आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
‘मागच्या वर्षी ‘मिसेस सीएम’नी कराडच्या वाड्यावर काय दणक्यात होळी साजरी केली...!’ सुनेत्रा वहिनींचं हे पालुपद गेले वर्षभर ऐकून बारामतीकर दादांचे कान पकले होते. त्यामुळे यंदा आपल्याच फार्म हाऊसवर होळी सेलिब्रेशन करण्याचा चंग त्यांनी बांधला होता. मात्र, दुष्काळी परिस्थितीत शाही सोहळ्यांवरून घडलेलं रामायण दादा विसरले नव्हते. त्यामुळे मोजक्याच ‘तरुण’ मित्रांना निमंत्रण देण्याचे फर्मान त्यांनी सोडले. (मात्र, या पार्टीची खबर काकांच्या कानावर जायला नको, अशी तंबीही त्यांनी दिली होती.) पडत्या फळाची आज्ञा शिरोधार्य मानून रायगडकर सुनीलही लगोलग तयारीला लागले.
बरोब्बर होळीच्या आदल्या दिवशी प्रमुख ‘मित्रां’च्या आयपॅडवर दादांचा निमंत्रणरूपी मेल धडकला. वांद्र्यातील दादू, कृष्णकुंजचे राजे, कराडवाले बाबा... आणि हो आठवलं..... रामदासजीही निमंत्रितांच्या यादीत होते. सकाळी सकाळीच मिलिंदनं निमंत्रणाचा मेल वाचून दाखवला, त्यामुळे दादूंच्या कपाळावर आठ्याच पडल्या, पण कराडवाले बाबाही येणार म्हटल्यावर मग त्यांनी होकार कळवला.
‘चार मराठी माणसं एकत्र येत असतील तर आपल्या जाण्यात गैर काय?’ अशी समजूत नांदगावच्या बाळूने काढल्यानंतर राजेही तयार झाले.होळीच्या रामप्रहरीच कलानगर व कृष्णकुंज गडावरून दोन स्वतंत्र आलिशान गाड्या बारामतीच्या दिशेने रवाना झाल्या. दादू कॅमेरा (अन् रामदास यांनाही) सोबत घ्यायला विसरले नाहीत. दुपारी बारापर्यंत ही सर्व मंडळी दादांच्या फार्म हाऊसवर पोहोचली. ऐन दुष्काळातही फार्म हाऊसचा परिसर हिरवाईने नटलेला पाहून सर्वांचंच मन भरून आलं. जलसंपदाची चार टॅँकर्स दररोज बागेला पाणी घालत होती. बहरलेली फुलबाग, विस्तारलेली ‘मनी प्लॅँट’ची वेली कॅमे-यात टिपण्याचा मोह दादूंना आवरता आला नाही. प्रवेशद्वारावर चार कंत्राटदारांसह सुनीलजीही स्वागताला हात जोडून उभे होते. राजे, दादू व रामदासजींनी हॉलमध्ये प्रवेश केला, तेव्हा कराडवाले बाबा अगोदरच स्थानापन्न झाल्याचे दिसले. त्यांच्या स्मितहास्याला प्रतिसाद देत दादू बाबांजवळ बसले, लगोलग रामदास यांनीही मखमली सोफ्यावर बुड टेकवले. राजे मात्र उभेच....!
‘कुठायत दादा....?’ राजेंनी दरडावून विचारले. तेव्हा ‘येताहेत, येताहेत’ म्हणत सुनील यांनी त्यांना आदरानं विराजमान केलं.
‘पैसे मोजत बसलेत की काय?’ असा टोमणा लगावत दादूंनी टाळीसाठी हात पुढे केला, मात्र राजेंनी प्रतिसाद दिला नाही. हे पाहून रामदासजी मनातल्या मनात हसले. तेवढ्यात हाती शॅम्पेन घेऊन दादांचं आगमन झालं.
दादा : नमस्कार, नमस्कार.... या ठिकाणी आपण आलात, आम्हाला निश्चितच आनंद झाला...!
राजे : भंपकपणा आहे सगळा... !
दादा : काय झालं राजे?
राजे : संपूर्ण राज्य दुष्काळात होरपळतंय आणि आपण पार्ट्या करतोय...?
‘जाऊ द्या हो’ असं म्हणत दादांनी स्वत:च सर्वांसाठी ग्लास भरले. तेव्हा ‘पाणी जरा कमीच टाका, टंचाई आहे ना...!’ अशी सूचना राजेंनी केली.
व्हेज, नॉजव्हेजचे अनेक प्रकारचे स्नॅक्स सजवलेल्या टेबलावर ठेवले होते. ड्रायफ्रूट्सच्या डिशेस सुनीलराव स्वत: सर्वांना सर्व्ह करत होते. बाबांनी मात्र कशालाच हात लावला नाही.
