आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Infosys Executive President Narayan Murthy Issue

इन्फोसिस आणि क्रायसिस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इन्फोसिसचे मुख्य संस्थापक नारायण मूर्ती 20 ऑगस्ट 2011 रोजी निवृत्त झाले होते. निवृत्तीस दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच नारायण मूर्ती यांनी या कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी नुकतीच स्वीकारली. त्यामुळे सगळीकडे कुतूहलमिश्रित आश्चर्याची प्रतिक्रिया उमटली आहे. खरे म्हणजे मूर्तींवर ही जबाबदारी येणे हे जितके आश्चर्याचे आहे तितकेच आश्चर्य मूर्तींनी ही जबाबदारी स्वीकारायला होकार देण्याचेही आहे. कारण ठरावीक वयानंतर आपण दूर होऊन इन्फोसिसचा कारभार नव्या सहकार्‍यांवर सोडणार, अशी घोषणा मूर्तींनी आधीपासून केली होती आणि प्रत्यक्षात त्यानुसार निवृत्ती स्वीकारलीही. त्यानंतर त्यांची भारताच्या राष्टÑपतिपदी नेमणूक होणार, इथपासून ते स्वत:चे महाविद्यालय सुरू करणार इथपर्यंत अनेक अफवा पसरल्या होत्या. ते इन्फोसिसमध्ये परततील, असे मात्र फारसे कुणालाच वाटले नव्हते. तसेच भारतामध्ये अशा प्रकारे निवृत्त झालेल्या माणसाने नव्याने कंपनीची सूत्रे हाती घ्यावीत, असा प्रकार अगदी अपवादाने घडत असल्यामुळेसुद्धा ही बातमी खूप खळबळजनक ठरली. अशा परिस्थितीत मूर्ती इन्फोसिसची घसरगुंडी रोखू शकतील का, या मुद्द्याचा अनेक अंगांनी विचार केला पाहिजे.

ज्या काळात मूर्तींनी आपल्या काही मान्यवर सहकार्‍यांच्या मदतीने पटणी ही कंपनी सोडून इन्फोसिस कंपनी उभी केली तो काळ आजच्या काळाहून खूप वेगळा होता. त्या काळात भारताच्या सॉफ्टवेअर क्षेत्राविषयी चांगली प्रतिमा निर्माण करणे आणि ती प्रामुख्याने अमेरिका तसेच इतर पाश्चिमात्य देशांच्या मनात ठसवणे हे सगळ्यात महत्त्वाचे आव्हान होते. यात काही मोजक्या कंपन्या यशस्वी झाल्या. त्यात इन्फोसिसचाही समावेश होता. त्यानंतरच्या काळात मात्र भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांची वाढ वेगाने होत गेली आणि त्या वाढीसाठी कंपन्यांना नव्याने खूप प्रचंड प्रयत्न करावे लागले नाहीत, हे खरेच. याचे मुख्य कारण म्हणजे आधी घेतलेल्या प्रचंड कष्टांमुळे या कंपन्यांचे नाव चांगले होऊन त्यांना जवळपास आपोआपच व्यवसाय मिळत राहिला. त्यातच 2000 मध्ये येऊ घातलेल्या ‘वायटूके’ प्रश्नामुळे भारतीय कंपन्यांच्या यशाला नवी झळाळी प्राप्त झाली. साहजिकच इन्फोसिसचे नारायण मूर्ती, विप्रोचे अझीम प्रेमजी, एचसीएलचे शिव नादर असे लोक एकदम प्रकाशझोतात आले आणि त्यांना उद्योग क्षेत्रात प्रचंड मान्यता मिळाली. भारताच्या सॉफ्टवेअरची निर्यात सातत्याने दोनआकडी दराने वाढत राहिली. नारायण मूर्ती इन्फोसिसच्या रोजच्या जबाबदारीतून मुक्त होण्याआधी 2008 मध्ये जागतिक महामंदी सुरू झाली. साहजिकच याचे पडसाद सगळ्या जगाबरोबर भारताच्या सॉफ्टवेअर कंपन्यांवरही उमटले. बहुतेक सगळ्या कंपन्यांच्या व्यवसायात आणि उत्पन्नात वेगाने घट झाली. त्यामुळे अनेक कंपन्यांवर कर्मचारी कपात करण्याची वेळ आली. इन्फोसिसवरही याचे दुष्परिणाम झालेच; पण इतर