आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समतामूलक विकास: अर्थशास्त्राचे प्रयाेजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाजातील उपेक्षितांच्या विकासासाठी शास्त्रशुद्ध नियाेजन अाणि धाेरणात्मक बदलाची गरज अाहे.  प्रत्येक डाेळ्यातून प्रत्येक अश्रू मिटवण्याचे म. गांधीजींचे स्वप्न साकारण्यासाठी अर्थशास्त्र परिषदेचा पुढाकार महत्त्वाचा ठरताे. उद्या फैजपूर येथे (जळगाव) हाेत असलेल्या अर्थशास्त्र परिषदेनिमित्त हा लेख. 

विद्यापीठीय शिक्षणाच्या विस्तारानंतर विविध विद्याशाखांच्या परिषदा अायाेजित करण्यासाठी स्थायी स्वरूपाच्या अाैपचारिक संघटना विधिवत स्थापन केल्या जाऊ लागल्या. उदाहरणार्थ, इंडियन सायन्स काँग्रेस स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत अाहे. त्याचप्रमाणे इंडियन इकाॅनाॅमिक असाेसिएशन अाणि कालाैघात समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान व अन्य विषयांच्याही व्यावसायिक परिषदांची स्थापना, वार्षिक अधिवेशने, संमेलने, परिसंवाद हाेऊ लागले. एका अर्थी या परिषदा संबंधित ज्ञान शाखांशी निगडित असून व्यावसायिकांचे शुद्ध अगर निखालस ज्ञान, शास्त्रीय अध्यापन, संशाेधन पद्धतीविषयक प्रश्नांची तर्कशुद्ध चर्चा, विवाद हे मुख्य प्रयाेजन असते. अर्थातच स्थल-कालमानानुसार याचे स्वरूप उत्तराेत्तर अधिक उत्सवी, सवंग हाेत अाहे. दरबारी सत्ताकारण अाणि अर्थकारणाशीदेखील याची सांगड असते हे वेगळे सांगायला का हवे? 

स्वातंत्र्याेत्तर काळात महाराष्ट्रासह अनेक राज्यांत महाविद्यालयीन, विद्यापीठीय शिक्षणाचा झपाट्याने विस्तार झाला. बहुजन व अाजवर उपेक्षित सर्व जनसमूहांतील माेठा थर पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन शिक्षक, प्राध्यापक झाला. जवळपास सर्वच विद्याशाखांमध्ये हा वर्ग विस्तारला. महाराष्ट्राची अार्थिक पाहणी २०१६-१७ मधील उच्च शिक्षण सांख्यिकीनुसार राज्यात ११ विद्यापीठे, २० अभिमत विद्यापीठे, एक केंद्रीय विद्यापीठ अाणि चार खासगी विद्यापीठे अाहेत. त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांची संख्या २,५०१ असून एकूण ४० लाख पटसंख्या अाहे. या ४० लाख विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्या १ लाख ६६ हजार इतकी अाहे. म्हणजे सर्व संस्था मिळून सरासरी विद्यार्थी- शिक्षक प्रमाण २४ असे अाहे. दरवर्षी महाराष्ट्र सरकारचा सर्वाधिक खर्च जवळपास ५० हजार काेटी रुपये शिक्षणावर हाेताे. कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, शिक्षणशास्त्र या विषयातील सर्वसाधारण पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची संख्या १५ शासकीय, १११२ शासन अनुदानित, ११२२ विना अनुदानित अशी एकूण २२४९ इतकी अाहे. यातील एकूण विद्यार्थी संख्या साडेअकरा लाख अाहे. त्यापैकी ४ लाख १२ हजार कला शाखेत, ३ लाख ७२ हजार वाणिज्य शाखेत शिक्षण घेतात. त्याखेरीज विधी शाखेतील ३० हजार व शिक्षणशास्त्राच्या २६ हजार विद्यार्थ्यांना म्हणजे उण्यापुऱ्या साडेअाठ लाख विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र व अन्य सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करावा लागताे. त्यांना शिकवणारे सुमारे २० हजार प्राध्यापक ही एक माेठी संख्या अाहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात किमान १-२ ते ५-१० महाविद्यालये अाहेत. अर्थशास्त्रासह सामाजिक शास्त्रे व वाणिज्य विषयातील या शिक्षक-प्राध्यापक मंडळींना तालुका-जिल्ह्याच्या परिसर विकासाचे अध्ययन-संशाेधन सहज करता येईल. 

