आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडियामध्ये उलथापालथ घडवण्याची क्षमता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांनंतर सिलिकॉन व्हॅलीतील तंत्रज्ञान कंपन्यांवर ताशेरे ओढले जात आहे. त्यांच्यामुळे निवडणुकांचे निकाल अपेक्षेपेक्षा वेगळे लागल्याचा आरोप केला जात आहे. सिलिकॉन व्हॅलीतील अनेकांच्या मते, ऑनलाइन जगात मोठ्या प्रमाणावर अफवांचा प्रसार झाला. त्यामुळे निवडणुकांचे निकाल चुकले. परिणामी गुगल आणि फेसबुकने ऑनलाइन जाहिरात धोरणात बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, चुकीच्या बातम्या तसेच विनाकारण अतिप्रसिद्धी देऊन कमाई करणाऱ्या वेबसाइट्स काढून टाकल्या जातील. उशिराने सुचले तरी हे पाऊल शहाणपणाचे आहे. इंटरनेटमुळे सत्य जाणून घेण्यात आपली क्षमता कमी पडत आहे, यामुळे हे पाऊलच उचलणे आवश्यकच होते. या अफवा कोण पसरवतो, याकडे दुर्लक्ष न करता वेगाने तपासकार्य व्हायला हवे. कारण अफवांमुळे होणारे दुष्परिणाम सध्या अत्यल्प प्रमाणात दिसत असले तरी जगभरात या अफवा झपाट्याने पसरवल्या जात आहेत.

फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, वीचॅट, इन्स्टाग्राम आणि वीबोसारख्या सेवांवर अब्जावधी लोक तासन््तास घालवत असतात. सध्याच्या युगात सोशल मीडिया ही सर्वात वेगाने वाढणारी सांस्कृतिक आणि राजकीय ताकद बनत चालली आहे. यामुळे जगभरातील घटनांचे स्वरूप बदलत चालले आहे. अमेरिकन निवडणुकांमधील डोनाल्ड ट्रम्प यांचे उदाहरण ताजे आणि जगावर परिणाम करणारे आहे.
सोशल नेटवर्किंगमुळे समाजात अनेक चांगले बदल दिसत आहेत. त्यामुळे या नेटवर्कचे समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे संपर्क आणि प्रचाराची पारंपरिक माध्यमे मागे पडत आहेत, तर काहींना आपले स्वरूप बदलावे लागत आहे. यात राजकीय पक्ष आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचाही सहभाग आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सेवांमुळे लोकांना कोणत्याही वेळेत, कुणाशीही सहजपणे बोलता येऊ शकते. त्यामुळे यापूर्वी दुर्लक्षित राहणारे लोकही सोशल नेटवर्किंगवरून आपला प्रभाव पाडत आहेत.

हा सामाजिक बदल खूप व्यापक स्वरूपाचा आहे. अमेरिका ते ब्रिटन, ब्रिटन ते आयएस, आयएस ते रशिया आणि पूर्व युरोपातील हॅकर्सपर्यंत सोशल साइट्सचे जग विखुरलेले आहे. माध्यम एकच असले तरी सर्व ठिकाणी आपापल्या पद्धतींनी याचा वापर होतो आणि त्याचे परिणाम आपल्यासमोर आहेत.