सगळ्या कंपन्यांबरोबरच इन्फोसिसलाही थोडेफार झटके सहन करावेच लागणार, अशा दृष्टिकोनातून विश्लेषकांनी या मुद्द्याकडे पाहिले. यानंतर मूर्ती यांनी इन्फोसिस सोडली. त्यानंतरच्या दोन वर्षांमध्ये इन्फोसिसमधून आणखी जुनेजाणते लोक सत्तेच्या खेळामध्ये पराभव झाल्यामुळे बाहेर पडले. तसेच दुसरीकडे टीसीएस आणि कॉग्निझंट या कंपन्या झपाट्याने पुढे जात असताना इन्फोसिसचे तिमाही निकाल मात्र सातत्याने निराशा पसरवणारे होते. त्यामुळे अनेक जणांनी इन्फोसिसमध्ये आता जुना दम राहिला नसल्याचे मत व्यक्त केले. कंपनीनेही मोठ्या प्रमाणावर कर्मचार्‍यांच्या हातात नारळ द्यायला सुरुवात केली. कंपनीच्या शेअरची किंमत घसरत गेली. परिस्थिती हाताबाहेर जात असूनसुद्धा इन्फोसिस काहीच करत नाही, असे चित्र वाढत गेल्यानंतर अलीकडच्या तिमाहीतल्या निकालांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. अशा पार्श्वभूमीवर नारायण मूर्ती यांना परत एकदा कंपनीने साकडे घालून बोलावून घेतले.
मूर्तींसमोरच्या काही आव्हानांचा विचार केला तर पहिले आव्हान म्हणजे एकीकडे जागतिक महामंदी आणि दुसरीकडे भारताच्या सॉफ्टवेअर क्षेत्राला मिळत असलेला अमेरिका आणि भारत यांच्यामधल्या वेतनाच्या फरकाचा फायदा कमी होत जाण्याची प्रक्रिया. यामुळे काही मोजके अपवाद वगळता बहुतेक सगळ्या सॉफ्टवेअर कंपन्यांमधले वातावरण नरम आहे. म्हणजेच भारतामध्ये काम पाठवून म्हणजेच आपले काम ‘आऊटसोर्स’ करून त्या मानाने हवा तसा फायदा आपल्याला मिळत नाही, असे मत अनेक अमेरिकन कंपन्या व्यक्त करायला लागल्या आहेत. यात बदल व्हायचा असेल तर भारतामधल्या सॉफ्टवेअर कंपन्यांच्या वेतनाचा फुगत चाललेला आकडा एका मर्यादेनंतर वाढू शकणार नाही, अशी परिस्थिती भारतामधल्या कर्मचार्‍यांनी मान्य करायला हवी. या आणि अशाच अनेक कारणांमुळे 2014 पासून अमेरिकन कंपन्यांचे ‘आऊटर्सोसिंग’ कमी होईल, असे मानले जाते. दुसरे म्हणजे, जागतिक महामंदीमुळे प्रचंड अडचणीत सापडलेल्या युरोपकडून भारताला मिळत असलेल्या व्यवसायात खूप घट झाली आहे. अमेरिकेची स्थितीही फारशी चांगली नाही. तिसरे म्हणजे, भारतीय कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना अमेरिकेमध्ये काम करण्यासाठी पाठवण्याच्या मूळ संकल्पनेलाच सुरुंग लागेल, अशा प्रकारचे विधेयक अमेरिकन संसदेमध्ये मांडण्यात आले आहे. चौथे म्हणजे, आपल्या कामातून मिळत असलेले उत्पन्न आणि त्यातून खर्च वजा करून शिल्लक राहिलेल्या नफ्याची टक्केवारी म्हणजेच ‘मार्जिन’ यात सातत्याने घट होत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. पूर्वी हे ‘मार्जिन’ 30-35 टक्के इतके असायचे; पण आता भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांमधले वाढत गेलेले पगार तसेच महामंदीमुळे परदेशातल्या ग्राहकांनी काम देताना त्याच्या मोबदल्यात केलेली घट, या दुहेरी फटक्यामुळे हा आकडा आता बहुतेक सगळ्या कंपन्यांच्या बाबतीत 20-25 टक्क्यांवर आला आहे. पाचवे, पूर्वी इन्फोसिसच्या नावामुळे कित्येकदा परदेशाचे ग्राहक इतर कंपन्या टाळून इन्फोसिसला जास्त पैसे देऊनसुद्धा काम द्यायचे. आता अशी परिस्थिती राहिलेली नाही.

