आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीच्या कक्षा भेदण्याचे सामर्थ्य मिळो...,- संमेलनाचे उद््घाटक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन-अडीच वर्षांपूर्वी जगभरातील लोकांचे एका बातमीने लक्ष वेधून घेतले होते. ती म्हणजे पेरुमल मुरुगन या तामिळ लेखकाने लेखक म्हणून केलेल्या आत्महत्येची. म्हणजे तो व्यक्ती म्हणून जिवंत होता, पण लेखक म्हणून आत्महत्या केलेली होती. लेखकाची आत्महत्याच मुळी गंभीर गोष्ट आहे. त्याने लिहिलेल्या कादंबरीवरून त्याला लोकांनी इतका त्रास दिला की त्याने आपल्यातील लेखकाला मारून टाकले. लेखक असा मरत नसतो. तो कधी ना कधी पुन्हा उगवून येतो. आपल्या महान देशामध्ये स्वतंत्र विचार करणाऱ्यांना गोळ्या घालण्याची, मुंडके उडवण्याची परंपरा फार प्राचीन आहे. आजतागायत हा जो संघर्ष चालू आहे तो नेमका काय आहे? हा संघर्ष नेमका कोणामध्ये आणि कशासाठी चालू आहे? तर ज्यांची प्राचीन काळापासून सत्ता आणि संपत्तीवर म्हणजे हितसंबंधांवर पकड आहे, त्यांचे हितसंबंध सुरक्षित राहावेत, यासाठी माणसे संपवण्याचा, त्यांच्यातील लेखक संपवण्याचा हा मोठा कुटिल डाव आहे. 
   
एकदा विवेक हरवला की माणूस स्वत:हून गुलाम होतो. त्याचे स्वातंत्र्य तो स्वत:च नाकारतो.  कुठल्याही जातीपेक्षा, धर्मापेक्षा माणसाचे माणूसपण महत्त्वाचे असते. माणूसपण वाढलेला भारतीय माणूस आपल्या घटनाकारांना अपेक्षित होता आणि आहे. मग त्यातल्या अडचणी कोणत्या हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यात क्रमाने वाढत गेलेले औद्योगिकीकरण. याचा अर्थ असा नाही की औद्योगिकीकरण होऊ नये. भारतामध्ये पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर असा ताळमेळ घालण्यात आलेला होता. ‘कल्याणकारी राज्य’ ही संकल्पना त्यातूनच उदयाला आलेली होती. परंतु जागतिकीकरणाच्या रोड रोलरखाली कल्याणकारी राज्य ही संकल्पना चिरडून गेली. 
 
भारतीय माणूस आपल्या जातीत आपली सुरक्षितता शोधू पाहतो आहे. जातींचे संघटन वाढवून आपले प्रश्न सुटतील असे त्याला वाटत आहे. आज काही लोक जातिव्यवस्था किती चांगली होती, ‘जाती बुडाल्या तर देश बुडेल’ असे जाहीरपणे सांगत आहेत. अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे. ते कोणाच्या दावणीला सामान्यांना नेऊन बांधतील ते सांगता येत नाही! आणि नेमके तेच त्यांना हवे आहे. लेखक-कलावंतांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे स्वातंत्र्य होय. स्वातंत्र्य हा कुठल्याही माणसाचा मूलभूत आणि जन्मत:च प्राप्त होणारा अधिकार आहे. पण भोवतीचा समाज, धर्म, सत्ता इ. गोष्टी या स्वातंत्र्यावर सतत नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. या स्वातंत्र्यासाठी खराखुरा संघर्ष सुरू झाला तो अव्वल इंग्रजी कालखंडातच. राजा राममोहन राय, म. फुले अशा झुंजार लोकांनी तो सुरू केला. अगदी अलीकडे विजय तेंडुलकर यांचा संघर्ष समाजाच्या डोळ्यात तेल घालणारा आहे, तर पुरस्कार वापसीमध्ये जे लेखक सहभागी झाले, ते मूलत: लेखकांच्या स्वातंत्र्यासाठी आणि प्रतिष्ठेसाठीच संघर्ष करीत होते. स्वातंत्र्य ही मोठी जबाबदारीची, जोखमीची गोष्ट असते. ती कशासाठी वापरायची, हा खरा गंभीर आणि महत्त्वाचा प्रश्न असतो. लेखक, विचारवंत, इतिहासकार आणि शास्त्रज्ञ माणसाच्या शोषणाबदल आणि मुक्तीबद्दल बोलत असतात तेव्हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो असा की लेखक-कलावंत आपल्या स्वातंत्र्याचा वापर नेमका कशासाठी आणि कोणासाठी करतात? 
