आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Organisations Against Lovers On Kiss Of Love Agitation

KISS OF LOVE: आंदोलन की दोन विचारप्रवाहांचा लढा (दिव्य मराठी ब्लॉग)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'किस ऑफ लव्ह' ही संकल्पना भारतात तशी नवीनच. पण गेल्या काही दिवसात घराघरात किस ऑफ लव्ह या आंदोलनाचा बोलबाला आहे. आई-वडीलांच्या मते हा सगळा प्रकार म्हणजे निव्वळ फाल्तूपणा तर मुलांच्या मते हा एक गहण विषय आहे ज्यावर चर्चा झाली पाहिजे. याची पार्श्वभूमी अशी की, केरळातील कोची येथे काही प्रेमी युगूलांना सार्वजनिकरित्या प्रेम व्यक्त केल्याबद्दल विरोध झाला. अर्थातच प्रामुख्याने हा विरोध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता युवा मोर्चासारख्या संघटनांकडून झाला. या घटनेची बातमी टीव्हीवर आल्यानंतर राज्यात असंतोष निर्माण झाला आणि काही तरूणांनी मिळून या नैतिक धोरणांविरूद्ध आवाज उठवला. त्यानंतर कोलकता आणि दिल्लीसारख्या शहरांतूनदेखील या घटनांना विरोध दर्शवण्यासाठी मोर्चे काढण्यात आले. या सगळ्यात सोशल मिडीयाचादेखील पुरेपुर फायदा झाला. फेसबूक पेज तयार करून अनेक लोकांना त्यात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आला. हा लढा अतिशय शांततेच्या मार्गाने पार पाडण्याचा हेतू काही प्रमाणात असफल झाला कारण घटनास्थळी ऐनवेळी अस्थिर वातावरण निर्माण झाले.

किस ऑफ लव्ह आंदोलन ही काही तात्पुरती तयार झालेली चळवळ नाही. याची मुळे आणखी खोलवर रूजलेली आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीत प्रेम ही व्यक्तीगत गोष्ट समजली जाते. ती अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी किस करून व्यक्त करण्याची पद्धत नाही. त्यांचा विरोध प्रेमाला नाही तर तो अयोग्य प्रकारे व्यक्त करण्याला आहे. ज्या संघटनांच्या नैतिक धोरणाविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे त्यांनी भारतीय दंड विधान 294 च्या अंतर्गत PDA(पब्लिक डिसप्ले ऑफ अफेक्शन) ला विरोध केला आहे. या कलमानुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे किंवा शिवीगाळ करण्यास बंदी आहे. परंतू आंदोलकांच्या मते एकमेकांना किस करणे म्हणजे अश्लीलता नव्हे तर केवळ आपले प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग आहे; मग हे प्रेम आई व मुलांचे असो किंवा स्त्री-पुरूषाचे. एवढेच नाही तर वेदांमध्येदेखील या गोष्टीला मान्यता आहे असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच या सनातनी संघटनाचे नैतिक धोरण स्वीकारले सहन केले जाणार नाही असाही पवित्रा या आंदोलकांनी घेतला आहे.

अजून एक गोष्ट जी लक्षात येते ती म्हणजे देशात ज्या ठिकाणी हे आंदोलन तीव्र झाले तिथे पुरोगामी विचारसरणीचा बरोबरीने प्रभाव आहे. मग केरळ आणि बंगालमध्ये कम्युनिस्ट पार्टीचा राजकारणात सहभाग आहे तर दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारख्या शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून पुरोगामी विचारसरणी सक्रिय आहे. त्यामुळे मुळातच हा एका आंदोलनापुरता मर्यदित नसून तो दोन विचारसरणीमधील वाद आहे. कोणतीही संस्कृती ही प्रवाहासारखी असते, काळानुसार त्यात बदल होत असतात. हिंदू संस्कृतीदेखील याला अपवाद नाही. अनेक वाईट प्रथांना वेळोवेळी विरोध झाला. कदाचित इतर धर्माप्रमाणे त्या वेगाने ती मान्यता मिळाली नसेल पण शेवटी बदल झाला आणि समाजाने नवीन विचारांना मान्यता दिली. सर्वसामान्य लोकांमधील संस्कृती समर्थकांच्या मते जर सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी होण्यास सुरूवात झाली तर त्यांच्या मुलांवर त्याचा वाईट परिणाम होईल आणि लहान वयात अर्धवट माहिती मिळून ते चुकीच्या मार्गाकडे वळतील. परंतू दुसरीकडे टीव्ही, सिनेमा आणि इंटरनेटच्या माध्यमातूनदेखील या गोष्टी सर्रास मुलांपर्यत पोचतात तर मग फक्त किसला विरोध का असाही विचार पुढे येतो. दुसरीकडे ही तरूण मंडळी समाजातील गरीबी, कुपोषण, स्त्री-भ्रूणहत्या, ऑनर किलींगसारख्या समस्यांच्या विरोधात का आवाज उठवत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जातो.

हा विचारांचा न संपणारा लढा आहे. जेव्हा एखादा विचारप्रवाह प्रबळ होईल त्या त्या वेळी त्याला विरोधी विचारप्रवाह अस्तित्वात येईल. या सगळ्या गोंधळात शेवटी प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे की तिला कोणता विचार स्वीकारायचा आहे. प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. प्रत्येकानी आपल्या हक्कांसाठी पुढे यावं परंतू त्याचबरोबर आपल्यामुळे इतरांच्या हक्कांवर गदा येणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे आतादेखील कदाचित किस ऑफ लव्ह सारखी आंदोलनाचे नेतृत्व करणारा पुरोगामी विचार पुढे जाईल की भारतीय संस्कृतीला मानणाऱ्या लोकांचा विचार वरचढ ठरणार हे येणारा काळच सांगेल.