आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होळी विशेष : ते फेमस ‘टॅव्ह, टॅव्ह’ म्युजिक वाजलंच नाही ना!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हौशी रंगकर्मी म्हणून मराठवाड्यातील स्पर्धांतून केलेल्या ‘देता आधार की करू अंधार...’ या एकांकिकेच्या प्रयोगावेळी घडलेले खुमासदार किस्से सांगतोय... प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे.
खास होळीनिमित्त वाचकांना हा नजराणा....


मा झ्या स्ट्रगलिंगचाच 1994-95 चा काळ होता तो. आम्ही आपले या एकांकिका स्पर्धेतून दुस-या स्पर्धेत बोंबलत फिरत होतो. स्पर्धांच्या शोधातच असायचो आम्ही. आता आम्ही म्हणजे कोण ? तर मी, मंग्या म्हणजे मंग्या देसाई असे दोनच कॅरेक्टर दाशाच्या (प्रा. दासू वैद्य) एकांकिकेत होते. कारण आमच्यासोबत काम करण्यासाठी पोरीच मिळत नव्हत्या. ज्या होत्या त्यांचे नखरे फार. बाहेरगावच्या दौ-यावर येण्यासाठी त्यांच्या हजार अटी असायच्या. त्यामुळे औरंगपु-यातील बबल्याच्या टपरीवर आमची एकांकिका कशी असावी, या विषयावर जी अतिगहन बैठक झाली, त्यात मी आणि मंग्याने दाशाला स्पष्ट सांगितले. काहीही लिही पण त्यात लेडीज कॅरेक्टर नको. फार झालं तर एखादा नाजूक आवाज पडद्यामागून द्यावा लागला तरी चालेल. तोही नाट्य चळवळीतला. आमच्यासारखे असंख्य अनुभव त्याच्याही पोतडीत होतेच. त्यामुळे त्यानं लेखणी लावली कागदाला आणि ‘देता आधार की करू अंधार’ ही जबरदस्त एकांकिका तयार झाली. मंग्या कृष्णाच्या रोलमध्ये आणि मी मांजरसुंबेकरच्या. प्रा. दिलीप घारे, प्रा. यशवंत देशमुख यांच्यासमोर जोरदार तालमी झाल्या. तेवढ्यात हिंगोलीला बेंडेची स्पर्धा असल्याची खबर आम्हाला मिळाली. त्यात नशीब आजमावून पाहायचं ठरलं अन् पहिला अडचणीचा सामना झाला. एकांकिकेला म्युझिक पाहिजे होतं ना. असा कोण भरवशाचा नाटकवाला मित्र आहे बरं, ज्याच्या खांद्यावर मान ठेवून आपण निवांतपणे म्युझिकच्या कॅसेटी देऊ शकतो, याचा शोध सुरू केला. तेवढ्यात रुद्र्या (प्रेषित रुद्रवार) महाशय डुलत डुलत येताना दिसले. त्याच्यावर आम्ही अक्षरश: झडपच घातली. तो अवाढव्य माणूसही दोन मिनिटं गांगरून गेला. थोडंफार कां कू करीत त्यानं बेंडेला म्युझिक करतो, असा होकार दिला. मग आम्ही त्याच्या गळ्यातच स्पीकर, हेडफोन, टेपरेकॉर्डरची जबाबदारी टाकली.


आणि स्पर्धेच्या दिवशी मी, मंग्या, रुद्र्या हिंगोलीत पोहोचलो. सकाळी थोडेफार डायलॉग पाठांतर झाले. रुद्र्याचा एकूण स्वभाव आणि त्याची काम करण्याची पद्धत माहिती असल्याने आम्ही म्युझिकवर फार वर्कआऊट केलं नाही. फक्त कोणत्या प्रसंगाला कोणत्या प्रकारचे संगीत प्रेक्षकांना ऐकायला मिळाले पाहिजे, एवढंच त्याला सांगितलं. त्याने तसे ते कॅसेटमध्ये भरून ठेवलेच होते. रात्री एकांकिका सुरू झाली. प्रत्येक डायलॉगला टाळ्या पडत होत्या. तसतसे मी अन् मंग्या फॉर्मात आलो. अन् तो प्रसंग आला. त्यात मंग्या कृष्णाचं रूप धारण करून रथाचे चाक बोटावर उचलतो आणि महाभारत मालिकेतील ते फेमस टॅव्ह, टॅव्ह असं म्युझिक वाजायला लागते. मंग्याने बोटावर चाक उचलल्याचा अविर्भाव करताच मी विंगेत बसलेल्या रुद्र्याला ‘हां. वाजीव आता’ असं खुणावलं. त्यानंही झटपट कानाला इअरफोन लावला. दोन-चार पिना इकडून तिकडे केल्या आणि मला ‘ओके. होऊन जाऊ दे’ अशी प्रतीखूण केली, पण म्युझिक काही वाजेचना. मंग्या गडबडला. मी पण चकित झालो. बरं तिकडं विंगेत रुद्र्या एकदम आनंदात. त्याच्या चेह-यावर हास्याचे झरे पाझरत होते आणि आमच्या चेह-यावरून घामाचे. मिनिटभर होत आला तरी म्युजिकचा पत्ताच नाही. अखेर मी प्रसंगावधान राखत म्हणालो, देवा या प्रसंगाला तुम्हाला महाभारतातलं ते फेमस ‘टॅव्ह, टॅव्ह असंच म्युजिक पाहिजे होतं ना.’ मंग्यानेही बाजू सांभाळत हो..हो..असं म्हटलं अन् एकांकिका पुढे सरकली. ती संपताच मी अन् मंग्या अक्षरश: रुद्र्यावर ठेवणीतल्या सर्व शिव्यांचा मारा केला. त्याला काय झालं तेच कळेना. म्युजिक तर लावलं होतं ना रे, असंच तो म्हणत होता. दहा मिनिटानंतर तांत्रिक उलगडा झाला. रुद्र्यानं स्पीकरची पीन स्वत:च्या इअरफोनला लावली होती. त्यामुळं म्युजिक फक्त त्यालाच ऐकू येत होतं. हा उलगडा कळाल्यावर आम्ही तिघंही एकमेकांवर उलटे-पालटे होत हसत होतो.