दादा : नाराज आहात का?
‘नाही हो, आज माझा उपवास आहे,’ केसांची बट मागे सरकवत बाबा म्हणाले. ‘फळांचा रस तरी घ्या,’ असे म्हणत दादांनी त्यांच्यासमोर रेड वाइन ठेवली. त्यांच्या आग्रहाचा मान ठेवत मग बाबांनीही दोन घोट रिचवले.
दादा (बाबांकडे पाहून) : महाराष्ट्राला आज तरुण, तडफदार नेतृत्वाची गरज आहे.
बाबा : हं....!
राजे : म्हणूनच तर मी बोंबलतोय ! एकदा राज्य माझ्या हाती द्या, बघा कसा सुतासारखा सरळ करतो ते...!
दादा : तुम्ही जरा संयम बाळगा हो...! सभेला गर्दी जमते म्हणजे तुम्ही सत्ताधारी व्हाल, हा गैरसमज डोक्यातून काढून टाका आधी.
दादू : पण टगेगिरीलाही जनता विटली आहे. राज्याला परिवर्तनय हवंय परिवर्तन...!
‘हे बघा या विषयावर आपण काथ्याकूट करण्यात काहीच अर्थ नाही. हायकमांड ठरवतील तेच होणार,’ काजूचा तुकडा तोंडात टाकत बाबा पुटपुटले.
रामदासजी : पण मी काय म्हणतोय...?
‘तुम्ही गप्प बसा हो,’ दादा व राजे एकदाच उसळले.
दादू : इतकी वर्षे तुम्ही राज्य केले, आता आम्हालाही एक चान्स द्या ना राव !
दादा : हे बघा, यंदा मी पूर्ण तयारी केली आहे, तेव्हा तुम्ही गुमान राहा. काकांना मी पटवतो. बाबा, तुम्ही फक्त मॅडमची समजूत काढा.
बाबा : पण ते कसं शक्य आहे? आधी अहमदभार्इंना ‘पटले’ पाहिजे ना. आणि युवराजांच्या मनात काय आहे ते कोणी सांगावं...!
‘किती खाताय, तुमची भूक अजून कशी शमली नाही....’ लेगपीस हाती घेतलेल्या दादांकडे पाहून राजे उद्गारले.
‘भरल्या घरात खाणे- पिणे मोजत नसतात, तुम्हीही घ्या...’ चिकन कंटकीची डिश पुढे करत दादांनी त्यांना आग्रह केला.
दादू : या लोकांनी राज्याचं पार वाटोळं केलंय, मराठी माणसाच्या हितासाठी आपण एकत्र यायला हवं, हे कसं पटत नाही तुम्हाला?’
राजे : मला कोणाची गरज नाही. महाराष्ट्राचे भवितव्य घडवण्यासाठी मी एकटा खंबीर आहे.
दादा : (दादूंना उद्देशून) हा गडी जरा बिथरलाय, त्यांचा नाद सोडा आता. आम्ही पण मराठीच आहोत म्हटलं... आम्हालाही आवडेल तुमच्याशी दोस्ती करायला....!
दादू : पण, तुमच्या काकांना ते पटले पाहिजे ना !
दादा : काकांच्या मनात काय असेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. मात्र, नुकतीच त्यांनी मॅडमची जाहीर स्तुती केली आहे. म्हणजे स्वभावानुसार ते आता दुस-या पर्यायाचाही विचार करू शकतील. आम्ही तर स्वबळासाठीच त्यांच्या मागे लागलोय...!
बाबा : उगीच दंड थोपटू नका ! आणि समजा खरंच उद्या ‘घड्याळा’चा टाइम आला तर चाव्या तुमच्याच हाती येतील हे कशावरून? तार्इंचेही नाव पुढे येऊ शकते, हे विसरू नका दादा ...!
दादा : आपल्याला दिल्लीची हवा मानवत असल्याचे ताईसाहेबांनी कित्येकदा सांगितले आहे. हे तुम्हाला आठवत नाही का?
‘त्याही थोरल्या साहेबांच्याच कन्या आहेत. जसे बोलतील तशाच वागतील याची खात्री कोण देणार....?,’ एवढा वेळ काजूचा बकना भरून बसलेल्या रामदासजींनी अचानक तोंड उघडल्याने दादांची तर पुरती उतरली.
तेवढ्यात ‘मोठे साहेब आलेत....’ अशी वर्दी सुनीलरावांनी दिली. त्यावर चपापलेल्या दादांनी सर्वांची माफी मागून जेवणापूर्वीच मैफल आटोपल्याची घोषणा केली व मागील दाराने सर्वांना घेऊन बाहेर पडले. घाईघाईने दादू व दादा एकाच गाडीतून गेल्याने बाबांचे मात्र
‘इंडिकेटर’ लागले होते. (बुरा न मानो होली है)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.