आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ताजा कलम : कार्यकर्त्यांची मुजोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी कोणत्या उद्देशाने सुरू केला होता आणि सध्या त्याला काय स्वरूप आले आहे, हा आता चर्चेचा नव्हे, तर सार्वत्रिक चिंतेचा विषय झाला आहे. महाराष्ट्रातले कोणतेच शहर या चिंतेपासून मुक्त नाही. राजकीय प्रतिष्ठेचे संदर्भ लाभल्यामुळे तर राजकारण्यांसाठी हा उत्सव शक्तिप्रदर्शनाचेही एक माध्यम झाले आहे. धनाची आणि जनांचीही शक्ती आपल्याकडे आहे हे दाखवण्यासाठी राजकारणी जसा या उत्सवाचा वापर करू लागले आहेत तशीच आपल्या मनगटातील शक्ती दाखवण्यासाठीही ते हा उत्सव वापरू लागले आहेत. त्या विरुद्ध कोणी शब्दही काढला की धार्मिक भावनांचे हत्यार उपसायला ते सज्जच असतात. कायदे हे पाळण्यासाठी आणि विशेषत: त्यांच्यासाठी नाहीतच, असा भ्रम निर्माण करण्याची संधी ते अशा उत्सवांच्या निमित्ताने साधत राहतात. त्यात राजकारण्यांबरोबर तथाकथित ‘सामाजिक कार्य’कर्तेही आघाडीवर असतात.

अशाच काही कथित सामाजिक कार्यकर्त्यांना आणि सार्वजनिक उत्सवांतून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणार्‍यांना औरंगाबादचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी चाप लावण्याचा प्रयत्न साेमवारी शांतता समितीच्या बैठकीत केला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कथित सामाजिक कार्यकर्ते उपस्थित असलेल्या या बैठकीत काहींनी नियम न पाळण्याची भाषा केली. त्यांनी परवानगी नाही िदली तरी मंडप उभारा, असा सल्ला देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ही सामाजिक मुजोरी पोलिस आयुक्तांनी खपवून घेतली नाही, हे बरे झाले. खरे तर लोकप्रतिनिधींनीच ही जबाबदारी घ्यायला हवी होती आणि अशी भाषा करणार्‍यांना चाप लावायला हवा होता; पण लोकानुनयाच्या आहारी गेेलेल्या राजकारण्यांकडून अशी अपेक्षा करणेही आता गैरलागू ठरायला लागले आहे. हा लोकानुनय बरेचदा अधिकारीही करतात. औरंगाबादच्या आयुक्तांनी ते केले नाही, यासाठी त्यांना सामान्य नागरिक धन्यवादच देतील.