आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Important Between India And Bangladesh Agreement

भारत-बांगलादेशमधील करारांचे महत्त्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भारत व बांगलादेश या दोन देशांतील केंद्रीय गृहमंत्री स्तरावर होणा-या चौथ्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे नुकतेच बांगलादेशच्या दौ-या वर गेले होते. या दौ-या दरम्यान भारत व बांगलादेशमध्ये दोन महत्त्वाचे करार झाले आहेत. पहिला करार प्रत्यार्पणासंदर्भातील आहे, तर दुस-या कराराद्वारे या दोन्ही देशांतील नागरिकांना परस्परांच्या भूमीत येण्याजाण्यासाठी नवीन व्हिसा धोरण निश्चित करण्यात आले आहे. या दोन्ही करारांमध्ये सगळ्यात ठळक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका बाजूने भारताच्या आणि बांगलादेशच्या सुरक्षेवर जोर देण्यात आला, तर दुस-या बाजूने आर्थिक संबंध चांगले होण्यावर भर देण्यात आला आहे.

पाकिस्तानपाठोपाठ आता बांगलादेशबरोबरही नवीन व्हिसा धोरणासंदर्भात भारताने करार केल्यामुळे या देशांमधल्या लोकांना परस्परांच्या देशांमध्ये जाण्याचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. या करारामध्ये उद्योगधंद्यासाठी जाणारे नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, पत्रकार या सगळ्यांना व्हिसा मिळणे सोपे होणार आहे. आता औपचारिक व्हिसा असेल तर नागरिक 45 दिवस दुस-या देशामध्ये राहू शकतील तसेच प्रवास व्हिसा हा एका वर्षासाठी मर्यादित असून नागरिक फार फार तर नव्वद दिवस परस्परांच्या देशात राहू शकतील. नवीन व्हिसा धोरणाचा सगळ्यात जास्त फायदा हा उद्योगपतींना होणार आहे. कारण त्यांचा व्हिसा हा 5 वर्षांसाठी मर्यादित असणार आहे. आधी हा व्हिसा प्रत्येक वर्षी काढावा लागत होता.

सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता भारत व बांगलादेशने केलेल्या प्रत्यार्पण कराराला स्वत:चे आगळे महत्त्व आहे. या कराराचा सगळ्यात जास्त फायदा बांगलादेशला होईल, असे बांगलादेशचे गृहमंत्री मुईउद्दीन खान आलमगीर यांचे मत आहे. या करारामुळे बांगलादेशमध्ये असलेल्या भारतविरोधी प्रवृत्तींना आळा बसण्याची शक्यता आहे. उल्फाचा महासचिव अनुप चेटिया याला आमच्या स्वाधीन करा, ही भारताची बांगलादेशकडे प्रमुख मागणी आहे. पण चेटियाने राजकीय आश्रयासाठी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केल्यामुळे त्याचे प्रत्यार्पण तूर्तास होऊ शकत नाही. या कराराच्या अंतर्गत आणखी कोणाच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने बांगलादेशकडे केली आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. 2007 मध्ये मुंबईत ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटाच्या कटाचे सूत्रधार म्हणून हरकत-उल-जिहाद या दहशतवादी संघटनेच्या बांगलादेशमधील गटाचे नाव पुढे आले होते. पण त्यानंतर तपासाची सूत्रे तसेच आरोपींना ताब्यात घेणे याबाबतची कारवाई पुढे जाऊ शकली नाही.

