉर्डिओलॉजीमध्ये प्रावीण्य प्राप्त केल्यानंतर डॉ. रेड्डी यांनी ठरवले असते तर ते प्रॅक्टिस करून रग्गड कमाई करू शकले असते. परंतु वडिलांची आज्ञा प्रमाण मानून ते चेन्नईत येऊन स्थायिक झाले. तेव्हा एखादे रुग्णालय सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि अपोलो रुग्णालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. पाचच वर्षांत 150 खाटांचे रुग्णालय उभारले. तेच आज 65000 प्रोफेशनल्स असलेले रुग्णालय आहे. त्याला जगातील सर्वात मोठ्या रुग्णालय समूहात पोहोचवण्यासाठी त्यांच्या मुलींचे मोठे योगदान आहे.
1989 ची गोष्ट आहे. डॉ. रेड्डी यांची सर्वात मोठी मुलगी प्रीतीचे लग्न झालेले होते आणि ती दहा वर्षांपासून विजय रेड्डी यांचे घरगाडे सांभाळत होती.
तेव्हा छोट्या बहिणीच्या लग्नानंतर वडिलांनी त्यांना रुग्णालयाची थोडी जबाबदारी सांभाळण्यास सांगितले. प्रीती डॉक्टर नसली तरीही रुग्णालयात दाखल झाली. छोटी बहीण सुनीता वित्त विभागाचे काम पाहत होती. रुग्णालयात कामकाज सुरू करून काही दिवसही झाले नाहीत तोच एके दिवशी संप झाला. कर्मचारी घोषणाबाजी करू लागले. तेव्हा प्रीती मोठ्या धाडसाने त्यांना सामोरे गेली. अख्खे व्यवस्थापन त्यांच्या विरोधात होते. कर्मचारी उपाशी असतील, असे प्रीतीला वाटले म्हणून कँटीनवाल्यांना त्यांना काहीतरी खाऊ घालण्यास सांगितले आणि नंतर चर्चा करू म्हणाली. त्यामुळे परिस्थिती निवळली आणि कर्मचा-यांनी संपातून माघार घेतली. त्यानंतर आपल्या मुलीकडे मॅनेजमेंटची पदवी नसल्यामुळे कामकाज कसे चालणार, असे डॉ. रेड्डी यांना कधीच वाटले नाही.
एखादी कल्पना कशी अमलात आणायची हे प्रीतीकडून शिकून घेतले पाहिजे, असे त्यांच्यासोबत काम करणारे सांगतात. रुग्णालयाला नोटा छापण्याचा कारखाना होऊ देऊ नका, असे ती सांगते. आईवडील अमेरिकेत होते तेव्हा चेट्टिनाड (तामिळनाडू) राजवाड्यात प्रीतीचे पालनपोषण झाले. चेट्टिनाडचे शेवटचे राजे आणि प्रसिद्ध उद्योगपती ए. एम. रामास्वामी चेट्टियार यांना मूलबाळ नव्हते. डॉ. रेड्डी यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती.
नोकरांच्या फौजफाट्यात वाढलेल्या प्रीतीला अहंकाराची लागण कधीच झाली नाही. 13 वर्षांच्या असतानाच त्यांनी राजवाड्यात मनोरंजनाचा धर्मार्थ कार्यक्रम आयोजित करून सीईओसारखे कसब दाखवले होते. त्या कधीच नाराज झालेल्या दिसत नाहीत. त्या पित्याचा वारसा यशस्वीपणे सांभाळत आहेत. डॉक्टर नसल्या तरी 2009 मध्ये सुरू झालेले अपोलो रुग्णालय बालरोग संकुल ही त्यांच्याच सुपीक डोक्यातून निघालेली संकल्पना आहे. पहिल्या दिवसापासूनच हे संकुल यशस्वी ठरले आहे.
वडिलांशी सल्लामसलत करत सलग सहा वर्षांच्या परिश्रमांनंतर अपोलो रुग्णालयाला अमेरिकेच्या जॉइंट कमिशन इंटरनॅशनलची मान्यता मिळाली. रुग्णाची सुरक्षितता आणि गुणवत्ता वाढीसाठी ही मान्यता दिली जाते. प्रीतीच्या प्रयत्नांमुळे मान्यता मिळाली तेव्हा आशियात अशी मान्यता मिळवणारे एकही रुग्णालय नव्हते. प्रीतीचा मोठा मुलगा कार्तिकही अपोलोच्या वित्त व प्रकल्प व्यवस्थापनाचे काम पाहू लागल्याने तिसरी पिढीही लोकसेवा क्षेत्रात दाखल झाली आहे.