आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारणात ‘दिसते तसे नसते’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नाशिकमधील शिवसेनेच्या माजी पदाधिका-याने व्हॅलेंटाइन डे आणि वाढदिवसाचे औचित्य साधून राष्‍ट्रवादीत केलेल्या प्रवेशाच्या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड आणि नाशिकचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची लाभलेली उपस्थिती हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री सांगलीहून मुंबईला आणि तेथील बैठक आटोपून नाशिकला असा धावता प्रवास करून आले. शिवसेनेच्या एका माजी जिल्हाप्रमुखाचा अधिकृत पक्षप्रवेश 14 जानेवारीला ( मकरसंक्रांत ) झाला असताना पुन्हा केवळ त्या पदाधिका-या च्या आग्रहाखातर अजितदादा 14 फेबु्रवारीला (व्हॅलेंटाइन डे ) इतके जिवाचे रान करून का आले, असा प्रश्न कुणाही नागरिकाला पडला असावा.

भुजबळ आणि अजितदादा यांच्यातील ‘सख्य’ राज्यभरातील नागरिकांना ज्ञात आहे. त्यात राष्‍ट्रवादीमधील राज्याची कमान अजितदादांकडे आणि राष्‍ट्राच्या राजकारणात सुप्रियाताई लक्ष घालणार असल्याचे संकेत मोठ्या साहेबांनी दिल्यापासून अजितदादांचे पक्षातील प्रस्थ प्रचंड वाढले आहे. अशा परिस्थितीत एकेकाळी मोठ्या पवार साहेबांनंतर असलेले पक्षातील दोन नंबरचे भुजबळांचे स्थान काहीसे धोक्यात आल्यासारखे झाल्याचे बोलले जाते. मात्र, मोठ्या साहेबांनी केंद्र सरकारमध्ये ज्याप्रमाणे दोन नंबरचे स्थान दुसरीकडे जात असल्याचे लक्षात येताच मोठा गहजब उडवून दिला होता त्याप्रमाणे भुजबळ यांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांचा कित्ता गिरवला नसला तरी ती क्षमता त्यांच्यात नक्कीच आहे, ही कल्पना अजितदादांनादेखील आहे. त्यामुळेच नाशिकमध्ये भुजबळांना ‘चेक’ देण्याच्या उद्देशानेच तर त्यांनी या प्रवेशसोहळ्याला इतके महत्त्व दिले असण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

या सोहळ्यात बोलताना अजितदादांनी त्यांची पक्षावर असलेली कमांड दाखवण्यासाठी मी कुणा कार्यकर्त्यांना राजकीय पार्श्वभूमी नसतानाही कशी पदे दिली ? त्याची जंत्रीच ऐकविली. उमेश पाटील यांना युवक राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष करण्यापासून ते झोपडपट्ट्यांमध्ये काम करणा-या विद्याताई चव्हाण यांना महिला आघाडी प्रमुख करताना राजकीय वारसा नसलेल्यांना आणि सर्व जातीजमातीमधील कार्यकर्त्यांना कसे थेट पक्षातील सर्वोच्च पदे दिली ते सांगतानाच नवनवीन नेतृत्व उदयाला येत असते, जुन्यांना काही काळाने बाजूला व्हावे लागते ही अपरिहार्यता असल्याचेही त्यांनी बोलण्याच्या ओघात सांगितले. पण त्यांचे हे वाक्य बोलण्याच्या ओघात आले असण्यापेक्षा नियोजनपूर्वक आणि संकेतात्मकच अधिक असल्याची चर्चा सभेनंतर रंगली होती. त्यानंतर बोलताना भुजबळ यांनी दशकानुदशके राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पदाधिका-याला कुणी पक्षातून काढले तर तो घरी थोडीच बसणार आहे ? कोणताही पदाधिकारी जे करेल तेच शिवसेनेच्या या कार्यकर्त्यांनी केले, असे भुजबळांचे भाषणातील वाक्यदेखील सहज आल्यासारखे वाटले तरी राजकारणात सहज काहीच घडत नसते. ब-या च बाबी संकेतात्मक पातळीवरच घडत असतात. त्यामुळेच प्रत्यक्ष सभेत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शाब्दिक चिमटे आणि कोपरखळ्या मारल्या नसल्याने वरकरणी या दोन्ही नेत्यांच्या मनांमध्ये खदखद दिसली नाही. मात्र, राजकारणात ‘दिसते तसे नसते’ या म्हणीचाच अनेकदा येणारा अनुभव आणि मोठ्या नेत्यांची मने ही अथांग नदीप्रमाणेच असल्याने त्यांच्या सखोल डोहातील उलथापालीचा केवळ अंदाज बांधणेच आपल्या हाती उरते.