बांगलादेशबरोबर नुकतेच दोन करार झाले असले तरी भारताला अजून खूप मोठी मजल मारायची आहे. आपला दबदबा जगात जर वाढवायचा असेल तर भारताला आपल्या शेजारी देशांना बरोबर घेऊन जाणे गरजेचे आहे. बांगलादेशात हसीना शेख यांचे सरकार आल्यामुळे त्या देशाबरोबरचे भारताचे संबंध सध्या चांगले आहेत; पण ते सत्तापरिवर्तन झाल्यानंतरही असेच राहिले पाहिजेत. अनुभव असा आहे की, पाकिस्तानबरोबर चांगले संबंध असलेल्या बेगम खालिदा झिया यांचे सरकार ज्या वेळी सत्तेवर येते त्या वेळी भारताचे बांगलादेशबरोबरचे संबंध बिघडतात. असे न होऊ देणे हे भारताचे धोरण असले पाहिजे. दोन्ही देशांमध्ये सीमातंटा, नद्यांमधील पाणी वाटपावरून असलेले मतभेद यावर अद्याप योग्य तोडगा निघालेला नाही. हे सारे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. बांगलादेश चीनच्या कवेत जाता कामा नये हे बघणेसुद्धा गरजेचे आहे. कारण असे झाले तर ते भारताला परवडणारे नाही.
दुसरा मुद्दा असा की, भारतातील ईशान्य राज्यांच्या विकासासाठी बांगलादेशबरोबरचे संबंध चांगले असणे आवश्यक आहे. ईशान्य भारतातील राज्यांतून सीमा ओलांडून रस्त्यामार्गे नागरिकांची ये-जा तसेच अन्य वाहतूक करू देण्यास बांगलादेशने नकार दिल्यानंतर भारताने म्यानमारमध्ये असलेले सितवे बंदर विकसित करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून मिझोराम आणि इतर राज्यांसाठी दुस-या मार्गाने संपर्क होऊ शकतो. मात्र, दोन्ही देशांतील संबंध चांगले असतील तर हा प्रश्नच उद्भवणार नाही.

भारताचे व्हिसा धोरण अतिशय किचकट आहे. ही व्हिसानीती सुरक्षेच्या दृष्टीने आखली गेली असली तरीदेखील भारतात अनधिकृत विदेशी नागरिकांची संख्या बरीच झाली आहे. कडक व्हिसा धोरण असतानाही हे नागरिक भारतात घुसखोरी करतच आहेत. त्यामुळे असले किचकट व्हिसा धोरण कायम राखण्याच्या पाठीमागे नेमके काय लॉजिक आहे? माझी श्रीलंकेतील मैत्रीण, जी एकेकाळी दिल्लीत शिकत होती तिचे तामिळनाडूमध्येसुद्धा खूप नातेवाईक आहेत. पण तिच्या मते भारतात येणे हे सर्वात डोकेदुखीचे काम आहे.

हेच मत माझ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी मित्रांचे आहे. अपवाद फक्त भूतान व नेपाळ या देशांचा आहे. जगावर नजर टाकली तर दक्षिण पूर्व आशियाई देशांमधील (आसियान देश) नागरिक (म्यानमारचा अपवाद सोडल्यास) कधीही परस्परांच्या देशात जाऊ-येऊ शकतात. अशीच परिस्थिती युरोपमधील देशांमध्येही आहे. यामुळे एक गोष्ट साध्य होते ती म्हणजे दोन देशांमधील नागरिकांमध्ये जवळिकीचे नाते निर्माण होते, आर्थिक उलाढाल वाढते आणि याचा सकारात्मक परिणाम दोन देशांमधील संबंधांवर नक्कीच होतो.

दक्षिण आशियात बांगलादेश हा एफडीआय मिळवणारा अग्रगण्य देश आहे. त्याचा फायदा भारतालाही होऊ शकतो. या दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढतो आहे. 2011-12 मध्ये या दोन्ही देशांमधला व्यापार 4.3 अब्ज डॉलर्स इतका होता, ज्यामध्ये भारताने बांगलादेशमध्ये केलेल्या निर्यातीची उलाढाल 3.5 अब्ज डॉलरची होती, तर बांगलादेशने भारतात केलेल्या निर्यातीची उलाढाल 0.6 अब्ज डॉलर इतकी होती. दोन्ही देशांतील हा व्यापार 100 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, असे जागतिक बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारत-बांगलादेश संबंधांकडे पाहणे आवश्यक आहे.

rangnekarprashant@gmail.com