आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री भ्रूणहत्येचे पातक आणि निष्क्रिय शासक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पातकी स्त्री भ्रूणहत्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. आपला शेजारी असलेल्या कर्नाटकातील संकेश्वर या गावाजवळच्या हिरण्यकेशी नदीच्या पात्रात तब्बल 16 अर्भकांचे मृतदेह एका वेळेस सापडले आहेत. ही अर्भके साधारणपणे 3 ते 4 महिने वयाची आहेत. अंगावर शहारे आणणारी आणि शरमेने मान खाली घालावीशी वाटणारी ही घटना आहे. हे संकेश्वर म्हणजे बेळगावपासून केवळ 50 आणि कोल्हापूरपासून 60 कि.मी. अंतरावर आहे.
गेल्या वर्षात महाराष्‍ट्रातल्या बीड, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये, गर्भवती महिलेच्या पोटातल्या जिवाचे लिंगनिदान करून, तो मुलीचा गर्भ असेल तर तिचा अवैध गर्भपात करण्याचे शेकडो घृणास्पद प्रकार उघडकीला आले. ही कृत्ये केवळ कायदाच नव्हे, तर माणुसकीदेखील पायदळी तुडवणारी होती. बेळगावातसुद्धा हाच प्रकार घडला आहे. बेळगावचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी या मृत अर्भकांच्या शवांना ताब्यात घेऊन ते ‘बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’मधील न्यायवैद्यक विभागात पुढील तपासणीसाठी दिले. यापुढे आता बेळगाव परिसरातील सर्व इस्पितळे, सोनोग्राफी केंद्रे, प्रसूतिगृहे आणि तिथली कागदपत्रे तपासली जातील. कदाचित या हत्याकांडातील आरोपी डॉक्टर सापडतीलसुद्धा, त्यांना शिक्षादेखील होईल; पण सर्वसामान्य भारतीय नागरिकाला दोन मूलभूत वैचारिक मुद्दे पुन्हा पुन्हा हृदयाला पीळ पाडल्याशिवाय राहत नाहीत.

त्यातील पहिली गोष्ट म्हणजे, आपण भारतीय खरोखरीच स्त्रीला दुय्यम मानतो. आपण देवीला शक्तीचा अवतार मानतो, तिला वंदन करतो; पण मुलगी म्हणून आपल्या घरात तिने अवतार घ्यायला आपण राजी नसतो... का? केवळ मुलगी ही आपले नाव लावत नाही आणि आपल्या वंशाचे नाव उज्ज्वल करत नाही म्हणून, की तिच्या लग्नासाठी आणि त्यानंतर वारेमाप खर्च होतो म्हणून, की मरतेसमयी ती आपल्या तोंडात गंगाजल टाकू शकत नाही म्हणून, की केवळ आपल्या मृत्यूनंतर ती आपल्याला अग्नी देऊ शकत नाही म्हणून? स्त्रीच्या जन्मालाच तुच्छ मानणारे हे वैचारिक दारिद्र्य अशा घटनांतून पुन्हा पुन्हा आपल्यासमोर आपल्याच लोकांच्या कृत्यातले दाहक वास्तव उभे करते. महाराष्‍ट्रात गेल्या वर्षभरात या प्रकारांच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम झाले. लेक वाचवा अभियान, स्त्रियांमधील जागरूकता वाढावी अशा प्रकारचे काही उपक्रम सर्वदूर झाले. वाटत होते की, ही परिस्थिती आता बदलेल; पण संकेश्वरच्या या घटनेने या सा-या आशांवर पाणी पडले.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नीच कृत्यांमधील डॉक्टरांचा सहभाग! आईच्या पोटातील जिवंत अर्भकाला केवळ त्याचा जन्म स्त्री म्हणून होणार आहे म्हणून त्याला मारून टाकणे. हा धडधडीत खूनच असतो. फक्त कायद्यानेच नव्हे, सामाजिक दृष्टीनेच नव्हे, तर वैद्यकीय शास्त्रातल्या नैतिकतेप्रमाणेदेखील ही जाणूनबुजून केलेली मनुष्यहत्याच आहे! आणि वैद्यकीय कौन्सिलच्या नियमाप्रमाणे अशा डॉक्टरांचे नोंदणी प्रमाणपत्र कायमचे रद्द तर होतेच, पण त्यांना कायद्याने शिक्षाही होते. एक अतिशय खेदाची गंभीर बाब अशी आहे की, हे लाजिरवाणे कृत्य फक्त इंडियन पिनल कोड 318 प्रमाणे गुन्हा समजला जातो आणि या कृत्याला केवळ 2 वर्षे सक्तमजुरी आणि थोडाफार दंड होतो. खरे तर या गुन्ह्यांची तीव्रता, त्याचा समाजावर होणारा परिणाम, माणुसकीला आणि वैद्यकीय नीतिमत्तेला सोडून केलेले हे कृष्णकृत्य, या सगळ्यांचा विचार करता यापेक्षा अधिक कठोर शिक्षेची तरतूद या गुन्ह्यासाठी केली गेली पाहिजे.
भारतात मुलगा आणि मुलगी यांच्या घसरत्या प्रमाणाबाबत अनेकदा चर्चा होते. या अशा घटनांनंतर सरकारला जाग येते आणि मग स्त्री भ्रूणहत्या करणा-या डॉक्टरांचा माग काढला जातो. पण हे आधीदेखील होऊ शकते. कर्नाटकात मुलींचे जन्माचे प्रमाण दर 1000 मुलांमागे 943 आहे, पण बेळगाव जिल्ह्याचे प्रमाण त्या राज्यात सर्वात कमी ते म्हणजे 1000 मुलांमागे फक्त 930 मुली! हे घसरते प्रमाण जनगणनेच्या वेळी लक्षात आल्या आल्या ते रोखण्यासाठी पावले उचलली जायला हवी होती. पण दूरदृष्टीचा अभाव हा आपल्या राजकीय पक्षांचा आणि नोकरशाहीचा गुणधर्मच आहे. त्यामुळे अशा घटना घडल्यावर हिंदी सिनेमात गुन्हेगारांनी भरपूर धुमाकूळ घातल्यावर अखेर पोलिस सर्वात शेवटी येतात, तसेच घडले.

अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात संशोधन करणा-या पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्सतर्फे 2005 मध्ये झालेल्या एका सर्वेक्षण अहवालात असे स्पष्ट नमूद केले आहे की, फक्त बेळगाव विभागात कर्नाटकातील एकूण सोनोग्राफी केंद्रांपैकी 20 टक्के केंद्रे आहेत. बंगळुरूसारख्या महानगराखालोखाल ही संख्या आहे. तसे पाहता पर्यायाने बंगळुरूपेक्षा कमी विकसित आणि कमी लोकसंख्येच्या क्षेत्रात
अशी सोनोग्राफी केंद्रे का असावीत? या प्रश्नाला संबंधित विभागाने रास्त उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता तर अशा घटनांना केव्हाच आळा बसला असता.

काही सूत्रांनुसार बेळगाव जिल्ह्यातील ऊस बागायतीने संपन्न असलेल्या हुक्केरी, चिकोडी, रायबाग, अथणी या तालुक्यांच्या भागात अशी असंख्य केंद्रे असून त्यापैकी बहुसंख्य केंद्रांनी त्यांच्या अस्तित्वाची नोंद सरकार दप्तरी केलेली नाही. या परिसरात अशी मानवतेच्या चिंध्या करणारी इस्पितळे आहेत. त्यांचे अनधिकृत एजंटसुद्धा आहेत.
स्त्री भ्रूणहत्येचा राजरोस धंदा करणा-या या इस्पितळांमध्ये फक्त बेळगाव आणि कर्नाटकातीलच नव्हे, तर आपल्या ‘पुरोगामी’ महाराष्‍ट्रा तील आणि ‘प्रगतिशील’ आंध्र प्रदेशमधीलही असंख्य गर्भवती महिला आणल्या जातात. सोनोग्राफीची किंवा त्यातील तपासणीची कुठलीही नोंद न ठेवता या महिलांमधील ‘मुलगी’ हा शिक्का मारलेल्या स्त्रियांचा अवैध गर्भपात त्या भागातील यासाठी प्रसिद्ध असलेल्या रुग्णालयात केला जातो. या शस्त्रक्रियांची अर्थातच कसलीही वैद्यकीय किंवा आर्थिक नोंद त्या रुग्णालयातील रजिस्टरमध्ये ठेवली जात नाही हे सांगायला नकोच. असे गर्भपात करून काढलेले गर्भ प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून त्या महिलेकडे किंवा तिच्या बरोबरच्या नातेवाइकाकडे सुपूर्द केले जातात. हे गर्भ हिरण्यकेशी नदीच्या पुलावरून एखादे निर्माल्य नदीत सोडावे तसे सोडण्याचा सल्लासुद्धा या इस्पितळात दिला जातो.

मृत अर्भके भरून नदीपात्रात सोडलेल्या या पिशव्या संकेश्वरातल्या सुप्रसिद्ध शंकरलिंग मठाजवळ सापडल्या. गेल्या काही दिवसांपासून नदीपात्र कोरडे पडत चालल्यामुळे ही घटना उघडकीला आली. नाहीतर विश्वाच्या संहाराची शक्ती असलेल्या भगवान शंकर महादेवाला आणखी किती पातके बघावी लागली असती कोणास ठाऊक?
सर्व भारतीयांच्या तोंडाला काळे फासणा-या या घटना बंद व्हायला हव्या असतील तर एका बाजूने समाजमनातील तथाकथित पुरुषश्रेष्ठत्वाच्या विचारांबाबत सामाजिक चळवळ उभारून एक वैचारिक क्रांती होणे जसे निकडीचे आहे तसेच या कृत्याला खतपाणी घालणा-या केवळ पैशाच्या लोभापोटी अशा समाजविघातक कृत्यात सहभागी होणा-या डॉक्टरांविरुद्ध यापेक्षाही कठोर कायदे आणि शिक्षांची तरतूद होणे गरजेचे आहे. दिल्लीच्या ‘दामिनी’ प्रकरणात आरोपींना फाशी किंवा तत्सम कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करताना गर्भातच खुडलेल्या या कळ्यांना वाचवण्याकरिता त्याहूनही कठोर कायदा करण्याची मागणी करण्याची वेळ आता निश्चितच आली आहे.


avinash.bhondwe@gmail.com