साहजिकच मूर्तींच्या समोरचे आव्हान खूप मोठे आहे. गेली काही वर्षे इन्फोसिस आणि विप्रो या कंपन्यांच्या वरिष्ठ पातळीवरच्या व्यवस्थापनाच्या फळीच्या बाबतीतच प्रचंड घोळ झाल्यामुळे त्यांची पीछेहाट झाली, असेही मानले जाते. विप्रोमध्ये प्रेमजींनी दोन संयुक्त प्रमुख कार्यकारी अधिकारी नेमले आणि त्यामुळे परिस्थिती बिघडली, तर इन्फोसिसच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी पूर्वी आयसीआयसीआय उद्योग समूहाचे सर्वेसर्वा असलेले के. व्ही. कामत आणि इन्फोसिसचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस गोपालकृष्णन संयुक्तरीत्या नेमले गेले. यामुळे पुरता गोंधळ माजला. विप्रोने ही पद्धत बदलून कुरियनना कंपनीच्या प्रमुखपदी नेमले, तर इन्फोसिसमध्ये आता कामत आणि गोपालकृष्णन यांची जागा मूर्ती घेत आहेत. साहजिकच कंपनीच्या इतर वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या जागांमध्येही मोठे फेरबदल व्हायची दाट शक्यता आहे. पूर्वी इन्फोसिसला नावलौकिक मिळवून देणारे, नंतर इन्फोसिस, तर आता आयगेट या कंपन्यांमध्ये अनैतिक संबंधांच्या प्रकरणात अडकलेले फणिश मूर्ती यांनी काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत भारतीय सॉफ्टवेअर क्षेत्राला आपल्या प्रगतीचा दर 8-10 टक्क्यांवरच अडकून पडलेला बघण्याची सवय करून घ्यावी लागेल. एकूण परिस्थिती बघता त्यात तथ्य आहे, असे नक्कीच म्हणावेसे वाटते.

म्हणूनच इन्फोसिसने आपल्या परंपरागत व्यवसायाच्या जोडीला सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्ससारख्या कामात वेगाने प्रगती केली नाही तर तिची घसरण रोखण्यात नारायण मूर्तींना कितपत यश येईल याची शंकाच वाटते, असे विधान धाडसी वाटले तरी करावेसे वाटते. मूर्तींबद्दल पूर्ण आदर बाळगूनही त्यांच्या आवाक्याबाहेरची परिस्थिती नियंत्रित करणे त्यांना कसे काय जमेल, असा हा मुख्य प्रश्न आहे. इन्फोसिसने केलेल्या चुका आणि कंपनीमधले गोंधळ या गोष्टींमध्ये ते निश्चितच सुधारणा घडवून आणतील. कंपनीच्या नफ्यातही थोडीफार वाढ करून दाखवतील. त्यापलीकडे जाऊनही काही प्रचंड करण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलेल का? म्हणूनच या घटनाक्रमाकडे बघणे मोठे रंजक ठरेल.
(kahate@gmail.com)