आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गानरमैया - पंडित राजाभाऊ देव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


माझे वडील पं. राजाभाऊ देव (दादा) हे हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील एक थोर गायक, गुरू व सन्माननीय व्यक्तिमत्त्व होते. अतिशय निरागस वृत्ती व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताबद्दल अनिवार ओढ, त्यांनी वयाच्या 91व्या वर्षापर्यंत जपली. पाच वर्षांपूर्वी त्यांनी देह सोडला तोही सकारात्मक व कृतार्थतेची भावना मनात ठेवूनच!
तीर्थरूप दादांविषयी लिहिताना प्रत्येकच वेळी माझ्या डोळ्यासमोर एक विस्तृत चित्रपट तरळतो. त्यांनी मला सातत्याने 35 वर्षांहूनही अधिक काळ दिलेल्या सखोल प्रशिक्षणातून उलगडलेल्या असंख्य रागरूपांचे विश्वदर्शन, राग भावदर्शन व अनेक सौंदर्यतत्त्वांचे अनुशीलन स्पष्टपणे दिसते. यमन, तोडी, मालकंस, भैरव, भूप या संपूर्ण रागांपासून ते नंद, बिहागडा, सौराष्ट्र भैरव, संपूर्ण मालकंस, सावनी नट सारख्या अनवट रागांपर्यंतच्या लांबलचक यादीतील प्रत्येक रागावर त्यांचे प्रभुत्व थक्क करणारे होते. कलाकार म्हणून यशस्वी कारकीर्द त्यांनी 20 वर्षे गाजवली, पण पुढे गुरू म्हणून त्यांनी जी भूमिका पार पाडली ती मला अधिक परिचयाची आहे. कलाकारांत अंगभूत असलेले सर्व उच्चतम गुण त्यांच्या ठायी असल्यामुळे गुरूच्या भूमिकेतूनही त्यांनी ‘रागविस्तार’, त्यांच्या सृजनात्मक पण तरीही परंपरानिष्ठ दृष्टीने व वृत्तीने माझ्यासमोर खुला केला, हे त्यांचे अपूर्व योगदान आहे.
वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी, वडलांच्या प्रखर विरोधामुळे व संगीताच्या अनिवार ओढीमुळे दादांनी घर सोडले व पंढरपूरला श्रेष्ठ गायक पंडित जगन्नाथबुवा पंढरपुरकरांकडे सुमारे चार वर्षे राहून, त्यांच्या घरातील सर्व कामे करून, प्रसंगी अतोनात कष्ट करून जी संगीतविद्या मिळवली ती कितीही चांगली होती तरी आयुष्यभर पुरणारी नव्हती. दादा ग्वाल्हेरला पंडित राजाभैया पूँछवाले या श्रेष्ठ गुरूंकडे पोहोचले. ग्वाल्हेरच्या माधव संगीत विद्यालयात त्या काळी अनेक होतकरू संगीत विद्यार्थी शिकत होते, पण दादांकडे विद्यालयाची फी भरण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे पंडित राजाभैयांनी त्यांना घरीच बोलावून रोज रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत तालीम देण्याचे ठरवले. दादांनीही अनेक वेळा उपाशीपोटी राहूनही संगीतसाधनेत यत्किंचितही कसूर केली नाही. अल्पावधीत ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले.
काही कौटुंबिक जबाबदा-यांच्या ओझ्याखाली दादा सापडले व त्यासाठी त्यांना नोकरी पत्करावी लागली. नागपूर रेडिओवर नोकरी करताना एका वरिष्ठाने त्यांच्या अपूर्ण शालेय शिक्षणावर ताशेरे मारून त्यांचा अपमान केल्यामुळे तडकाफडकी नोकरीचा राजीनामा देऊन या 33 वर्षांच्या ‘विद्यार्थ्याने’ नागपूरच्या एका शाळेत मॅट्रिकच्या वर्गात प्रवेश घेतला व एम. ए. फायनल(इंग्रजी साहित्य)पर्यंत महाविद्यालयीन शिक्षणही यशस्वीरीत्या पूर्ण केले. आयुष्याच्या वळणावर माझ्या आईने, रंजना देव यांनी त्यांना समर्थपणे साथ दिली. अशा बिकट परिस्थितीची झळ त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचू दिली नाही. याच काळात वडलांकडे माझेही गायनाचे शिक्षण सुरू झाले.
उस्ताद रजब अली खाँ (देवास) यांच्याकडून किराणा घराण्याच्या गायकीची तालीम तसेच प्रा. बी. आर. देवधर यांच्याकडून अनेक दुर्मीळ बंदिशी व जयपूर-आग्रा घराण्यांची सौंदर्यतत्त्वे त्यांनी आत्मसात केल्यानेच समग्र गायकीचे बीज त्यांच्यात रुजले. ग्वाल्हेर गायकीने सिद्ध केलेले हमीर, छायानट, गौड मल्हारसारखे राग, तसेच किराणा घराण्याचे आवडते शुद्ध कल्याण, यमन, तोडी, पुरिया धनाश्री, पुरिया, मारवा हे आलापप्रधान राग दादांनी त्यांच्या खास शैलीत शिकवले. पण त्यांचे खरे प्रेम होते ते जयपूर गायकीवर! जयपूर गायकीची वक्रगती, लयप्रधानता व बंदिशींच्या अनोख्या पेशकारीबद्दलची आस्था त्यांना मोहित करत असे. बिहागडा, सावनी, सौराष्ट्र भैरव, ललिता गौरी, नट केदार हे राग दादांनी मला जयपूर घराण्याच्याच आकृतिबंधातून शिकवले. ही प्रदीर्घ तालीम 35 वर्षांहून अधिक काळ चालू होती. जयपूर घराणे बुद्धी व भाव सौंदर्याचे संतुलन राखते, हा त्यांचा ठाम विश्वास होता व ही गायकी गायकाच्या गानसौंदर्याची कसोटी पाहते, असे ते मानत. कणखर व तडजोड न करणा-या दादांच्या मते अस्तित्वासाठी लाचारी पत्करणे म्हणजे स्वत:च्या कर्तृत्वावर अविश्वास दाखवणे आणि ईश्वराशी सरळ संधान बांधणा-या संगीत कलेला जनाभिरुचीच्या नावाखाली किती पाय-या खाली उतरवायचे हे ज्याचे त्याने ठरवावे, असे ते सांगत. त्यामुळेच आज युवा पिढीतील कलाकारांसमोर संगीत व्यवसायातील नीतिमत्तेविषयी जो संभ्रम आहे, तो दादांच्या या विचारांचा मार्मिक विचार केल्यास नक्कीच दूर होईल, असे मला वाटते.