Home »Divya Marathi Special» Humble Request For Drought Eradication

दुष्काळ निवारणासाठी एक नम्र आवाहन

अभिलाष खांडेकर | Feb 20, 2013, 06:07 AM IST

  • दुष्काळ निवारणासाठी एक नम्र आवाहन


संयुक्त राष्ट्र संघाने 2013 हे आंतरराष्ट्रीय जल वर्ष जाहीर केल्यानंतर ‘दिव्य मराठी’ने लगेचच खारीचा वाटा उचलण्याचा संकल्प केला. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच (एक जानेवारी) आम्ही तशी घोषणाही केली होती. त्या अनुषंगाने आमच्या विविध आवृत्त्यांमध्ये आम्ही अवर्षणामुळे पाण्याचं वाढलेलं महत्त्व, जलसंवर्धन, दुष्काळात पाण्याचा काटकसरीने वापर आदी अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर जनजागरण व प्रबोधन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

मराठवाड्यात पाण्याच्या भीषण दुर्भिक्षामुळे मोठे संकट उभे ठाकले आहे. ‘दिव्य मराठी’ आपल्या परीनं प्रयत्न करीत आहे. सरकार (अर्थात मनपा, राज्य सरकार) याबाबत काय पावले उचलत आहेत हे आपण बघतच आहोत. ही वेळ अशी आहे की आम्हा सर्वांना यातून मार्ग काढावयाचा आहे. औरंगाबाद असो की जालना, बीड असो वा लातूर. सगळीकडेच जनतेला गेले काही महिने प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. जालन्यात उद्योजक जसे पुढे सरसावले आहेत, तसेच उर्वरित मराठवाड्यात आणि औरंगाबादेतही नागरिकांनी पुढे येऊन दुष्काळाचा हा चटका कमी करण्यात मदत करावी, ही आमची माफक अपेक्षा आहे, आपणास आवाहन आहे.राजकारणाच्या पुढे जाऊन एक सर्वपक्षीय फोरम तयार करून, स्वयंस्फूर्तपणे जमेल तेवढी आर्थिक मदत करता आली आणि एका स्वतंत्र, चांगल्या संस्थेला दान केली, तर त्या रकमेचा उत्तम उपयोग होऊ शकेल.

‘दिव्य मराठी’ने नहर-ए-अंबरीवर लिहिलेल्या मालिकेवरून शहरातील अनेक मान्यवरांनी पुढे येऊन ही यंत्रणा लवकरात लवकर दुरुस्त व्हावी यासाठी लागणारा निधी देण्याची तयारी दाखवली आहे. आमदार एम.एम. शेख, उद्योगपती सुभाष झांबड यांनी फोन करून ‘दिव्य मराठी’ला सांगितलंय की या नहर-ए-अंबरीसाठी आणि इतर उपाययोजनांसाठी त्यांचे हात कमी पडणार नाहीत. असे अनेक जण आपापल्या परीने विचार करत आहेत आणि दुष्काळावर मात करण्यासाठी सज्ज झाले आहेत, परंतु समस्या खूप मोठी आणि बिकट असल्यामुळे असे असंख्य हात पुढे येण्याची गरज आहे.

पाण्याची ही मोहीम दुष्काळाची जाण असलेल्या प्रत्येकाची स्वत:ची आहे आणि त्यात उद्याची भीषण परिस्थिती टाळण्यासाठी शास्त्रशुद्ध उपाय दडलेले आहेत. असाच दुष्काळ पुढच्या वर्षी पडला तर काय होऊ शकते, याची कल्पना न केलेलीच बरी.

‘दिव्य मराठी’ हे आवाहन फक्त मराठवाडाच नव्हे, तर सर्वच दुष्काळग्रस्त भागांसाठी करत आहे. आपल्या देशात चांगल्या कामांसाठी पैसा कधीच कमी पडल्याचे उदाहरण नाही. या दुष्काळातही तो कमी पडणार नाही, हा विश्वास ‘दिव्य मराठी’ला आहे.

Next Article

Recommended