आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुकटची करमणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणुकांचे दिवस जवळ येताहेत तसे राजकारणी मंडळींकडून जनतेची बेभान करमणूकसेवा सुरू झाली आहे. गर्दी दिसली की, राजकारण्यांची रसवंती मुक्तपणे वाहू लागली आहे. बेभान आणि लोकप्रिय राजकीय वक्त्यांची वानवा महाराष्ट्राला कधी पडली नाही. अशा वक्त्यांची यादीच करायची म्हटले तर ठाकरे परिवाराचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. लाखा-लाखाच्या सभा घेण्याचे भाग्य बाळासाहेब ठाकरे आणि आता त्यांचा पुतण्या राज यांना लाभले आहे. बाळासाहेबांनी अर्वाच्य भाषा वापरली. समाजातल्या मोठ्या वर्गाने ठाकरी शैली म्हणून ती डोक्यावर घेतली. जनतेच्या मनातला मुद्दा घेऊन बेछूट बोलण्याची कला त्यांच्या पुतण्यालाही साधली आहे. बाळासाहेबांचे वारसदार उद्धव यांच्या उसन्या आक्रमक अवसानाला मात्र लोकांची फारशी पसंती मिळालेली नाही. शिवसेनेच्या जुन्या फळीत फर्ड्या, शैलीपूर्ण वक्त्यांची रांगच होती. आताच्या शिवसेनेत सभा गाजवणारा वक्ता उरलेला नाही. भारतीय जनता पक्षात वक्ते घडवण्याचे रीतसर प्रशिक्षणच दिले जाते. प्रमोद महाजन याचे सर्वोत्तम उदाहरण होते. गोपीनाथ मुंडे यांनी आक्रमक आणि बेडरच्या नावाखाली जितक्या जणांवर जितके आरोप केले, त्यातले बहुसंख्य आरोप बेछूट आणि बिनबुडाचे म्हणून इतिहासजमा झाले. तरीही मुंडे कोणावर बरसतात, हे ऐकण्यासाठी लोक गर्र्दी करतातच.

भाजपमधल्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस या मोजक्या नेत्यांनी विकासावर भर देण्याची परंपरा सुरू केली असली तरी ती सर्व थरांना अजून आपलीशी वाटत नाही. एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार ही भाजपतली आणखी काही बोलकी नावं. भाजप-सेनेचे नवे मित्र रामदास आठवले यांनी राजकीय सभांमध्ये शीघ्रकाव्य करणारा राजकवी अशीच ओळख निर्माण केली आहे. राज्यात कुठेही गेले तरी त्यांच्या शीघ्रकवितांच्या कार्यक्रमाला गर्दी होते. काँग्रेसला सभेचे फड मारणा-या आणि गर्र्दी जमवणा-या वक्त्यांचा नेहमीच दुष्काळ जाणवतो. अपवाद दिवंगत विलासराव देशमुखांचा. खुसखुशीत, नर्मविनोदी भाषणांनी विलासराव कोणत्याही सभेत चैतन्य निर्माण करायचे. समयोचित भाषणे करण्यात सुशीलकुमार शिंदे पटाईत. विरोधकांच्या टोप्या उडवत बोलण्यात पतंगराव कदमांचा हातखंडा आहे.

काँग्रेसमध्ये नवे असलेले नारायण राणे यांनी जुनी दमबाज शैली मवाळ केली असली तरी त्यांच्या रोखठोक भाषणांना चांगला प्रतिसाद मिळतो. राष्ट्रवादी काँग्रेसकडे तुलनेने वक्ते भरपूर आहेत. विरोधकांवर तुटून पडणारे छगन भुजबळ, ग्रामीण म्हणी-वाक्प्रचारांचा सढळ वापर करणारे दिलीप सोपल-लक्ष्मणराव ढोबळे, सुसंस्कृत प्रतिमेला धक्का न लागू देता मोजूनमापून टीका करणारे आर. आर. पाटील या वक्त्यांना ऐकण्यासाठी लोक जमतात. शेकापचे वयोवृद्ध एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख यांच्या संयमित शब्दांतल्या प्रामाणिक भूमिका ऐकण्याची उत्सुकता लोकांमध्ये आजही कायम असल्याचे दिसते. शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावरून पोटतिडकीने बोलणारे वक्ते म्हणून राजू शेट्टी, पाशा पटेल, लक्ष्मण वडले, सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वक्त्यांमध्ये स्थान निर्माण केले आहे.


