आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्रष्टा साहित्यिक : डॉ. एस. एल. भैरप्पा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अवघ्या दोन वर्षांत 22 आवृत्त्यांचा पल्ला गाठणारी ‘आवरण’ ही कादंबरी भैरप्पा यांनी लिहिली. ही कादंबरी विविध भाषांतील लाखो वाचकांच्या पसंतीस उतरली आहे. आजवर त्यांनी 21 कादंब-या लिहिल्या आणि त्या सर्वच लोकप्रियही ठरल्या. भारतातल्या आघाडीच्या कादंबरीकारांमध्ये भैरप्पा यांचे स्थान वरचे आहे. कुठल्याही विषयावर लिखाण करण्याआधी त्या विषयाचा सर्व अंगाने अभ्यास-वाचन करतात. भरपूर परिश्रम घेतात. त्या विषयातील तज्ज्ञांशी विचारविनिमय करतात. ‘पर्व’ ही कादंबरी लिहिण्यापूर्वी त्यांनी तब्बल साडेसहा वर्षे महाभारतकालीन जीवनविषयक ग्रंथांचा अभ्यास केला होता.

फेब्रुवारी 2007मध्ये ‘आवरण’ प्रकाशित झाली. 2009पर्यंतच हिची 22 पुनर्मुद्रणे झाली. तीन वर्षांत या कादंबरीवर 10 चर्चासत्रे झाली. या पुस्तकावर 10 पुस्तके प्रकाशित झाली, त्यापैकी 4 पुस्तकेही ‘आवरण’वर टीका करणारी आहेत. ‘आवरण’ने कन्नड पुस्तकांच्या खपाचे आजवरचे सारे विक्रम मोडून काढले आहेत. वाचकांनी या कादंबरीला डोक्यावर घेतले आहे, तर दुस-या बाजूला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते यू. आर. अनंतमूर्ती, गिरीश कर्नाड, चंद्रशेखर कंबार अशा नामवंत कन्नड लेखक-नाटककारांनी या कादंबरीवर टीकेची झोड उठवली. गंमत म्हणजे, जी नामवंत विचारवंत मंडळी आवरणवर टीका करत आहेत, त्या प्रवृत्तीची हुबेहूब पात्रे आवरण कादंबरीत आहेत. सत्य झाकोळणा-या (दडपून टाकणा-या) प्रवृत्तीला पुराव्यानिशी उघडे पाडणे, हा या कादंबरीचा गाभा आहे. सत्य कोणाच्या रागालोभाची पर्वा करत नाही. एका अर्थाने आवरण ही सत्यनिष्ठ कादंबरी आहे. ‘हिडनटॉरिझन्स : 1000 इअर्स ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन’चे लेखक एन. एस. राजाराम यांनी आवरणची तुलना डॅन ब्राऊन यांच्या विश्वविख्यात ‘दा-विंचीकोड’ या कादंबरीशी केली आहे. स्वार्थी आणि प्रभावी शक्तींनी दडपून ठेवलेला खरा इतिहास समोर आणणे, हे दोन्ही कलाकृतींमधील समान सूत्र आहे.
कादंबरीची सुरुवात फ्लॅशबॅक पद्धतीने होते. ही कादंबरी ऐतिहासिक आणि वर्तमान या दोन स्तरांवर उलगडत जाते. 1992मध्ये बाबरी ढांचा पाडण्यात आल्यानंतर समाजात धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असते. त्यानुसार प्राचीन वास्तू-शिल्पांवर आधारित माहितीपट निर्माण करण्याचे काम आमिर आणि रझिया कुरेशी यांच्यावर सोपवण्यात येते. माहितीपटाच्या प्राथमिक तयारीसाठी दोघेही विजयनगर (हंपी) येथे येतात. तेथील उद्ध्वस्त मंदिरे पाहून रझिया अंतर्मुख बनते.

