आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय ऊर्जा क्षेत्रातील मनुष्यबळाची संख्या येत्या पाच वर्षांत दुप्पट होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वच क्षेत्रांमध्ये ऊर्जेच्या वाढत्या मागणीमुळे त्याची उत्पादकताही  मागील काही वर्षांपासून प्रचंड वाढली आहे. त्यामुळेच जगभरातील जवळपास सर्वच देश सध्या ऊर्जेचे नवनवीन स्राेत शोधण्यासाठी सरसावले आहेत.  यासाठी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात संशोधनेही सुरू आहेत.  अशात अक्षय ऊर्जा क्षेत्रातील विकासाच्या संधी वाढल्या असून मागील काही वर्षांपासून हे ऊर्जेचे प्रमुख स्राेत मानले जात आहे. याचा प्रभाव भारतातही पाहायला मिळत आहे. एकीकडे या क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असतानाच दुसरीकडे या क्षेत्रामधील रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या आहेत. 

नुकत्याच जारी झालेल्या आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीच्या २०१७ च्या वार्षिक समीक्षा अहवालानुसार, अक्षय ऊर्जा क्षेत्रात २०१५ या वर्षात देशातील ४८ हजार लोकांना थेट रोजगार मिळाला. २०१६ मध्ये ही संख्या ६०,५०० वर पोहोचली. अर्थात एका वर्षातच अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात १२,५०० नवे रोजगार मिळाले. या क्षेत्रात २०२२ पर्यंत ५९ हजार लोकांना रोजगार मिळेल, असेही या अहवालात म्हटले आहे. 

एका अहवालानुसार, देशातील ऊर्जा उत्पादनात सर्वाधिक ५६.८ टक्के वाटा पवन ऊर्जेचा असून त्यानंतर १८ टक्के ऊर्जा, १६ टक्के बायोमास ऊर्जेचा आहे. सध्या सरकाराचा सर्वाधिक भर सौर ऊर्जेवर असून २०२२ पर्यंत त्यांनी १ लाख मेगावॅटपर्यंत ऊर्जा उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. स्थापत्य क्षमतेच्या बाबतीत पवन ऊर्जेत भारत जगात चौथ्या आणि सौर ऊर्जेच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या क्षेत्रात १०० टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी असल्याने नोकरीच्या संधीही वाढण्याची शक्यता आहे.  

या क्षेत्रात विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर काम करू शकतोच. शिवाय, व्यवस्थापनातही त्यांना करिअर करता येऊ शकते. ऊर्जा वितरण कंपन्या आणि उत्पादन कारखान्यात तांत्रिक कर्मचाऱ्यांची गरज असते. तर, कंपनी किंवा उत्पादन व्यवस्थापनातही नेहमीच दर्जेदार मनुष्यबळ गरजेचा असतो. अक्षय ऊर्जा हे एक वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्र असल्यामुळे या क्षेत्रामध्ये चांगल्या पदावर काम करण्यासाठी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घ्यावे लागते. त्यानंतर विद्यार्थी यात नोकरीस अर्ज करू शकतात. या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाचे प्रमाण गरजेपेक्षा कमी आहे.  
अभियांत्रिकी, व्यवस्थापन अभ्यासक्रमातून सहज प्रवेश  
अक्षय ऊर्जा क्षेत्रात विज्ञान आणि व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी संधी आहेत. तथापि, बहुतांश अभ्यासक्रम पदव्युत्तर स्तरावरच असतात. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी ऊर्जेशी संबंधित फिजिक्स, अल्पाइड फिजिक्स किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकी इत्यादींच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश पूर्व परीक्षेत मिळालेल्या गुणानुक्रमानुसार प्रवेश दिल्या जातो. 

बी.एस्सी अभ्यासक्रमासाठी बहुतांश संस्था स्वत:च प्रवेशपूर्व परीक्षा घेतात. तर, काही संस्थांमध्ये पात्रता परीक्षेतील गुणानूक्रमानुसार प्रवेश मिळतो. पदवी अभ्यासक्रमानंतर विद्यार्थी ऊर्जा अध्ययनाच्या एम.टेक किंवा अक्षय ऊर्जेच्या एम.एसस्सी अभ्यासक्रमासही प्रवेश घेऊ शकतात.  देशातील दर्जेदार संस्थांमध्ये एम.टेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गेट स्कोर आवश्यक असतो. तर, व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थी ऊर्जा व्यवस्थापनाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतो. सोबतच अनेक संस्थांमध्ये यासाठी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.

ऊर्जा वितरण कंपन्यांमध्ये भरपूर प्रमाणात संधी  
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी ऊर्जा क्षेत्राशी निगडित कंपन्यांमध्ये नोकरी करू शकतात. ऊर्जा वितरण करणाऱ्या खासगी कंपन्या आणि सरकारी कंपन्यांमधील विविध अभियांत्रिकी पदांवरही काम करता येऊ शकते. व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांना मनुष्यबळ व्यवस्थापन, ऑडिटिंग, ऊर्जा निर्मिती आणि धोरण निश्चितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावता येऊ शकते. या मनुष्यबळासाठी विदेशामध्येही भरपूर संधी उपलब्ध आहेत.  

नवोदितांना सुरुवातीचे दरमहा वेतन २५ ते ३० हजार रुपये  
या क्षेत्रात नवोदितांना दरमहा २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते. तथापि, सरकारी आणि खासगी कंपन्यांमधील वेतनात फरक असू शकतो. काही वर्षांच्या अनुभवानंतर दरमहा वेतन ५० ते ६० हजारांपर्यंत जाऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...