आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जेनेटिकली मॉडिफाइड’ दुधाचा भस्मासुर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विज्ञानाला वेठीस धरून नैसर्गिक प्रक्रियांमध्ये ढवळाढवळ करण्याच्या उठाठेवीचे दुष्परिणाम किती भयंकर असू शकतात याची उदाहरणे वेळोवेळी उघड होत असतात. दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी अमेरिकेत होत असलेले वैज्ञानिक उद्योग कोणत्या थराला पोहोचले आहेत हे समजले की, जिवाचा थरकाप उडतो. गायी-म्हशींचे दूध मानवी अर्भकांपासून थेट वृद्धजनांसाठी उपयुक्त समजले जाते. दुधापासून बनवलेले दही, लोणी, ताक, लस्सी, तूप, बासुंदी, श्रीखंड, खवा, पनीर, चीज, आइस्क्रीम इत्यादी पदार्थ जगभर विपुल प्रमाणात आहारामध्ये समाविष्ट केलेले असतात. इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे गायी-म्हशींचेही दूध हे त्यांच्या नवजात अर्भकांच्या पोषणाकरताच त्यांच्या शरीरात नैसर्गिकरीत्या निर्माण होत असते. पाडसांची गरज भागल्यानंतरचे गायी-म्हशींचे अतिरिक्त दूध मानवी गरजेकरिता वापरण्याची प्रथा आहे. पण अमेरिकेतील दुग्धोत्पादन हा लघुउद्योगाऐवजी महत्तम व्यापारी उद्योग आहे.


त्यामुळे तिथे मोठ्या धंद्याची समीकरणे लागू होतात. महत्त्वाचे औद्योगिक तत्त्व म्हणजे किमान खर्चात, किमान साधनसामग्रीत आणि किमान वेळेत कमाल उत्पादन करणे आणि त्यायोगे नफा वृद्धिंगत करणे. अमेरिकेतील प्रचंड विस्ताराच्या गोशाळांमध्ये हीच तत्त्वप्रणाली निर्घृणपणे राबवली जाते. गाय हा एक सजीव सस्तन प्राणी नसून ते दुग्धोत्पादन कारखान्यातील एक यंत्र आहे आणि त्या यंत्राकडून येनकेनप्रकारेन जास्तीत जास्त उत्पादन मिळवायलाच पाहिजे, हा तिथला मंत्र आहे.


ताजे किंवा वाळलेले गवत आणि इतर वनस्पतीजन्य पदार्थ हाच गायीचा नैसर्गिक खुराक आहे. पण अमेरिकन गोशाळांनी गायीला मांसाहारी बनवले आणि तिचे दूध सर्रास विकायला काढले. खूप अधिक दूध यावे याकरिता अमेरिकेतील गोशाळांमध्ये गायींना नक्की कोणता आहार दिला जातो, हे समजल्यावर शिसारी आल्याशिवाय राहणार नाही. डुकरांचे मांस, शेजारच्या कुक्कुटपालन केंद्रातील जमिनीवर सांडलेली कोंबड्यांची विष्ठा आणि पिसे, मासे, कत्तलखान्यात मारलेल्या गाय-बैल-वासरे यांचे निरुपयोगी अवयव आणि रक्त हे साहित्य वापरून गायींचा खुराक बनवला जातो. जन्मजात शाकाहारी असणा-या गायींच्या गळी तो जबरदस्तीने उतरवला जातो. शिवाय कित्येक अमेरिकन गायींच्या शरीरात यीस्ट आणि चरबीसोबत सोडियम बायकार्बोनेट, सेलेनियम, मॅग्नेशियम ऑक्साइड, झिंक मिथिओनाइन, निअ‍ॅसिन, अ‍ॅनिओनिक क्षार इत्यादी रसायने घुसवली जातात. या सर्व अनैसर्गिक प्रयत्नांना भरघोस यश मिळते आणि नैसर्गिकरीत्या दररोज सरासरी आठ लिटर दूध देणारी गाय सत्तावीस लिटरपर्यंत दूध देऊ शकते. कहर म्हणजे, वराहपालन केंद्रांमधील डुकरांना गोमांसापासून बनवलेले खाद्य पुरवले जाते. ते प्राणी मुळातच मांसाहारी असल्यामुळे फारसे बिघडत नाही, असे सकृतदर्शनी वाटले तरी गायींच्या पोटात डुकराचे मांस जात असल्यामुळे आणि डुकरांच्या पोटात गायीचे मांस जात असल्यामुळे शेवटी गायींच्या शरीरात गोमांस जाते आणि वर्तुळ पूर्ण होते. हे दुष्टचक्र अत्यंत गंभीर आहे. कारण माणसाने नरमांसभक्षक व्हावे, तशा गायी गोमांसभक्षक बनतात. त्यामुळे त्यांना ‘मॅड काऊ’ यासारख्या विचित्र आणि प्राणघातक आजारांची लागण होते. अनैसर्गिक आहारासोबतच या गायींना दुग्धवृद्धीकरिता एका प्रसिद्ध आणि वजनदार अमेरिकन कंपनीने उत्पादित केलेल्या आरबीजीएच (रिकाँबिनंट बोव्हाइन ग्रोथ हॉर्मोन) या रसायनाची इंजेक्शने दिली जातात. या इंजेक्शनला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) 1994 मध्ये मान्यता दिली. पण या रसायनाच्या प्रभावाखाली निर्माण झालेले दूध प्राशन केल्यानंतर कर्करोग उद्भवण्याचा धोका बळावतो, असे पुरावे मिळाल्यावर संयुक्त राष्‍ट्रांच्या अन्नसुरक्षा विभागाने अशा जेनेटिकली मॉडिफाइड दुधावर बंदी घातली.

