आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदनाम करणा-या करंटेपणाचा त्याग करू भारतीयांनो!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज आपल्या देशात जनमताचा कानोसा घेतला तर आपल्याला लक्षात येईल की, भारतीय राजकारण आणि प्रशासनावर टीका करणा-यांची जणू स्पर्धा लागली आहे. केवळ ही दोन क्षेत्रेच नव्हे तर इतरही समूहांविषयी लोक अतिशय वाईट बोलत आहेत. आपला देश आणि देशातील आपले बांधव किती वाईट आहेत याविषयी चवीने चर्चा केली जाते आहे. जणू जगातील सर्व लाचखोर, कामचुकार, आळशी, बलात्कारी आणि लबाड माणसे या एकाच देशात जमा झाली आहेत असा समज व्हावा इतके भारतीय मानस बिघडले आहे. व्यवस्थेवरील विश्वास कमी झाल्यावर या पद्धतीचे वातावरण समाजात तयार होते, समाजात हतबलता येते आणि लोक मन मोकळे करण्यासाठी इतरांवर टीका करण्याची संधी शोधत असतात.


हे मान्यच आहे की, आपल्या देशात खूप मोठे आणि सकारात्मक बदल होण्याची गरज आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणारेही लोक आहेतच. मात्र, मूळ मुद्दा असा आहे की, खरोखरच आपला समाज जगाच्या तुलनेत इतका वाईट आहे काय? आणि आपला समाज वाईट असेल तर कोणता समाज चांगला आहे? भारतीय आणि सा-या जगाचा ओढा असलेला अमेरिकन समाज चांगला असावा, असे एक मत समोर येऊ शकते. आणि काही प्रमाणात ते खरेही आहे. मात्र, तो समाज नेमका कसा आहे आणि तो कोणत्या दिशेने चालला आहे यावरील ‘द प्राइस ऑफ सिव्हिलायझेशन’ (2011) हे जेफ्री डी. सॅक्स यांचे सध्या गाजत असलेले पुस्तक नुकतेच वाचनात आले आणि धक्का बसला. हे पुस्तक न्यूयॉर्क टाइम्सचे बेस्ट सेलर असून ‘एंड ऑफ पॉव्हर्टी’ आणि ‘कॉमन वेल्थ’ या प्रसिद्ध पुस्तकांचेही सॅक्स लेखक आहेत.


मानवी समाजाच्या विकासाची आणि संघटनाची प्रगत अवस्था म्हणून आज जग अमेरिकन समाजाकडे पाहते. मात्र, तो समाज खरोखर कोठे आहे याची शेकडो उदाहरणे सॅक्स यांनी या पुस्तकात दिली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय समाजातील त्रुटींकडे आणि विकासाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची संधी हे पुस्तक आपल्याला देते. जेथे प्रचंड नागरीकरण झाले आहे, तो अमेरिकन समाज असा आहे तर साधने आणि गरजांची आता कोठे जुळवाजुळव करणा-या भारतीय समाजाला सतत बदनाम करण्याचा करंटेपणा आपण थांबवला पाहिजे हे शहाणपण तर त्यातून नक्कीच घेता येते. अमेरिकन समाज आणि व्यवस्थेवर भाष्य करणारा हा लेखक अमेरिकन अर्थतज्ज्ञ आहे आणि त्याने पुराव्यानिशी विधाने केली आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.