महाराष्ट्रात शेती व शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा अाहे. गेल्या दाेन दशकांत अापल्या राज्यातील ७० हजारपेक्षाही अधिक कास्तकारांवर अात्महत्या करण्याची वेळ अाली. विदर्भ, मराठवाडा, खान्देशातील प्रत्येक तालुक्यात या दु:खद घटना घडल्या, अजूनही त्या सुरूच अाहेत. खरे तर शेती अाणि शेतकऱ्यांच्या समस्यांची साेडवणूक करण्यासाठी डाॅ. धनंजयराव गाडगीळ यांनी १९५२ मध्ये ‘महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळ’ स्थापून कामाला सुरुवात केली हाेती. महाराष्ट्रातील तत्कालीन समाजधुरीण, लाेकनेते व अभियंते त्यात सामील झाले हाेते. त्यांनी अनेक उपाययाेजना सुचवल्या हाेत्या. प्रा. वि. म. दांडेकर यांनी मंडळाची धुरा सांभाळली. १९७२ च्या दुष्काळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर गणपतराव देशमुख व अाता गेली १५ वर्षे एन. डी. पाटील मंडळाचे अध्यक्ष असून दुष्काळ निर्मूलन व शेतकऱ्यांच्या अन्य समस्या साेडवण्यासाठी मंडळ प्रयत्न करत अाहे. डाॅ. सुलभा ब्रह्मे यांचे यासंदर्भातील याेगदान माैलिक असे अाहे. 

मराठी अर्थशास्त्र परिषदेने याकामी पुढाकार घेऊन तालुका पातळीपर्यंत कृतिगट कार्यान्वित करावेत. अाजही महाराष्ट्रातील ६ काेटी ग्रामीण लाेक शेतीवर अवलंबून असून दारिद्य्र-दुष्काळ-कुपाेेषण निर्मूलन करून व शेतमालाला उचित दर मिळवून देऊनच या माेठ्या कष्टकरी जनसमूहाची कर्जमुक्ती, शाेषणमुक्ती हाेऊ शकते. त्याकरिता महाराष्ट्रातील या जीवन-मरणाच्या प्रश्नाच्या साेडवणुकीसाठी शास्त्रशुद्ध उपक्रम राबवण्याचे नियाेजन अाणि धाेरणात्मक बदल घडवून अाणण्यासाठी अापण अापले बळ-बुद्धी कारणी लावण्याचा संकल्प करूया. 

मराठी अर्थशास्त्र परिषदेचे यंदाचे अधिवेशन ज्या फैजपुरात हाेत अाहे त्यास माेठी एेतिहासिक पार्श्वभूमी अाहे. प्रत्येक डाेळ्यातून प्रत्येक अश्रू मिटवण्याच्या गांधीजींच्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी अापण अापल्या मर्यादित काेशातून बाहेर पडून साक्षेपी अभ्यास, सखाेल संशाेधन अाणि प्रत्यक्ष कृती कार्यक्रमाद्वारे अर्थशास्त्राला उपेक्षित-शाेषितांच्या मुक्तीचे माध्यम बनवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे हेच मुळात अर्थशास्त्राचे मूळ व मुख्य प्रयाेजन अाहे. तात्पर्य, समतामूलक शाश्वत विकासासाठी सामाजिक-पर्यावरणीय दिशा, दृष्टी असलेल्या पर्यायी अर्थ सिद्धांताकडे अागेकूच करणे हे अापल्यासमाेरील अाव्हान अाहे. 

- प्रा. एच. एम. देसरडा (लेखक राज्य नियाेजन मंडळाचे माजी सदस्य अाहेत.) 
बातम्या आणखी आहेत...