आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाजराची पुंगी - आमदाराचे ‘मार्केटिंग’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या राजकारणी आणि त्यांचे पुत्र यांच्या कारभाराचे किस्से राज्यभरात गाजत आहेत. कोणी मुलाला जमिनींची खिरापत वाटली, तर कोणी मोटारबोटीचे कंत्राट पदरात पाडून दिले. मुलाला पायावर उभे करून देण्यासाठी बाप नाही तर मग कोण खटपट करणार हो! असो. मुद्दा इथे मुलाच्या नाही, तर जावयाच्या करिअरचा आहे. एक वेळ मुलाची समजूत घालता येईल; मात्र जावईबापूंचा रुसवा म्हणजे मग भलताच मोठा सासुरवास. त्यामुळे जावईबापूंना खूश ठेवणेही आलेच ओघाने. नाशिकमधील एका आमदाराला सध्या जावयांसाठी चांगलेच मार्केटिंग करावे लागत आहे.
अर्थात यातील जावईबापू स्वत:च्या पायावर सक्षमरीत्या उभे आहेत. केवळ व्यवसायच नाही तर राजकारणाशीही त्यांचा जवळून संबंध आला आहे. एवढय़ा भल्यामोठय़ा व्यापात असताना त्यांनी पाणी विकण्याचा धंदा सुरू केला आहे. आता राजकारणी आणि पाणी विकणार म्हटले म्हणजे जरा अजबच ना? परंतु आता जमाना पाणी फुकट नाही, तर विकत देण्याचा आला आहे. त्यामुळे त्यात जावयांचे आणि त्यांच्या व्यवसायाचे मार्केटिंग करणार्‍या आमदारांचा काय दोष? अलीकडेच आमदारांचे मार्केटिंग सगळ्यांसाठीच म्हणे डोकेदुखी ठरले आहे. मध्यंतरी एका अधिकार्‍याला याचा चांगलाच अनुभव आला. परजिल्ह्यातून आलेला अधिकारी सरकारी गेस्ट हाऊसमध्ये थांबलेला होता. त्याने बाटलीबंद पाणी मागितले, तर कर्मचार्‍याने स्थानिक कंपनीची बाटली पुढे केली. अधिकारी म्हणाला मला बिसलरी हवी. मात्र, कर्मचारी म्हणाला : अहो आमदारांची सूचना आहे की, स्थानिक कंपनीचे पाणी विकले नाही तर स्थानिकांना रोजगार कसा मिळेल? आता आमदारांकडून स्थानिकांसाठी मार्केटिंग सुरू असल्यामुळे अधिकारी काय त्यावर बोलणार? त्याने निमूटपणे बाटली तोंडाला लावली आणि भागवली आपली तहान.