युरेशिया ग्रुप ही संस्था जागतिक जोखमांवर संशोधन करते. या संस्थेचे अध्यक्ष इयान ब्रेमर म्हणतात, इंटरनेटवर सक्रिय कोट्यवधी, अब्जावधी लोक सध्याच्या या स्थितीवर खुश नाहीत. त्यांच्या मते, त्यांचे सरकार हुकूमशाही पद्धतीचे झाले असून ते चुकीच्या लोकांची बाजू घेत आहेत. ट्रम्प यांच्या विजयासंदर्भात बोलायचे झाल्यास, त्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात उद्योगांची सद्य:स्थिती आणि अर्थव्यवस्थेबाबत मध्यमवर्गातील चिंता, देशभक्तीत बदल, वंशवाद, अनिवासींविरोधात द्वेषाचे वातावरण, लैंगिक भेदभाव या कारणांचा समावेश होतो.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जनतेची भूमिका सोशल मीडिया ठरवेल, असे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. त्यानुसार ट्रम्प यांनी जगभरातील राजकीय तज्ज्ञांना अक्षरश: तोंडघशी पाडले. नव्या तंत्रज्ञानानुसार, लोकांना तक्रार करण्याचा अधिकार आहे. ब्रेमर म्हणतात, सोशल मीडिया अशा स्वरूपाचा नसता तर ट्रम्प यांचा विजय अशक्य होता. फेसबुकचे भयंकर सत्य असे की, लोकांना आपल्या मर्जीप्रमाणे जग पाहायचे असते. त्यामुळे आपण एका वेगळ्याच काल्पनिक जगात वावरत असतो आणि ते जग सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेले असते. जगात उलथापालथ करण्याची क्षमता असणाऱ्या सोशल नेटवर्किंगला समजून घेण्याची हीच खरी वेळ आहे.
सोशल नेटवर्किंगचे अभ्यासक आणि न्यूयॉर्क विद्यापीठाचे प्रोफेसर क्ले शिर्की म्हणतात, सोशल नेटवर्किंगवर लोक अनेक प्रकारच्या भावना व्यक्त करू शकतात. त्यामुळे ते अधिक शक्तिशाली बनतात. तंत्रज्ञान कंटाळवाणे होईल तेव्हा सामाजिक प्रभाव अधिक रंजक होत जातात. कदाचित भविष्यात आपण तिरस्कार करत असलेल्या नेत्याच्या विजयाला सामोरे जावे लागू शकते. त्याचे परिणामही भोगावे लागू शकतात. डोनाल्ड ट्रम्प तर हिमशिखराचे केवळ एक टोक आहेत, असे म्हणता येईल, त्यापुढील धक्क्यांसाठी आपल्याला तयार राहावे लागेल.

सोशल मीडियाच्या काही निर्णायक भूमिका
- गेल्या दशकात अरब देशांमध्ये सोशल मीडियामुळे अनेक आंदोलने झाली. अमेरिकेतील ऑक्युपाय वॉल स्ट्रीट मूव्हमेंट आणि कृष्णवर्णीयांविरोधात तसेच समर्थनार्थची मोहीम याच मीडियाचे द्योतक होते.
- राजकारणातही सोशल मीडियाची पाळंमुळं रुजली आहेत. २००३मधील हॉवर्ड डीन यांची अपयशी उमेदवारी आणि २००८मध्ये अमेरिकेत पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा विजय झाला.
- या वर्षी ब्रिटनमध्येही फेसबुकवर सुनियोजित मोहिमेद्वारे ब्रेक्झिट घडवून आणले गेले.
- फिलिपाइन्समध्ये रोड्रिगो दुतेर्ते यांना सक्रिय मेयर मानले जात होते. ते नेहमी विरोधकांच्या निशाण्यावर असतात. मात्र, ऑनलाइन समर्थकांचा त्यांना प्रचंड पाठिंबा आहे. यामुळेच ते राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकले.
- अमेरिकेत काही माहिन्यांपूर्वी रिपब्लिकन पार्टीच्या सदस्यांनीच डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात मोहीम उघडली होती. राष्ट्राध्यक्षपदासाठी दुसरा उमेदवार शोधण्यास सुरुवातही केली होती. आज ते त्याच पक्षाचे नेतृत्व करत अाहेत. समर्थकांनी राबवलेल्या ऑनलाइन प्रचार मोहिमेवर त्यांनी विश्वास ठेवला आणि मातब्बर राजकीय विश्लेषकांची भाकिते खोटी ठरवत निवडणुकीत विजय संपादन केला.
फरहाद मंजू, प्रसिद्ध लेखक
बातम्या आणखी आहेत...