आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला भेटलेला देवमाणूस!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी दिलेले पत्र घेऊन मी उमरग्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे गेलो. मी भीतभीतच प्राचार्यांच्या कक्षात गेलो. भारदस्त देहयष्टी, डोळ्यावरील जाड भिंगांचा चष्मा नाकावर घसरलेला व त्यामुळे चष्म्यावरून दिसणारे त्यांचे गणपतीसारखे बारीक परंतु तेजस्वी डोळे. मी दिलेले पत्र त्यांनी वाचले व मला म्हणाले, जा, प्रवेश घे. काही काळजी करू नकोस. वाणिज्य शाखेकडे प्रवेश मागणारा अर्ज घेऊन मी परत स्वाक्षरीसाठी प्राचार्यांकडे गेलो. अर्ज पाहून ते भडकलेच. म्हणाले, ‘गधड्या, बीजगणितात 80 गुण, व्यावहारिक अंकगणितात ७६ गुण असूनही तू वाणिज्य शाखेला प्रवेश घेतो आहेस. जा, विज्ञान शाखेला प्रवेश घे.’ मी हळू आवाजात म्हणालो, ‘शास्त्र शाखेचा खर्च फार असतो म्हणतात, तो मला झेपणार नाही.’

‘तुझ्यासारख्या हुशार विद्यार्थ्याने शास्त्र शाखा निवडली पाहिजे. खर्चाची अजिबात काळजी करू नकोस. ती जबाबदारी माझी.’ आनंदातिरेक कशाला म्हणतात ते तेव्हा मला जाणवले. महाविद्यालयीन शिक्षणाची चार वर्षे प्राचार्यांच्या छत्रछायेखाली केव्हा निघून गेली, कळलेच नाही. मी बी.एस्सी. (गणित) परीक्षा देऊन गावी परतलो. मला औरंगाबादला जाऊन विद्यापीठात एम. एस्सी. (गणित) करणे शक्य नव्हते. निकाल घेण्यासाठी महाविद्यालयात गेलो. प्रवेशद्वारावरच माझ्या अभिनंदनाचा फलक झळकत होता. ८0 टक्के गुण मिळवून प्रावीण्यासह बी. एस्सी.उत्तीर्ण झालो होतो. ज्या देवमाणसामुळे मला हे भाग्य लाभले त्यांच्या दर्शनासाठी प्राचार्य कक्षात गेलो. त्यांनी मला औरंगाबादला विद्यापीठात एम.एस्सी.साठी पाठवण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, ‘दोन वर्षे आत्ता निघून जातील. तुला गणिताचा प्राध्यापक व्हायचे आहे, ’ तो देवमाणूस, मी व माझा मित्र कुलकर्णी तिघांच्याही डोळ्यात अश्रू होते. मला आशीर्वाद देणारे देवमाणूस म्हणजे प्राचार्य (डॉ.) नानासाहेब मुसांडे होते.