आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नमंडपातून पतीसोबत 13 किलोमीटर पायी जाणार्‍या आनंदीबेन पटेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्म : 21 नोव्हेंबर 1941
शिक्षण : एमएससी, बीएड, एमएड (गोल्ड मेडलिस्ट)
कुटुंब : जेठाभाई पटेल (वडील शेतकरी होते.) पती : मफतभाई, एक मुलगा- संजय, मुलगी : अनार
का चर्चेत: गुरुवारी गुजरातच्या मुख्यमंत्री बनल्या. या पदावरील पहिल्या महिला.

महिला सक्षमीकरणात भरीव योगदान देणार्‍या गुजरात राज्याला आनंदीबेन पटेल यांच्या रूपाने पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या. राजकारणात सक्रिय राहण्यासाठी 24 वर्षांपासून त्या आपल्या कुटुंबापासून दूर, गांधीनगरमध्ये राहत आहेत. वेळ मिळाल्यावर अहमदाबादमधील मुलगा संजय पटेल याच्या घरी पती मफतभार्इंना भेटण्यासाठी जातात. 77 वर्षीय मफतभाई हिंदी विषयाचे प्रोफेसर आहेत. मफतभाई म्हणतात, ‘आनंदीचा शपथविधी गुरुवारी होईल, असे मला वाटत होते. या वेळी मला तिच्यासोबत राहायचे होते, त्यामुळे मी माझी मॉरिशसची फ्लाइट रद्द केली. पुढच्या विमानाने तेथे जाता येईल, असा विचार केला. कारण त्या क्षणी मी तेथे उपस्थित राहणे आवश्यक होते.’ मेहसाना येथील हे लेउवा पटेल आहेत. मफतभाई आणि आनंदीबेन यांच्या लग्नाची निराळीच कथा आहे. लेउवा पटेल समाजात लग्नाचे भव्य आयोजन असते. मात्र, मफतभार्इंनी या प्रथेला विरोध करण्याचे ठरवले आणि लग्नासाठी फक्त 100 रुपये काढले. ते सांगतात, ‘मी लग्नाच्या दिवशी जुनी चप्पल, साधे कपडे घातले होते आणि मंडपापर्यंत पोहोचण्यासाठी 13 किमी पायी गेलो. चालताना थकवा आल्यावर बैलगाडीत बसलो. पण लग्नमंडपात 18 तोळे सोन्याने मढवलेली आनंदी पाहिल्यावर माझा रागाचा पारा चढला. मी तिला तत्काळ सर्व दागिने काढण्यास सांगितले. तिने शांतपणे दागिने काढून ठेवले आणि नंतर आम्ही लग्न केले. माझ्या या कृत्यावर नाराज होऊन सगळे नातेवाईक बैलगाडीत बसून निघून गेले. मी कुणालाही थांबवले नाही आणि माझ्या पत्नीला घेऊन 13 किमी पायी चालत घरी पोहोचलो. आनंदीने मला पाठिंबा देत आनंदाने ते अंतर पार केले.’

बीएस्सी झाल्यानंतर आनंदी यांनी अहमदाबादेतील गर्ल्स स्कूलमध्ये प्राचार्यपद भूषवले. मफतभाई सांगतात, त्या काळी त्यांच्या घरी केशुभाई पटेल, शंकरसिंह वाघेला आणि नरेंद्र मोदी येत असत. आनंदी सर्वांसाठी स्वयंपाक करत असत. त्याच काळात आनंदी यांनी नर्मदेत पडलेल्या दोन शाळकरी मुलींचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या प्राणांची बाजी लावली होती. त्यासाठी त्यांना राष्ट्रपतींकडून शौर्य पुरस्कारही मिळाला होता. एक दिवस केशुभाई म्हणाले की, भाजपला सुशिक्षित, निडर महिला सदस्याची गरज आहे. मफतभार्इंनी आनंदी यांना भाजपत प्रवेश करण्यास सांगितले. आधी त्यांनी राजकारणात येण्यास नकार दिला, मात्र राजकारणात आल्यावर समाजसेवा करण्याची संधी मिळेल, या आशेने त्या गुजरात महिला सदस्यांच्या अध्यक्ष बनल्या. 1976 मध्ये त्यांनी जनसंघात प्रवेश केला. 1981 मध्ये भाजपच्या पहिल्या निर्वाचित जिल्हा परिषद सदस्य बनल्या. 1992 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या एकता यात्रेत तिरंगा फडकवणार्‍या त्या पहिल्या महिला नेत्या होत्या. 1994 मध्ये खासदार आणि 1998 मध्ये विधानसभा निवडणुकांनंतर गुजरातच्या शिक्षणमंत्री बनल्या.

निवडणुकीपूर्वी मफतभाईनी आम आदमी पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. मुलगी अनारने त्यांना असे करण्यापासून रोखलेही होते. अनारबेन या मानव साधना, ग्रामश्री आणि क्राफ्टररुट्स या एनजीओतर्फे काम करत आहेत. संजय पटेल यांची अहमदाबादमध्ये प्रिंटिंग प्रेस आहे.