कुठलाही लेखक लेखनामध्ये कोणाच्या बाजूने उभा आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मराठीमध्ये श्रमिकांच्या, कामगारांच्या, दलित-शोषितांच्या वेदनांशी सहकंप होणारे साहित्य फारसे नाही. साधारणत १९२० नंतरच्या काळापासून काही ठळक-ठळक आविष्कार झालेले दिसतात. वि. वा. हडप आणि भा. वि. वरेरकर ही प्रारंभीची नावे दिसतील. कुसुमाग्रजांच्या काही कविता दिसतील. पुढे मुक्तिबोध, करंदीकर आणि नारायण सुर्वे ही ठळक नावे. दलित साहित्याच्या प्रारंभीचे नाव म्हणून अण्णाभाऊ साठे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. बाबूराव बागूल, दया पवार, नामदेव ढसाळ अशी अनेक नावे सांगता येतील. याचा अर्थ एवढाच की, दलित साहित्याने शोषणाचे सारे रंग प्रकट केले. ग्रामीण जीवनासंबंधी लिहिणारे काही लेखक शेतकरी आणि ग्रामीणांच्या शोषणावर आपले लक्ष केंद्रित करतात. वैचारिक वाङ््मयात मात्र वि. रा. शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कॉ. श्री. अ. डांगे यांच्यापासून रा. ना. चव्हाण, बाबा आढाव यांच्यापर्यंतची परंपरा सांगता येईल. आपल्याच मध्यममार्गी जीवनाला कादंबरीरूप देणारे विपुल लेखक मराठीत आहेत. पण त्याबाहेरही मोठे जीवन आहे ते समजून घेतल्याशिवाय आपले जीवनही आपल्याला नीट समजणार नाही, याचे भान त्यांना नाही असे तरी झाले असावे?  सामान्य माणसांनी या गतानुगतिकतेचा विचार तर केलाच पाहिजे. परंतु लेखक, कलावंत, विचारवंत, इतिहासकार, शिक्षक आणि शास्त्रज्ञ यांना काही नवा विचार करायचा असेल तर चाकोरीच्या बाहेर येणे गरजेचे असते. म्हणूनच दलित इतिहासकार, मराठा इतिहासकार, ब्राह्मण शास्त्रज्ञ, ओबीसी विचारवंत अशी वर्गवारी वेडगळपणाची असते. पण आपण ती करतो. विशेषत दलितांबद्दल करतो. डॉ. रावसाहेब कसबे दलित विचारवंत असतात, पण पु. ग. सहस्रबुद्धे, नरहर कुरुंदकर मात्र नुसतेच विचारवंत असतात. वस्तुत: वर निर्देशिलेले तिन्ही विचारवंतच आहेत. एकूण काय की, कुणाचा कुठेही जन्म होवो, लेखक-कलावंतांना आणि विचारवंतांना आपापल्या जातीच्या आणि धर्माच्या कक्षा ओलांडून बाहेर पडता आले पाहिजे. असे कक्षा भेदण्याचे त्यांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. तरच लेखकांच्या हाती काही नवे आणि चांगले लागेल.
बातम्या आणखी आहेत...