आपल्या नागरिकांच्या आरोग्याविषयी दक्ष असणा-या युरोपियन कमिशननेही स्वतंत्रपणे तपासणी करून या निष्कर्षांना पुष्टी दिली. पण अमेरिकन एफडीएच्या मते हे निष्कर्ष चुकीचे आहेत. ज्या ठिकाणी गायींना आरबीजीएची इंजेक्शने दिली जातात तिथल्या दुधावर तशी सूचना छापावी, ही सूचना अमेरिकन सरकारने फेटाळून लावली. जे अशी इंजेक्शने देत नाहीत त्यांनी मग आपल्या उत्पादनांवर ‘आरबीजीएच-फ्री’ असे लेबल लावायला सुरुवात केली. परंतु त्याला हे इंजेक्शन बनवणा-या कंपनीने आक्षेप घेतला.


अमेरिकन सरकारने आणि संबंधित कंपन्यांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवरच्या लेबलांविषयी अशी दंडेली केल्यानंतर सकस दूध तयार करणा-या उत्पादकांनी कटाक्षाने त्यांच्या गोशाळांमधल्या गायींना केवळ नैसर्गिक खुराकच देण्याचा आणि आरबीजीएचसारखी इंजेक्शने न देण्याचा वसा घेतला. असे दूध बाजारात ‘ऑरगॅनिक मिल्क’ हे लेबल लावून विक्रीस आणले. साहजिकच त्याची किंमत अधिक आहे. सधन अमेरिकन ग्राहकांना नेहमीच्या दुप्पट दराने ते विकत घेणे सुरक्षित वाटते. पण ते दर ज्या लोकांना परवडत नाहीत किंवा जे लोक नियमितपणे घराबाहेर जेवणखाण करतात ते हृदयविकार, मधुमेह, कर्करोग अशा गंभीर विकारांना नाहक बळी पडण्याचा धोका कित्येक पटीने वाढला आहे. अर्थातच अमेरिकन सरकारला ते मान्यच नाही. कारण सरकारमान्य संशोधनानुसार आरबीजीएच इंजेक्शने दिल्यामुळे कोणतेही विपरीत परिणाम घडतच नाहीत. पाणी आणि युरियामिश्रित भेसळीचे दूध अगतिकपणे विकत घेणा-या भारतीय जनतेच्या नजरेस ही बाब आणून देण्यामागचा हेतू हा, की अमेरिकेतील दुग्धोत्पादन तंत्र जसेच्या तसे भारतात आले तर त्यामुळे आरोग्याची कितीतरी अधिक आणि महाभयंकर हानी होऊ शकते, ही जाणीव व्हावी. प्रगत देशांमधील औद्योगिक उत्पादनांच्या तांत्रिक प्रक्रिया जागतिकीकरणानंतर भारतामध्ये सर्रास येऊ लागल्या आहेत. तेव्हा किमान अन्नपदार्थांच्या बाबतीत तरी सर्व संबंधितांनी जागरूक राहून नीरक्षीरविवेकबुद्धीनुसार त्या नवीन उत्पादन प्रक्रियांचे गुण-दोष स्वतंत्र तज्ज्ञांमार्फत पडताळून पाहायलाच हवेत.


(लेखक आयएमसीच्या अन्न उत्पादनविषयक तज्ज्ञ समितीचे सहअध्यक्ष आहेत.)