आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gauri Kanitkar Article About Marathi Bhasha Din, Divya Marathi

इंटरनेट: साहित्याची लोकशाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेट हे एक सर्वसमावेशक माध्यम आहे. छापील माध्यमाप्रमाणे इथे मजकूर प्रसिद्ध करण्यासाठी खर्च येत नाही, शब्दांचे बंधन नाही, प्रकाशक, संपादक, वितरक अशा चाळण्या नाहीत. ना विषयांचं बंधन, ना फॉर्म निवडण्याचे. कोणत्या थरातल्या, कोणत्या वयोगटातल्या व्यक्तींनी लिहावं, याचेही काही निकष-नियम नाहीत.

प्रत्येक संपादक, प्रकाशकाची एक भूमिका असते. साहित्याची त्यांची एक व्याख्या, मत असतं. बाजारात काय चालेल, याचाही विचार असतो. त्यानंतरच लेखकाचं म्हणणं वाचकांपर्यंत पोहचतं. काही उत्साही लेखक स्वत:च्या पैशाने पुस्तक छापण्याचा, वितरित करण्याचा उद्योग करतात. पण, शेवटी त्यासाठी खर्च आलाच. परंतु, तंत्रज्ञानाच्या जोरावर इंटरनेटने हे सगळे अडथळे दूर केले. इंटरनेटवर लिहिणारी व्यक्ती लेखकच असण्याची गरज आता उरली नाही. एका अर्थाने हे साहित्याचं लोकशाहीकरणच होत आहे, असं म्हणावं लागेल.

इंटरनेटवर काहींनी फक्त स्वत:चं मन मोकळं करण्यासाठी लिहिलं आहे, तर ललित, राजकीय, सामाजिक, भटकंती, पाककृती या माध्यमातूनही अनेकांनी लिखाण केलं आहे. या माध्यमाने लेखक आणि वाचक दोघांनाही चाकोरी मोडण्याची संधी दिली आहे. मोकळीक दिली आहे. विषयांचे, विचारांचे, मतांचे अनेक धुमारे वेगवेगळ्या ब्लॉग्ज आणि वेबसाइट्सवर फुटत आहेत. त्यामुळे अनुभवांचं केवढं तरी वैविध्य आपल्यासमोर खुलं झालं आहे, होत आहे. ते खरोखरच थक्क करणारं आहे. या भारंभार लिखाणाच्या धबधब्यात उथळ मजकूरच जास्त आहे, असा आरोप अनेकदा होतो. पण, तसं ते छापील माध्यमातही असतंच. इंटरनेटवर छापलं जाण्यापूर्वी त्या लिखाणावर काम होत नसल्याने ते प्रमाण इथे थोडं जास्त असेल एवढंच. पण, माध्यम कोणतंही असलं तरी त्यात चांगलं वाईट असणारच. परंतु, या नव्या माध्यमाने साहित्यातले सगळे भेदाभेद मोडून काढत त्याचं लोकशाहीकरण केलं, हे त्याचं सर्वात मोठं योगदान.

अर्थात या सगळ्याचा अर्थ आता यापुढे फक्त इंटरनेट हेच साहित्य लिखाणाचं आणि वाचनाचं माध्यम आहे आणि छापील पुस्तकांचे दिवस आता संपले, असं म्हणणंही दुसरं टोक गाठण्यासारखं होईल. आपल्याला आवडलेलं एखादं पुस्तक आपण जपून ठेवतो आणि वाटेल तेव्हा काढून ते वाचू शकतो, तसं इंटरनेटच्या मजकुराबाबत करता येत नाही, किंवा तसं करण्याची सवय अजून आपल्याला लागलेली नाही.
त्यामुळेच छापील माध्यमाचं महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे, असं वाटत नाही. उलट ही दोन्ही माध्यमं एकमेकांना पूरक आहेत. इंटरनेटवर सध्या प्रकाशित होणार्‍या मजकुरातलं काही उद्या छापील साहित्यात समाविष्ट होईल. काही नवे लेखक यातून घडतील. त्यातले किती अभिजात आणि किती उथळ हे नंतर ठरेल; पण एक नक्की, इंटरनेटवर लिखाणासाठी मिळालेल्या खुल्या अवकाशामुळे छापील माध्यमही समृद्ध होत जाईल. ‘युनिक फीचर्स’तर्फे होत असलेले इ-साहित्य संमेलन ते याच उद्देशाने. मैदानी साहित्य संमेलन हा एक उत्सव असतो. अशा संमेलनात गंभीर चर्चांना मर्यादा पडतात. त्या चर्चा छोट्या संमेलनांमध्येच घडू शकतात.

इंटरनेटवरचं लिखाण वरवरचं असतं, असा आरोप करून थांबण्यापेक्षा इंटरनेटवरच लिहू-वाचू लागलेल्या नव्या पिढीला मराठीतल्या चांगल्या साहित्याची ओळखही करून देण्यासाठी आपण प्रयत्न करावा.इंटरनेट आणि छापील अशा दोन्ही माध्यमांतील तरुण लिहित्या पिढीची दखल घेतली आणि इंटरनेटवरचं लिखाण छापील साहित्यात मोलाची भर टाकेल, असा विश्वास या संमेलनाध्यक्षांनी त्या-त्या वेळी व्यक्त केला. इंटरनेटवर मराठीत बरंच लिहिलं, वाचलं जात असलं तरी मराठी साहित्यातील जुन्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांबद्दल मात्र इथे काहीच माहिती उपलब्ध नाही, हे लक्षात आल्याने गेल्या वर्षी आम्ही दहा साहित्यिकांची माहिती मराठी आणि इंग्रजीत दस्तावेज स्वरूपात नोंदवण्याचा प्रयोग केला.

त्यालाही अनेक तरुण मंडळींनी भरभरून प्रतिसाद दिला. ही सगळीच उदाहरणं बोलकी आहेत. आमचं इ-संमेलन हा एक प्रयोग झाला. असे अनेक प्रयोग सध्या घडताहेत. अनेक मंडळी दरवर्षी इंटरनेटवरच दिवाळी अंक काढताहेत. या माध्यमातील मजकुरांची पुस्तकं होताहेत. या प्रयत्नांमधूनच हे माध्यम म्हणून कसं वापरायचं याचे प्रयोग सुरू आहेत. त्यातून आधी म्हटल्याप्रमाणे छापील माध्यमात तर मोलाची भर पडेलच, पण साहित्य लिखाणाचं एक माध्यम म्हणून इंटरनेटही अधिक प्रगल्भ होत जाईल, अशी आशा करायला हरकत नाही.

गौरी कानेटकर, पुणे
सहसंपादक,
युनिक फीचर्स, पुणे
संपर्क- ९६५७७०८३१०