आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Article On House Wife Assist Her Family To Over Come From Crisis

गृहिणीचे पहिले पाऊल आर्थिक समृद्धीकडे (दिव्य मराठी ब्लॉग)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्यादिवशी गीता अस्वस्थपणे घरात इकडे-तिकडे फेऱ्या मारत होती. तेवढ्यात तिची शेजारीण कल्याणी तिच्या घरी आली. कल्याणी आणि गीता खुप चांगल्या मैत्रिणी होत्या. प्रत्येक गोष्ट एकमेकींना सांगायच्या. पण गेले कित्येक दिवस गीताला कल्याणीकडे काहीतरी बोलायचं होतं. शेवटी त्या दिवशी ती अचानक कल्याणीच्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला लागली.
कल्याणीने बराच वेळ समजूत घातल्यानंतर गीताने आपला प्रॉब्लेम सांगायला सुरूवात केली.
गीताचा नवरा सुयश व्यवसायिक होता. त्याचा कसल्यातरी वस्तू बनवण्याचा मोठा कारखाना होता. व्यवसाय आणखी वाढवण्याच्या महत्वकांक्षेने त्याने कर्ज काढलं होतं. कर्जाची रक्कम मोठी होती. परंतू अचानक आलेल्या जागतिक मंदीचा त्याचा व्यवसायावर परिणाम झाला. कामं मिळणं कमी झाली. कर्ज फेडायला उशीर होत होता म्हणून रकमेवरचं व्याज वाढत चाललं होतं. परंतू व्यवसायातील मंदीमुळे ते फेडणं अशक्य झालं होतं. सुयश खुप मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. हे गीताला कळाल्यानंतर तिचं आणि सुयशचं जोरदार भांडण झालं होतं. आपल्या नवऱ्याने आयुष्यातील एवढे महत्त्वाचे निर्णय घेताना तिचं मत विचारात घेतलं नाही म्हणून ती नवऱ्यावर भलतीच नाराज होती. पण नंतर तिने स्वतःला सावरलं आणि बरोबरीने नवऱ्याच्या मदतीला उभी राहीली. बघताना श्रीमंत नवरा बघून दिला म्हणून लग्न झाल्यानंतर घर सांभाळण्याच्या नादात गीताने कधी घराबाहेर पडून नोकरी करण्याचा विचार केला नव्हता. तशी कधी गरजही भासली नाही. आणि यावेळी गरज असतानादेखील ती त्याला केवळ मानसिक आधार देऊ शकत होती.
त्याचे सगळे प्रयत्न करून झाले होते. संकटातून बाहेर पडण्याचा दुसरा कुठलाच मार्ग सापडत नव्हता. नातेवाईकांकडून फारशी मदतीची अपेक्षा नव्हती. गीताला बऱ्याच नात्यांचे अर्थ नव्याने उलगडले होते. एरवी हक्काने आपलं म्हणणाऱ्या माणसांनी आज तिची आणि तिच्या नवऱ्याची साथ सोडली होती. काही वर्षापुर्वी अगदी असाच प्रॉब्लेम त्यांना आला होता. परंतू त्यावेळी मोठ्या जोमाने सुयश त्यातून बाहेर पडला होता. म्हणून यावेळीसुद्धा त्याचा प्रॉब्लेम सहा महिन्यात सुटेल असा त्याला विश्वास होता आणि त्याने गीतालादेखील तो विश्वास दिला होता. म्हणून अजूनदेखील तिने नोकरी करण्याचा विचार केला नव्हता. त्यातून दोघांनाही मुलांच्या शिक्षणाची काळजी होती. घरात सतत तणावाचं वातावरण होतं. अधून मधून भांडणं होत होती. कर्जाचं ओझं एवढं होतं की कोणत्याही क्षणी बँकेतून घरावर आणि कारखान्यावर जप्ती येऊ शकत होती.
वयात येणाऱ्या मुलांनादेखील वेगवेगळे प्रश्न पडत होते. नंतर ती त्यांच्या शाळा- कॉलेजच्या भानगडीत व्यस्त झाली. मुलं गीताकडे वडीलांची तक्रार करत होती. पण तिचे हातदेखील बांधलेले होते. सुयश तिकडे मनाने खचत चालला होता. पण संपुर्ण कुटूंबालाच या संकटाची झळ बसली होती. छोट्या- छोट्या गोष्टींवर पैसे खर्च करताना गीताला चार वेळा विचार करावा लागत होता. सुयशने घरात पैसे देऊ शकत नव्हता. हे सगळं समजल्यावर कल्याणीने तिची तात्पुरती समजूत घातली आणि तिला आधार दिला.
बघता बघता दोन वर्ष झाली. परिस्थिती जैसे थे होती. आता सुयशदेखील पश्चातापाच्या भावनेत अडकला होता. मी माझ्या कुटूंबाचं नुकसान केलं या विचारात तो आजकाल घरात बोलायचा कमी झाला होता. त्याचा मुलांशीदेखील संवाद कमी होत चालला होता. गीता तिच्या परीने वेगवेगळ्या लोकांशी बोलून सुयशच्या प्रॉब्लेम सोडवण्यचा प्रयत्न करत होती. एक दिवस सुयश एवढा हतबल झाला की त्याने या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण गीता सुदैवाने योग्य वेळेला खोलीत पोहोचली आणि त्याच्या हातातली विषाची बाटली दूर फेकली. तो वाचला. गीताने त्यावेळेला त्याला आधार दिला. त्याला दवाखान्यात घेऊन गेली. मानसिक उपचारानंतर तो आता नॉर्मलला येत होता. गीताने सुयशला या संकटातून बाहेर काढण्याचा निर्धार केला आणि तिने बाहेर पडून नोकरी शोधायला सुरूवात केली.
सुयशचा प्रॉब्लेम केव्हातरी दूर झालाच असावा. पण जेव्हा गीताने नोकरी करण्याचा निर्धार केला तेव्हाच तिने अर्धी लढाई जिंकली होती. आयुष्याच्या एका वेगळ्या वळणावर ती येऊन पोचली होती. आज तिने घेतलेला निर्णय संकटातून बाहेर पडण्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल होतं. या सगळ्यातून महिलांनी आज स्वतःला आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्याची केवढी गरज आहे हे अधोरेखित होते. आज घराघरात अनेक गीता आहेत ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इच्छा आहे आणि त्यांच्यात तेवढी क्षमतादेखील आहे. त्यांना गरज आहे ती संधी देण्याची. आजदेखील कितीतरी घरांमध्ये स्त्रियांनी नोकरी करणे कमीपणाचे समजले जाते. परंतू अशा मुलींनी कोणतंही संकट येण्याच्या आधीच स्वतःला एवढं सशक्त करावं की कितीही मोठं संकटाचा त्या धैर्याने सामना करू शकतील.