आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औद्योगिक विकास झाला तरच चित्र बदलू शकेल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील जवळपास 80 टक्के जनता ही शेतीवरच अवलंबून आहे. त्यासाठी शेतीचा विकास होणे अत्यंत गरजेचे असतानाही दुर्दैवाने मराठवाड्यातील शेतकरी आजही पारंपरिक आणि जुन्या पद्धतीनेच शेती करीत असल्यामुळे त्याची आर्थिक सुबत्ता वाढलेली नाही. शेतीचा पोत वाढविणे आणि पडलेल्या पावसाचा थेंब न थेंब जमिनीत जिरवण्याची गरज आज ख-या अर्थाने निर्माण झाली आहे. दुर्दैवाने मराठवाड्यात दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी-कमी होत चाललेले असून मिळेल तेवढ्याच पाण्यावर आपल्याला यापुढे शेती करावी लागणार असल्याने मागासलेपणाचे तेच ते रडगाणे थांबवून मराठवाड्याच्या सर्र्वांगीण विकासासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम आखून त्याची पारदर्शकपणे अंमलबजावणी झाल्यास ख-या अर्थाने या भागाचा विकास होईल.
संयुक्त महाराष्‍ट्रात मराठवाडा विनाअट सामील झाला तेव्हापासून आजपर्यंतची पश्चिम महाराष्‍ट्राच्या तुलनेत सातत्याने या विभागावर प्रत्येक बाबतीत अन्याय झालेला असून, मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याची नितांत आवश्यकता आहे. मराठवाड्यात फक्त औरंगाबाद येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत विकसित झालेली असून बीड, परभणी, जालना, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यातही औरंगाबादच्या धर्तीवर औद्योगिक विकास झाल्यास स्थानिक बेरोजगार तरुणांना निश्चितपणे रोजगार मिळेल. पुणे, मुंबईसारख्या औरंगाबाद विमानतळाची आंतरराष्टÑीय पद्धतीने उभारणी झालेली असतानाही त्याला तसा विशेष दर्जा बहाल न केल्यामुळे अनेक उद्योजक इकडे यायला फारसे धजावत नाहीत. पूर्वी मुंबईला जायचे म्हटले तर मनमाडला रेल्वे बदलावी लागत असे. मात्र, आता थेट जालन्याहून मुंबईला रेल्वेने जाण्याची सोय झाल्याने काहीअंशी का होईना विकासकामांना निश्चितपणे गती मिळाली आहे. इतर भागाच्या तुलनेत मराठवाड्यात आणखीही रेल्वेचे जाळे विकसित होणे गरजेचे आहे. नांदेडचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी अत्यंत दूरदृष्टीने पैठण येथे गोदावरी नदीवर जायकवाडी धरण बांधले. या धरणामुळे मराठवाड्यात सिंचनाचे क्षेत्र हमखासपणे वाढले. मात्र, याच जायकवाडी धरणाच्यावर गोदावरी नदीत तीन ते चार मोठी धरणे बांधण्यात आल्यामुळे जायकवाडीत पाणी येण्याचा ओघ कमी झाला. तसेच अगोदर खालची धरणे भरू द्यावीत आणि मगच पाणी अडवावे. हा साधा नियमही पाळला जात नसल्यामुळे जायकवाडीची पाणीपातळी वरचेवर अधिकच खालावत चालली आहे. शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख या दोन दिवंगत नेत्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात मराठवाड्यात विविध विकासाची कामे केली. त्यामुळे या भागाच्या विकासाला काही प्रमाणात का होईना गती आली. शिवाजीराव निलंगेकर, अशोकराव चव्हाण यांनीही विकाससाठी प्रयत्न केले. दुर्दैवाने या दोन्ही नेत्यांना पुरेसा कालावधी मिळू शकला नाही. मराठवाड्यातील या उमद्या नेतृत्वावर दोष सिद्ध होण्यापूर्वीच त्यांना पदावरून दूर व्हावे लागल्यामुळे मराठवाड्यावर नेतृत्वाच्या बाबतही हा एकप्रकारे अन्यायच म्हणावा लागेल.
(लेखक अंबड विधानसभा मतदारसंघातील माजी
आमदार आहेत)