सर्व पुस्तकाचा गोषवारा देणे येथे जागेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. मात्र, सॅक्स यांनी आपल्या प्रस्तावनेत केलेले उल्लेखही आपले डोळे उघडायला पुरेसे आहेत. त्यातील काही प्रमुख असे आहेत : 1. बेरोजगारीचा पेचप्रसंग, उत्पन्न, संपत्ती आणि सत्तेतील विषमता वाढत चालली असून ती अतिशय घातक आहे. 2. राष्ट्रीय राजकारणात भ्रष्टाचार वाढला असून अर्थसंकल्प, ऊर्जा धोरण आणि शिक्षण या कळीच्या विषयांवर दीर्घकालीन नियोजनाचा अभाव आहे. 3. अमेरिकन अर्थव्यवस्था अशा संकटात आहे की, तिला आता तत्कालिक उपाय पुरे पडण्याची सुतराम शक्यता नाही. जगाचे नेतृत्व करणा-या समाजाने स्वत:च्या समस्यांचा खोलवर जाऊनच विचार केला पाहिजे. 4. जगातील तरुण पिढीला आता खरी लोकशाही हवी आहे. ऑक्युपाय वॉल स्ट्रीट ही चळवळ जगभर का पसरली याचा धोरणकर्त्यांनी विचार केला पाहिजे. श्रीमंतांची मुजोरी आणि त्यांच्या भ्रष्टाचाराला समाज वैतागला आहे. 5. जागतिकीकरणाने आणि 200८ च्या पेचाने जगाची अर्थव्यवस्था एक झाल्याचे सिद्ध केले आहे. अर्थरचना, रोजगार, उत्पादन यात जगात आमूलाग्र बदल होत असून त्यातून हरणारे आणि जिंकणारे असे दोन गट तयार झाले आहेत. आपण नाकारले जातो आहोत, अशा नागरिकांची संख्या अमेरिकेत वाढत चालली आहे. ६. श्रीमंतांवरील कर कमी करा आणि सामाजिक कार्यक्रमांवरील खर्च कमी करा, अशी वकिली अर्थतज्ज्ञ करत आहेत. मात्र, त्यामुळे विषमतेची दरी वाढतच चालली आहे. ७. मोठ्या कंपन्यांची कायद्याविषयीची बेफिकीरी, कंपन्याच्या सीईओचे अनिर्बंध पगार आणि राजकीय नेत्यांचे कॉर्पोरेट जगताशी थेट साटेलोटे याचाही आर्थिक पेचप्रसंगात मोठा वाटा आहे. ८. गुगलसारख्या कंपन्याही कर वाचवण्यासाठी टॅक्स हेवन म्हणजे करमुक्त असलेल्या बेटांवर आपला व्यवसाय असल्याचा खोटेपणा करत आहेत. अमेरिकेत चाललेली ही उघडउघड करचोरी देशाच्या अजिबात फायद्याची नाही. ९. 200८ पासून सरकारवरील कर्ज दरवर्षी 1 ट्रिलियन डॉलर (एक लाख कोटी रुपये) इतके वाढत असूनही त्याविषयीचे धोरण बदलताना दिसत नाही. 10. वॉल स्ट्रीटवरील बँकिंगमधील पैसा हा सट्टेबाजीसाठी वापरला जातो हे तर आता लपून राहिलेले नाही. मात्र, त्या बँका कायद्यांना जुमानत नाहीत हेही आता स्पष्ट झाले आहे. त्या सातत्याने कायदा मोडतात म्हणूनच त्यांच्याकडून कोट्यवधी डॉलरची वसुली आतापर्यंत झाली आहे. अरे, पण काही नैतिकता शिल्लक आहे की नाही ?


आपल्या लक्षात आले असेल की, ज्या अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या देशातील तज्ज्ञ धोरण ठरवण्याची भाषा करतात त्या अमेरिकेत नेमके काय चालले आहे! जणू माणसातील नैतिकता विकून तो समाज जगतो आहे, अशी टिप्पणी लेखकाने केली आहे. पुस्तकाचा विषय मोठा आहे, मात्र या पार्श्वभूमीवर आपण भारतीय समाजाकडे पाहिले की आपण आपल्या समाजाविषयी वाईट बोलण्याचे पाप करण्यात धन्यता मानणार नाही. भारतीय समाज स्वत:कडे इतक्या नकारात्मक दृष्टीने पाहायला लागला याचे कारण ब्रिटिशांनी 150 वर्षे भारतीय समाजाचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान ठेचण्याचे काम केले हे आपल्याला माहीत आहे. त्यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न करायचे सोडून ऊठसूट त्याला तू किती नालायक आहे, हे आपण का सांगत आहोत? ब्रिटिशांची सत्ता आणि अमेरिकन जीवनशैलीचे भूत एवढे आपल्यावर स्वार झाले आहे की काय ? आपण हेही विसरत आहोत की, प्रचंड नैसर्गिक साधनसंपत्ती असलेल्या अमेरिकेची लोकसंख्या फक्त 33 कोटी आहे आणि अमेरिकेपेक्षा लहान असलेल्या भारताची लोकसंख्या तब्बल 122 कोटी आहे!