या सगळ्या राजकीय वक्त्यांच्या मांदियाळीत गेल्या काही महिन्यांत सर्वाधिक चर्चा झाली ती अजित पवार या एकाच नावाची. स्पष्टवक्तेपणा आणि फटकळपणा यासाठी ओळखले जाणारे अजित पवार आता बेतालपणासाठी प्रसिद्ध झाले आहेत. अजितदादांच्या भाषणांनी जी खळबळ माजवली तसा गोंधळ दीर्घकाळ कोणी घातला नव्हता. अजित पवारांची भाषणे आता चानलवरूनसुद्धा लाइव्ह कव्हर होतात. या वेळी अजितदादा काय बडबडतात हे टिपण्याची संधी कोणीच गमावू इच्छित नाही. पवारांच्या खालोखाल सध्या हा मान गोपीनाथ मुंडे यांनी मिळवला आहे. निवडणूक खर्चाच्या बाबतीत ते नेहमीच्या शैलीत बेधडकपणे बोलले आणि त्या विधानाची सारवासारव करताना भाजपची दमछाकच झाली. राष्ट्रवादीचे एक बरे आहे. अजित पवारांच्या वक्त्याचा खुलासा वगैरे देण्याची भानगडच नाही. दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडवणारे त्यांचे वाक्यच मुळात इतके संतापजनक होते की, स्वत: पवारांनाच आत्मक्लेश वगैरे करून घ्यावा लागला. त्यानंतर आताची सांगली महापालिकेची निवडणूक. एका महापालिकेच्या निवडणुकीची सत्ता मिळवण्यासाठी राज्यातल्या सत्तेत भागीदार असलेल्या मित्रपक्षावर कोणत्या शब्दांत टीका करावी, याचे भानच पवारांना उरले नाही. समोरून येणा-या टाळ्या आणि हशा यामुळे ते इतके बहकले की, त्यांना ना वयाचे भान राहिले, ना शब्दांचे, ना मुद्द्यांचे. कोणी, किती आणि कशा जमिनी लाटल्या, टायरात घालून ठोकले त्यालाच सॅल्यूट ठोकायला पोलिसांना लाज वाटते, लयीच फुडंच बोलतात, असली वक्तव्ये जशीच्या तशी राष्ट्रवादीतल्याही अनेकांना लागू करता येतील, हेच अजित पवार विसरले. सांगलीतल्या मतदारांनी ती चूक केली नाही.

राजकीय-सार्वजनिक जीवनात वावरताना कसे बोलावे आणि कसे वागावे याचा आदर्श वस्तुपाठ शरद पवार यांच्या रूपात अजितदादांच्या घरातच आहे. पाच दशकांच्या दीर्घ कारकीर्दीत शरद पवारांनी असंस्कृत विधान केलेले नाही. शरद पवार बोलताना कधीही त्यांच्या आवाजाची पट्टी चढत नाही. त्यांना अवास्तव अंगविक्षेप करावे लागत नाहीत. स्थानिक प्रश्न, व्यक्ती, बोली, संदर्भांचा मार्मिक उल्लेख करीत श्रोत्यांशी जवळीक साधण्याची पवारांची शैली आहे. पवारांच्या वक्तव्यांचा अर्थ काढण्यात कित्येकांचे दिवस जातात. विरोधकांच्या मर्मस्थळावर अचूक वेळी नेमका हल्ला चढवणा-या पवारांचा निवडणुकीच्या काळात अनेकांना धाक वाटतो. शालजोडीतल्या चिमट्यांनी आणि सभ्य भाषेतल्या टोमण्यांनी गारद करण्याची सदाशीवपेठीची कला त्यांना जमते. त्यामुळेच सभा जिंकणारे वक्ते म्हणून शरद पवारांचे नाव घेतले जात नसले तरी पवार काय म्हणतात याकडे कोणीच दुर्लक्ष करू शकत नाही. अजित पवारांनी काकांकडून धडे घ्यायला हवेत.
अल्पकाळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर असताना बॅरिस्टर बाबासाहेब भोसलेंची अनेक वक्तव्ये वादग्रस्त ठरली. स्वपक्षीय आमदारांनाच गिधाडे, खटमल, मच्छर असली शेलकी विशेषणे वापरली. एकदा तर ‘माझ्याजवळची गाजरं संपली आहेत, म्हणून मी काय देऊ शकणार,’ असे ते म्हणाल्याचे छापून आले. कहर म्हणजे याचा आधार घेत काँग्रेसच्याच नानाभाऊ एंबडवार यांनी थेट विधिमंडळात प्रश्न केला, याचा अर्थ काय होतो? मंत्रिमंडळातील सगळ्या मंत्र्यांना आणि महाराष्ट्रात जी महामंडळे आहेत त्यांच्या अध्यक्षांना किती लांबीची गाजरं दिली आहेत? याच बॅरिस्टर भोसल्यांनी काँग्रेसमधल्या विरोधकांना उद्देशून भाषा बंडाची, वृत्ती गुंडाची व कृती षंढाची, असे उद्गारही काढले होते. सांगली महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमधल्या जबाबदार नेत्यांनी वापरलेली भाषा बॅरिस्टर भोसल्यांची आठवण करून देणारी होती. राजकीय वार-पलटवार यातून होणारी फुकटची करमणूक लोकांना हवीच असते. मुख्यमंत्रिपदाची ईर्षा बाळगणा-या माणसाने ती स्वत: पुरवावी का, एवढाच औचित्याचा मुद्दा आहे.