आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ground Report Of Pratapsinha School By Balaji Suryawanshi

बाबासाहेबांच्या शाळाप्रवेशाने उजळून निघाली प्रतापसिंह शाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या विद्यार्थ्याने शाळेत ज्ञानार्जन करून जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवल्याने शाळेला किती प्रतिष्ठा मिळते..? याचे देशातील उत्तम उदाहरण म्हणून साताऱ्यातील प्रतापसिंह महाराज हायस्कूलकडे पाहिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी येथेच इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला. पुढे ज्ञानसूर्य झालेल्या बाबासाहेबांनी येथूनच आपल्या शिक्षणाला सुरुवात केली. ही विलक्षण सुखावणारी गोष्ट असल्याची भावना येथील मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि विश्वस्तांनी व्यक्त केली आहे.

पत्नी भीमाबाईंच्या निधनामुळे आणि आपल्या नोकरीमुळे मुलाच्या शिक्षणाची हेळसांड होऊ नये म्हणून सुभेदार रामजी सकपाळ यांनी बाबासाहेबांना बहिणीकडे ठेवले होते. बाबासाहेबांची आत्या सातारा येथे होती, त्यामुळे भवानी पेठेतील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेबांना इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्यात आला. मोफत शिक्षण देणारी ही शाळा प्रतापसिंह भोसले महाराजांनी सुरू केली होती. लष्करातील कर्मचाऱ्यांची मुले आणि राजवाड्यातील स्वत:च्या मुलांसाठी उघडलेल्या या शाळेत बाबासाहेबांनी इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेतल्याचे सर्वज्ञात आहे. चौथीला असताना बाबासाहेब ज्या वर्गात आणि ज्या ठिकाणी बसायचे तो वर्ग आणि ती जागा संस्थेने सुरक्षित करून ठेवली आहे. त्या ठिकाणी कुणालाही जाण्याची परवानगी नाही. चौथीनंतर शाळा सोडली, शाळेचा दाखला घेताना भीमराव आंबेडकरांनी स्वाक्षरी केलेले रजिस्टरदेखील शालेय व्यवस्थापनाच्या अभिलेखाची उंची वाढवणारे आहे. त्यामुळेच येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला भीमराव म्हणून केलेली स्वाक्षरी आवर्जून दाखवली जाते. १८८० मध्ये सुरू झालेल्या या शाळेत ज्या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आणि देशासाठी मोठे कार्य केले, अशा माजी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दालन आहे. तैलचित्रे लावून या दालनात त्यांची माहिती दिली आहे. बाबासाहेबांचे कार्य महान असून त्यांच्यामुळे आमच्या शाळेचे नाव जगात झाल्याची भावना शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापिका शबनम गुलाब मुजावर यांनी व्यक्त केली आहे.