आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजी साहित्यातील भारतीय प्रिन्स!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनोहर माळगावकर म्हटले की मला आठवते ते करवीरनगर वाचन मंदिर आणि त्या काळी ‘सह्याद्री’ मासिकातून प्रसिद्ध होत असलेला ‘प्रिन्सेस’चा उत्कंठावर्धक अनुवाद. साधारण 1962-65चा तो काळ होता. भा. द. खेरांनी माळगावकारांच्या या कादंबरीचा केलेला अनुवाद क्रमश: प्रसिद्ध होत असे आणि मी तो अत्यंत आवडीने वाचत असे. तो वाचत असताना पुढील भागात काय असेल, अशी उत्कंठा कायम राहत असे. या कादंबरीचा विषय संस्थानिकांच्या जीवनावर आधारलेला. संस्थानाचे राजे आहेत हिरोजी महाराज आणि कादंबरीचा नायक आहे राजपुत्र अभय. सुरुवातीला अभय व आईचे ममतेचे, प्रेमाचे संबध असतात, वडलांशी मात्र तितके जवळिकीचे नसतात. परंतु जसजसे वय वाढत जाते तसतसे अभयच्या मनात वडिलांबद्दल आदरभाव निर्माण होतो. माळगावकरांनी नात्यांमधील हा बदल छान रंगवला आहे. संस्थानाचा जुना खजिना असतो. भारताला स्वातंत्र्य मिळणार असते, संस्थानांचे विलीनीकरण होणार असते. हे सहन न झाल्याने व आपण जिथे राजा म्हणून राहिलो तिथे साधा नागरिक म्हणून राहणे हे हिरोजी महाराजांना सहन होत नाही. शिकारीच्या बहाण्याने ते शांतपणाने मृत्यूला सामोरे जातात. अभय फक्त 49 दिवसांसाठी राजा बनतो. दोघांच्याही मनातील ते मानसिक-भावनिक द्वंद्व माळगावकरांसारख्या सिद्धहस्त लेखकाने अत्यंत समर्थपणे वाचकांपर्यंत पोहोचवले.


1958 मध्ये माळगावकरांची ‘डिस्टंट ड्रम्स’ ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर‘कॉम्बॅट ऑफ शॅडोज’(1962),‘प्रिन्सेस’(1963) वाचकभेटीस आल्या. त्यातील ‘प्रिन्सेस’च्या लक्षावधी प्रती खपल्या. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या बेस्ट सेलर लिस्टवर ही कादंबरी तब्बल 17 आठवडे झळकत राहिली. त्यांच्या कादंब-यांचे विविध भाषांतून भाषांतरे झाली. मराठीत भा. द. खेर, पु. ल. देशपांडे, श्री. ज. जोशी अशा मान्यवरांनी त्यांच्या कादंब-यांचे अनुवाद केले...


पुढे मुंबईला आल्यावर मला इंग्रजी ग्रंथवाचनाची गोडी लागली आणि माळगावकरांच्या कादंब-या मूळ भाषेतून अधाशासारख्या वाचून काढल्या. त्यातील ‘डिस्टंट ड्रम्स’ ही शांततेच्या काळातील लष्करी जीवनावर आधारित कादंबरी. त्यातील काही प्रसंग अजूनही मनात घर करून राहिले आहेत. त्यात नुकतेच कमिशन मिळवून आलेला अधिकारी नायक असतो. त्याचे वरिष्ठ काही गोष्टींबाबत त्याच्याकडे चौकशी करतात. ते त्याला माहीत नसल्याने तो ‘आय डोंट नो’ असे सरळसोट उत्तर देतो. तेव्हा वरिष्ठ अधिकारी सांगतात, नेव्हर से आय डोंट नो. असे सांगणे म्हणजे तुझी बेफिकिरी, उदासीनता दिसून येते. माहीत नसले तर त्यांना सांगायचे, ‘आय वुईल फाइंड आउट सर!’ माळगावकरांची आणखी एक गाजलेली ‘कॉम्बॅट ऑफ शॅडोज’ ही चहाच्या मळ्यातील जीवनावरील एक सूडकथा आहे. माळगावकरांची ‘बेंड इन गँजेस’ ही फाळणीवर आधारलेली कादंबरी आहे, तर 1857 च्या पार्श्वभूमीवर ‘दी डेव्हिल्स विंड’ ही कादंबरी आहे. त्यांनी ज्या ऐतिहासिक कादंब-या लिहिल्या त्यात घटनाक्रम किंवा काळ किंवा इतिहासाच्या संदर्भात ते पूर्णपणे प्रामणिक राहिले. त्यासंबंधीचे प्रसंग, कथा घटनेभावेती गुंफली. त्यांनी आठ कादंब-या, पन्नासहून अधिक कथा लिहिल्या. ललितेतर चरित्र आणि इतिहासासंबधी लेखन केले. त्यात गोवा, कान्होजी आंग्रे, कोल्हापूरचे छत्रपती, गांधीजी इत्यादींवरील त्यांचे लेखन गाजले आहे.


वडिलांच्या प्रभावामुळे ते संस्कृत शिकले व आईमुळे त्यांना इंग्रजी साहित्याची गोडी लागली. तरुणपणी त्यांना शिकारीची आवड होती. त्यांनी पदवी संपादन केल्यावर लष्करी नोकरी स्वीकारली. दुस-या महायुद्धाच्या काळात रणांगणावर पराक्रम गाजवून लेफ्टनंट कर्नल झाले. स्वातंत्र्य मिळाल्यावर लष्करातील नोकरी निष्क्रिय भासल्याने त्यांनी राजीनामा दिला. या सर्व अनुभवांचा त्यांनी आपल्या साहित्यनिर्मितीत खुबीने वापर केला. ते जन्मगावी उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील जगलपेट येथे स्थायिक झाले. ‘प्रिन्सेस’ कादंबरीच्या स्वामित्वधनातून त्यांनी बेळगावजवळ ‘जंगलबेट’ ही भव्य वास्तू बांधली. भा. द. खेर यांनी एक आठवण सांगितली आहे की, जेव्हा त्यांनी ‘प्रिन्सेस’ या कादंबरीच्या अनुवादाबद्दल किती रॉयल्टी द्यावी असे विचारले तेव्हा माळगावकरांनी ‘फक्त एक रुपया द्या’ असे सांगितले. यात त्यांचा दिलदारपणा दिसून येतो. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते ‘जंगलबेट’ इथेच राहिले. इंग्रजी साहित्यात स्वत:चा आब राखून वावरलेल्या या मान्यवर साहित्यिकाला मानाचा मुजरा!