रझिया ही पूर्वाश्रमीची हिंदू असते. लक्ष्मी हे तिचे आधीचे नाव. आमिरच्या प्रेमात पडून तिने धर्मांतर केलेले असते. घरातून वडलांचा विरोध असूनही पुरोगामी विचारांच्या प्राध्यापक शास्त्री यांच्या प्रोत्साहनामुळे आणि आमिरच्या आधुनिक विचारांमुळे ती मुस्लिम बनते. रझिया सत्यावर आधारित डॉक्युमेंटरीचा आग्रह धरू लागते अन् आमिर मात्र सत्याशी प्रतारणा करत असल्याचे तिच्या ध्यानात येऊ लागते. दरम्यान, तिच्या वडलांचे-आप्पांचे निधन होते. लक्ष्मी तब्बल 28 वर्षांनंतर आपल्या गावी पोहोचते. कादंबरीला ख-या अर्थाने कलाटणी मिळते ती इथे. रझियाला छळणा-या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची आशा तिच्या मनात येथे निर्माण होते. तिच्या वडलांनी एकत्रित केलेली ग्रंथसंपदा तिच्या हाती लागलेली असते. आप्पांनी काढलेली टिपणे आणि त्यांचा व्यासंग पाहून लक्ष्मी स्तिमित होते. तिथेच राहून अभ्यास करायचा निर्णय ती घेते. लक्ष्मीने परधर्मात जाऊन विवाह केल्यानंतर आप्पांनी मुस्लिम धर्म, मुस्लिम चालीरीती, त्यांची आक्रमणे, भारतात आणि भारताबाहेर घडवलेला विध्वंस यांचा अभ्यास सुरू केलेला असतो. यावर आधारित एक गंभीर पुस्तक लिहायचा त्यांचा निर्धार असतो, पण त्यांच्या मृत्यूने ते काम अधुरे राहिलेले असते. वडलांनी जमवलेली पुस्तके आणि त्यांनी काढलेली टिपणे यांच्या साहाय्याने ते अधुरे काम पूर्ण करण्याचे लक्ष्मी ठरवते. ती ऐतिहासिक पुराव्यांवर आधारलेली कादंबरी (कादंबरीतील कादंबरी) लिहू लागते.

लक्ष्मीच्या कादंबरीतील नायक रजपूत राजपुत्र आहे. युद्धात पराभव झाल्याने त्याला गुलाम म्हणून राहावे लागते आहे. त्याचे बीज फोडून त्याला खोजा म्हणून जनानखान्यात ठेवलेले असते. या खोजाच्या माध्यमातून लक्ष्मीची कादंबरी उलगडत जाते. या राजपुत्राच्या वाट्याला काय काय येते? काशीविश्वनाथाचे मंदिर उद्ध्वस्त होतानाचा प्रसंग, गंगेच्या किनारी भेटलेल्या साधूशी संवाद आणि त्यातून त्याच्या मनाला आलेली उभारी हे सारे प्रत्यक्ष कादंबरीतच वाचा. शिवरायांच्या प्रेरणेने स्वातंत्र्याचा बिगुल वाजवणा-या छत्रसालाकडे हा खोजा जायला निघतो आणि रझियाच्या कादंबरीचा शेवट होतो. पण त्या कादंबरीच्या प्रकाशनानंतर उठलेला हलकल्लोळ, वेगाने घडणा-या घडामोडी ‘आवरण’च्या शेवटच्या भागात रेखाटल्या आहेत. आवरणमधील रझियाच्या कादंबरीला जो विरोध झाल्याचे आवरणमध्ये वर्णन आले आहे, तसाच विरोध आवरणला झाला. याला कादंबरीकाराचे द्रष्टेपणच म्हटले पाहिजे. रझियाने आपल्या कादंबरी लेखनासाठी ज्या इतिहासग्रंथांचा आधार घेतलेला असतो, ती संदर्भग्रंथांची यादी न्यायालयीन लढ्यासाठी घेण्यात येते. येथे आवरण कादंबरी समाप्त होते. भैरप्पा यांनी लिहिलेल्या ‘आवरण’ या कादंबरीची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. कादंबरीतील वर्तमान संदर्भ खूपच बोलके आणि जिवंत आहेत.